वृत्तसंस्था
इंफाळ : मणिपुरात ( Manipur ) दोन दिवसांपासून सुरू असलेल्या शाळा-कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने मंगळवारी हिंसक वळण घेतले. विद्यार्थ्यांनी राज्य सरकारकडे ६ मागण्या पाठवल्या होत्या व त्या मान्य करण्यासाठी २४ तासांचा अल्टिमेटम दिला होता. मात्र, सरकारकडून कोणतेच उत्तर आले नसल्याने सुमारे २५०० विद्यार्थी संतप्त झाले.
स्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून राज्य सरकारने सकाळी ११ वाजता इंफाळ पूर्व आणि पश्चिम जिल्ह्यात कर्फ्यू लावला. संपूर्ण राज्यात इंटरनेट, मोबाइल डेटा व ब्रॉडबँड सेवा १५ सप्टेंबर दुपारी ३ वाजेपर्यंत बंद ठेवली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी मैतेई महिलांचा गट मेइबा पाइबी यांच्यासोबत दुपारी १ वाजता राजभवनाकडे कूच केली. १०० मीटर पुढे जाताच त्यांना सुरक्षा दल आणि पोलिसांनी सुरक्षा दलांनी केवळ ७ विद्यार्थ्यांना राजभवनात जाण्याची परवानगी दिली. त्यानंतर विद्यार्थी घोषणाबाजी करायला लागले. त्यांनी गुलेद्वारे काचेचे तुकडे जवानांवर फेकले.
प्रत्युत्तरात सीआरपीएफ, आरएएफ, मणिपूर पोलिस कमांडोजने अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या. यामध्ये सुमारे ६० विद्यार्थी जखमी झाले. एका आरएएफ जवानालाही दुखापत झाली. ४ तासांच्या गोंधळानंतर सुरक्षा दलाचे जवान ११ विद्यार्थ्यांना राजभवनात घेऊन गेले. राज्यपालांनी त्यांना तातडीने समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले. मात्र, विद्यार्थी समाधानी झाले नाही. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत शाळा-कॉलेजवर बहिष्कार टाकण्याची घोषणा बैठकीनंतर विद्यार्थ्यांनी केली. तिकडे, मणिपूर विद्यापीठाने पदवी-पदव्युत्तर परीक्षा रद्द केल्या आहेत.
ड्रोन-रॉकेट हल्ल्याचा एनआयएकडून तपास शक्य
सूत्रांनुसार ड्रोन हल्ल्यात परदेशी लिंक असल्याच्या संशयामुळे आता हे प्रकरण तपासासाठी एनआयए आपल्या हाती घेऊ शकते. याचे पुरावे राज्य पोलिसांना मिळाले आहेत. यापूर्वी मणिपूर पोलिस दलाचे आयजी (ऑपरेशन) म्हणाले, डोंगराळ भागातून रहिवासी भागांत डागण्यात आलेले रॉकेट अत्याधुनिक होते. त्याचे तुकडे सापडले आहेत. तथापि, माजी लष्करप्रमुख जनरल व्ही. पी. मलिक यांचे म्हणणे आहे की, मणिपुरात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची गरज आहे.
सीआरपीएफचे दोन हजार जवान मणिपूरला जाणार
केंद्र सरकारने मणिपुरात सीआरपीएफच्या २ हजार जवानांच्या दोन अतिरिक्त बटालियन तैनात करण्याचा निर्णय घेतला. बटालियन नंबर ५८ तेलंगणच्या वारंगल, तर नंबर ११२ झारखंडच्या लातेहारमधून मणिपूरला पाठवली जात आहे. पहिली बटालियन कुकीबहुल चुराचांदपूरच्या कांगवई, दुसरी इंफाळमध्ये तैनात होईल.सीआरपीएफच्या १६ बटालियन (१६ हजार जवान) आधीपासूनच इंफाळ, चुराचांदपूर, नोने, जिरिबाम, कांग्पोक्पी, बिष्णुपुरात तैनात आहेत. ११ बटालियन मे २०२३ मध्ये हिंसाचारानंतर आधीच तैनात होत्या.
आंदोलनात इंफाळच्या जवळपास सर्व शाळा-कॉलेजची मुले-मुली सहभागी झाले आहेत. राज्याचे डीजीपी, सुरक्षा सल्लागार, केंद्रीय सुरक्षा दलांना हटवण्याची, १६ महिन्यांपासून सुरू असलेली गृहयुद्धासारखी स्थिती संपवण्याची आणि सुरक्षा दलांची यूनिफाइड कमांड केंद्रीय गृह मंत्रालयाकडून काढून घेत मुख्यमंत्र्यांना सोपवण्याची मागणी हे विद्यार्थी करत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App