विशेष प्रतिनिधी
मुंबई : मनोज जरांगेंच्या डोक्यातील राजकारणाचे भूत उतरवण्याची वल्गना करणाऱ्या भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी सोमवारी पुन्हा एकदा जरांगेंवर निशाणा साधला. मराठा समाजाने आपला सातबारा जरांगेंच्या नावावर केला काय? असा सवाल उपस्थित करत त्यांनी यावेळी जरांगेंना आपल्या डोक्यात हवा जाऊ न देण्याचा सल्ला दिला आहे. भाजप व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संपवणे हेच जरांगेंचा उद्देश असल्याचेही ते यावेळी म्हणाले.MLA Darekar’s question to Jarange- Did the Maratha community do 7/12 in your name?
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी भाजपला सत्तेत आणण्याचे आवाहन केले होते. मनोज जरांगे यांनी सोमवारी त्यांच्या या विधानाचा चांगलाच समाचार घेतला होता. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी तुम्हाला कुणी रोखले, आता कुणाची सत्ता आहे? असा सवाल त्यांनी यासंबंधी केला होता. त्यांच्या या विधानानंतर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी त्यांच्यावर पलटवार केला.
प्रवीण दरेकर म्हणाले की, भाजप दलित, आदिवासी आजा सर्व समाजांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे. पण सध्या जातीपातींत संभ्रम निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. तुम्ही मॅनेज होत नाही म्हणून समाज तुमच्या पाठिशी आहे. पण कुणी काही बोलले म्हणजे त्याला शिव्या देणे हे बंद झाले पाहिजे.
हमरीतुमरीची भाषा टाळा
मनोज जरांगेंनी आंदोलनामुळे डोक्यात हवा जाऊ देऊ नये. त्यांनी राजकारण करण्यापेक्षा समाजाच्या प्रश्नांवर फोकस करावा. सरकार मराठा समाजासाठी काय करत आहे हे आम्ही कालच्या कार्यक्रमात दाखवले. सरकार मराठा समाजाच्या प्रश्नांवर सकारात्मक आहे. त्यामुळे शिवराळ भाषा वापरणे योग्य नाही. आम्हीही 20 वर्षांपासून राजकारणात आहोत. आम्हीही संघर्ष केला आहे. आम्हालाही उत्तर देता येते. त्यांनी हमरीतुमरीची भाषा टाळावी. असे बोलायला मराठा समाजाने आपला सातबारा त्यांच्या नावे केलाय का? असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.
समाज शांत, पण मी बोलेन
प्रवीण दरेकर यांनी यावेळी मनोज जरांगे यांना सत्तेत येण्याच्या शुभेच्छाही दिल्या. तसेच त्यांचा उद्देश भाजप व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संपवण्याचा असल्याची टीकाही केली. मनोज जरांगेंनी सत्तेत यावे. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. पण त्यांचा उद्देश केवळ भाजप व देवेंद्र फडणवीस यांना संपवण्याचा आहे. समाज शांत आहे. पण मी बोलेन तीच समाजाची भूमिका या अविर्भावातून जरांगेंनी बाहेर पडावे. कारण, ते एकप्रकारे महाविकास आघाडीचा बचाव करत आहेत. त्यांनी शरद पवार व उद्धव ठाकरे यांना मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यावरील त्यांची भूमिका विचारावी, असे दरेकर म्हणाले.
शहांना काय म्हणाले होते मनोज जरांगे?
अमित शहांना मराठा समाजाला आरक्षण देण्यापासून कुणी रोखले. सध्या त्यांचीच सत्ता आहे. आम्ही आरक्षणाची अजून किती दिवस वाट पाहायची. गोरगरिबांचा विचार करा व आरक्षण द्या. पण अमित शहांना गरिबांकडे लक्ष देण्यासाठी वेळच नाही. त्यांना केवळ मराठा, गुर्जर आदी मोठ्या जाती संपवायच्या आहेत. भाजपची सत्ता असूनही आरक्षण मिळाले नाही. उलट आंदोलकांवर लाठीमार झाला. गोळीबार झाला. खोटे गुन्हे दाखल झाले, असे मनोज जरांगे म्हणाले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App