दोन मुले आणि संयुक्त राष्ट्राच्या एका कर्मचाऱ्यासह सहाहून अधिक लोक ठार
विशेष प्रतिनिधी
देर अल-बालाह : इस्रायलच्या बॉम्बने मध्य गाझामध्ये पुन्हा एकदा दहशत निर्माण केली आहे. मध्य गाझामध्ये शुक्रवारी इस्रायली हवाई हल्ल्यात दोन मुले आणि संयुक्त राष्ट्राच्या एका कर्मचाऱ्यासह सहाहून अधिक लोक ठार झाले. पॅलेस्टिनी रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. गाझामधील सलाह अल-दिन मार्गावरील माघाझी निर्वासित शिबिराजवळ इस्त्रायली हल्ल्यात तीन प्रौढांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले, असे देर अल-बलाह शहरातील अल अक्सा शहीद रुग्णालयातील अधिकारी आणि साक्षीदारांनी सांगितले.
ते म्हणाले की मृतांपैकी एकाने संयुक्त राष्ट्राचा गणवेश परिधान केला होता. नुसरत निर्वासित छावणीवर झालेल्या हल्ल्यात एक प्रौढ आणि दोन मुलेही ठार झाल्याची माहिती रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली. इस्त्रायली सैन्याने या हल्ल्यांवर लगेच प्रतिक्रिया दिली नाही. इस्रायलने आपल्या हल्ल्यात नागरिकांच्या मृत्यूसाठी हमासला जबाबदार धरले आहे. त्यांनी म्हटले की इस्रायली नागरिकांच्या आडून आपल्याविरोधात कारवाया केल्या जात आहे, तर हमासने हे आरोप फेटाळले आहेत आणि इस्रायलवर नागरिकांना लक्ष्य केल्याचा आरोप केला आहे.
दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या कार्यालयाने शुक्रवारी सांगितले की, इस्रायली वार्ताकारांची एक टीम हमासशी युद्धविराम आणि ओलीस विनिमय करारावर पुढील आठवड्यात पुन्हा चर्चा सुरू करेल. हे सूचित करते की गाझामधील युद्ध समाप्त करण्याच्या कराराच्या दिशेने प्रगती होत आहे.
7 ऑक्टोबर रोजी हमासने केलेल्या हल्ल्यात सुमारे 1,200 लोक मारले गेले आणि 200 हून अधिक लोकांना ओलीस ठेवण्यात आले. यानंतर इस्रायलने हमासला प्रत्युत्तर दिले. गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, या युद्धात 38,000 हून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App