पवार 1986 सारखा मोठा कार्यक्रम घेऊन राष्ट्रवादी विलीन करू शकतील की त्यांना यशवंतरावांच्या मार्गेच जावे लागेल??

बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदान संपल्यानंतर शरद पवारांनी काँग्रेसची विचारसरणीच्या छोट्या प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसमध्ये विलीन व्हावे किंवा काँग्रेसबरोबर सहयोगाने काम करावे, अशी सूचना केली. त्या सूचनेचे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये तरंग उमटले. दस्तूरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या मागचे राजकीय इंगित ओळखून पवारांना बारामतीतला पराभव दिसल्याने पवारांनी काँग्रेसमध्ये पक्ष विलीनीकरण करण्याची पुडी सोडली. फक्त पवारांचाच पक्ष नाहीतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना देखील चार जून नंतर काँग्रेसमध्ये विलीन होईल, असे भाकीत नरेंद्र मोदींनी वर्तविले. Will sharad pawar be able to merge his NCP in a strait way or he will be compelled to bow down before Gandhis like yashwantrao chavan??

पवारांनी आजच्या नाशिक मधल्या पत्रकार परिषदेमध्ये मोदींच्या त्या भाकितावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले. काँग्रेसी विचारसरणीच्या पक्षांनी काँग्रेस बरोबर विशेष सहयोगाने काम करावे किंवा विलीन व्हावे ही सूचना मीच केली होती त्यामुळे मोदींना नेमकी काय अडचण आली??, हे मला समजले नाही, असा टोमणा पवारांनी मारला. पण त्या पलीकडे जाऊन मला “ट्रेंड” समजतो, असे जे वक्तव्य पवारांनी नाशिक मध्ये केले, त्यानुसार पवारांना जर खरंच लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा “ट्रेंड” समजला असेल, तर पवारांनी विलीनीकरण संदर्भात केलेले वक्तव्य योग्यच मानावे लागेल.

पण मग त्यातून असा सवाल तयार होतो की शरद पवार 1986 सारखा भव्य दिव्य कार्यक्रम घेऊन आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण करतील की त्यांना यशवंतराव चव्हाणांसारखेच काँग्रेसमध्ये परतावे लागेल?? हा सवाल तयार होण्याचे कारण पवारांच्या वक्तव्यात किंवा मोदींच्या भाकितात नसून ते पवारांचे राजकारण कोळून प्यायलेल्या काँग्रेस पक्षाच्या एका महत्त्वाच्या नेत्याच्या वक्तव्याचे आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी सकाळला दिलेल्या मुलाखतीत सूचकपणे पवारांच्या पक्षाला काँग्रेसमध्ये विलीनीकरण करून घेण्यात या अटी – शर्तींसंदर्भात संदर्भात वक्तव्य केले. पवारांच्या पक्षाच्या विलीनीकरणाचा निर्णय स्वतः पवारांनीच घ्यायचा आहे पण त्याच्या अटी शर्ती काँग्रेसने आत्ताच सांगण्याचे कारण नाही. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर त्यावर विचार करता येईल, असे रमेश चेन्निथला म्हणाले. रमेश चेन्निथला यांच्या या वक्तव्यात बरेच “बिटवीन द लाईन्स” दडले आहे आणि तेच नेमके पवार सरळ मार्गाने काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतील की त्यांना यशवंतरावांच्याच मार्गाने जावे लागेल??, या सवालाचे उत्तर मिळणार आहे.

पवारांच्या पक्षाच्या काँग्रेसमधल्या विलीनीकरणाच्या अटी शर्ती काय असायच्या त्या असोत, पण जर पवारांच्या पक्षाचा राजकीय परफॉर्मन्स लोकसभेमध्ये चांगला राहिला, तर पवार आपल्या पक्षाचा विलीनीकरणाचा विचार करण्याची शक्यता नाही, पण पवारांचा परफॉर्मन्स जर खराब राहिला आणि पवारांनी बारामती पण गमावली, तर मात्र पवारांच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर काँग्रेसचा वरचष्मा राहील आणि काँग्रेस आपल्या अटी शर्तींनुसारच पवारांच्या पक्षाचे आपल्या पक्षात विलीनीकरण करून घेईल. तिथे सुप्रिया सुळेंना महाराष्ट्र काँग्रेसचे नेतृत्व द्यावे वगैरे पवारांच्या अटी काँग्रेस मान्य करण्याची शक्यता राहणार नाही.

इतकेच काय, पण पवारांच्या राजकीय टाइमिंगनुसार त्यांच्या पक्षाचे विलीनीकरण काँग्रेसमध्ये होण्याची शक्यता नाही, तर काँग्रेसला हव्या त्या टाइमिंगनुसार काँग्रेसचे नेते पवारांचा पक्ष स्वतःत विलीन करून घेण्याची शक्यता आहे.



 

नेमके हेच 1980 च्या दशकामध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या बाबतीत घडले. 1980 मध्ये यशवंतराव चव्हाण आणि ब्रह्मानंद रेड्डी यांची राष्ट्रीय काँग्रेस जिला लोक “चड्डी काँग्रेस” म्हणायचे, ती इंदिरा काँग्रेस विरुद्ध स्वतंत्रपणे निवडणूक लढली होती. त्या पक्षाचे महाराष्ट्रातून यशवंतराव चव्हाण हे एकमेव खासदार निवडून आले होते. परंतु, निवडणुकीमध्ये इंदिरा गांधींना प्रचंड यश मिळाले आणि इंदिरा गांधींचा इंदिरा काँग्रेस हाच पक्ष काँग्रेसचा मुख्य प्रवाह आहे, असे सांगून यशवंतराव चव्हाण काँग्रेसमध्ये गेले. पण यशवंतरावांचे काँग्रेसमध्ये जाणे सहज घडले नाही. त्याआधी भरपूर राजकीय घडामोडी घडल्या. यशवंतरावांचे सगळे सहकारी टप्प्या टप्प्याने इंदिरा काँग्रेसमध्ये गेले. इंदिरा गांधींनी त्यांना पक्षात घेतले. त्यांना छोटी मोठी पदे दिली, पण यशवंतराव चव्हाणांना मात्र साधारण वर्ष – दीड वर्ष काँग्रेस प्रवेशासाठी ताटकाळत ठेवले. त्यावेळी वसंतदादा पाटील इंदिरा काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस होते. यशवंतराव चव्हाण यांनी केलेल्या काँग्रेसच्या सभासदत्वाच्या अर्जावर आम्ही लवकरच विचार करू, असे वसंतदादा पाटील म्हणाले होते. याची साक्ष इंडिया टुडेच्या रिपोर्टमध्ये मिळते. याचा अर्थ यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या महाराष्ट्रातल्या मोठ्या नेत्याला इंदिरा काँग्रेसमध्ये सभासदत्वाचा अर्ज करून प्रवेश देण्यात आला होता, हे स्पष्ट होते.

मग शरद पवार यांना देखील त्यांचे बळ घटल्यानंतर सोनिया गांधी काँग्रेसमध्ये प्रवेश देतील का आणि तो दिल्यास तो कशा पद्धतीने देतील??, हा सवाल तयार होतो. शरद पवार 1986 सारखाच भव्य मेळावा घेऊन आपली उरलेली अखंड राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये एकत्रितपणे विलीन करतील की आधी आपले सहकारी टप्प्याटप्प्याने काँग्रेसमध्ये पाठवून मग स्वतः काँग्रेसमध्ये प्रवेश करतील किंवा यशवंतराव चव्हाणांसारखा सभासदत्वाचा अर्ज करवून घेऊन काँग्रेस शरद पवारांना आपल्या पक्षात प्रवेश देईल??, हा सवाल आहे. या प्रश्नाचे उत्तर 4 जून नंतर मिळण्याची शक्यता आहे.

1986 मध्ये शरद पवारांनी आत्ताच्या संभाजीनगर मध्ये आणि तेव्हाच्या औरंगाबाद मध्ये भव्य मेळावा घेऊन आपल्या समाजवादी काँग्रेसचे राजीव गांधींच्या इंदिरा काँग्रेसमध्ये विलीनीकरण केले होते. त्यानंतर दोन वर्षांनी राजीव गांधींनी शरद पवारांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केले होते.

अर्थात 1980, 1986 आणि 2024 ही तीन स्वतंत्र वर्षे आहेत. या तिन्ही वर्षांमधली राजकीय परिस्थिती आणि राजकीय पात्रे वेगवेगळी आहेत. 1980 मध्ये यशवंतराव चव्हाण आणि इंदिरा गांधी यांच्यात “सामना” होता. 1986 मध्ये राजीव गांधी आणि शरद पवार यांच्यात “डील” होते. 2024 मध्ये शरद पवारांना सोनिया गांधींशी “डील” करावे लागणार आहे. या प्रत्येकात वेगवेगळे “पॉलिटिकल फॅक्टर्स” आहेत.

पण या सगळ्यातला “कॉमन फॅक्टर” असा की, यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार हे मराठी माध्यमांनी “राष्ट्रीय” नेतृत्वाची प्रतिमा निर्मिती केलेले महाराष्ट्रातले नेते होते आणि आहेत, तर इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि सोनिया गांधी हे खऱ्या अर्थाने राष्ट्रीय नेते होते आणि आहेत. राजकीय ताकदीच्या बाबतीत चव्हाण आणि पवार हे कुठल्याही गांधींसमोर किती ताकदवान होते आणि आहेत??, याची माहिती आणि जाणीव सगळ्या देशाला आणि महाराष्ट्राला आहे!!

Will sharad pawar be able to merge his NCP in a strait way or he will be compelled to bow down before Gandhis like yashwantrao chavan??

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात