विशेष प्रतिनिधी
जालना : महाराष्ट्रात मराठ्यांची ताकद मोठी आहे. 288 विधानसभा मतदारसंघांपैकी 92 – 93 मतदारसंघात मराठा समाजाचे वर्चस्व आहे. या लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षण विरोधकांना पाडा. त्यांच्या पडण्यातच आपला विजय आहे, असे आवाहन मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी केले. Maratha dominance in 93 out of 288 constituencies in Maharashtra, defeat reservation opponents; Appeal of Manoj Jarang
मनोज जरांगे यांनी आज जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील कारखाना परिसरातील मतदान केंद्रावर जाऊन त्यांनी मतदान केले. प्रकृती अस्वास्थामुळे जरांगेंवर उपचार सुरु आहेत. पण त्यांनी अॅम्ब्युलन्समधून येऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना, मराठा आरक्षण विरोधकांना पाडा, असे आवाहन केले. आपले उमेदवार नसले तरी पाडण्यातही आपला विजय असेल, असे मनोज जरांगे म्हणाले.
मी सांगितलं होते कुणालाही मतदान करा, समाजाच्या खांद्यावर जबाबदारी आहे. सगेसोयरेच्या बाजूने आणि मराठा आणि कुणबी एकच या बाजूने असणाऱ्यांना मात्र सहकार्य समाजाने करावे. जरी आपण उमेदवार दिलेला नाही, पाठिंबाही दिला नाही. पण पाडण्यातही आपला विजय आहे. यावेळेस पाडणारे बना. उभेच राहावे किंवा उमेदवार द्यावा असे काही नाही, पाडण्यातही खूप मोठा विजय आहे. यावेळेस पाडणारे बना. जर 6 जूनच्या आत आरक्षण दिले नाही तर देणारे बनू, आपण विधानसभेला मैदानात मी सुद्धा असेन… कारण मराठा, मुस्लिम, धनगर बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न आहे. बारा बलुतेदार दलित बांधव सगळ्यांचा प्रश्न आहे. त्यामुळे आपण देणारे बनू. उगाच काहीही अफवा पसरवल्या जात आहेत, महायुती आणि महाविकास आघाडी दोघे सारखेच आहेत हे म्हणण्याचा माझा अर्थ होता, या दोघांनी मिळून आमचा करेक्ट कार्यक्रम केला आहे, दोघांनी लेकरांचे वाटोळे केले, असे मनोज जरांगे म्हणाले.
मनोज जरांगे म्हणाले, आपला उमेदवार नसल्यामुळे, तुम्ही मतदान कोणालाही करा, पण जे सगेसोयरे आणि मराठा आरक्षणाच्या बाजूने असेल त्याला करा. इतक्या ताकदीने विरोधकाला पाडा की कमीत कमी पाच पिढ्या निवडणुकीला उभ्या राहिल्या नसल्या पाहिजेत. मराठ्यांनी एकजूट दाखवावी. 288 पैकी 92-93 मतदारसंघ असे आहेत, जिथे मराठ्यांचं वर्चस्व आहे. माझा राजकीय मार्ग नाही, मला तिकडे जायचे नाहीय, पण मला तुम्ही तिकडे न्यायचा प्रयत्न करताय तर माझा नाईलाज आहे. मराठा समाजासह लिंगायत समाज सर्व एकत्र येऊ. प्रश्न गोरगरिबांचा आहे, आम्हाला देणारे बनावे लागेल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App