भाजपने 34 खासदारांची तिकिटे कापली, पण ना नाराजी, ना बंडखोरी; पण काँग्रेस – राष्ट्रवादीत एवढी तिकिटे कापली गेली असती तर…??

नाशिक : भाजपने लोकसभा निवडणूक 2024 च्या दृष्टीने आघाडी घेत प्रत्यक्ष निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच 40 – 50 नव्हे, तर तब्बल 195 उमेदवार पहिल्याच झटक्यात जाहीर केले, पण हे उमेदवार जाहीर करताना भाजपने 34 विद्यमान खासदारांची तिकिटे कापून तिथे नवे उमेदवार दिले. पण एवढ्या मोठ्या प्रमाणावर खासदारांची तिकिटे कापल्यानंतरही भाजपमध्ये ना नाराजीचा सूर उमटला, ना कोणी बंडखोरीचा डंका वाजवला!!, पण हेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये घडले असते, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने अशी खासदारांची दणादण तिकिटे कापली असती, तर त्या पक्षांमध्ये काय घडले असते??, याचा साधा विचारही करवत नाही.  BJP dropped 34 MPs from the first list, no sound of disesendance outside party, but if Congress – NCP cut the tickets sounds of disesendance have been much higher

कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये जशी बंडखोरीची “समांतर व्यवस्था” निर्माण झाली आहे, ती “राजकीय व्यवस्था” अद्याप भाजपमध्ये विकसित झालेली नाही. बंडखोरीची “समांतर व्यवस्था” ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे राजकीय व्यवच्छेदक लक्षण बनली आहे. ते लक्षण भाजपच्या विशिष्ट राजकीय प्रणालीच्या बांधणीतून तयार होणे आणि दिसणे अवघड आहे. याचा अर्थ अजिबात असा नाही की, तिकिटे कापलेल्या विद्यमान खासदारांमध्ये नाराजी नसेल. ती नाराजी थोड्याफार प्रमाणात जरूर असेल. पण ती व्यक्त करण्याची पद्धत आणि त्यासाठी भाजपने केलेली “व्यवस्था” याला एक वेगळे आणि विशेष महत्त्व आहे. भाजपमध्ये पक्षांतर्गत चौकटीत मतभेद व्यक्त करण्याची मूभा असली तरी एकदा निर्णय झाला की, तो शांतपणे अंमलात आणायचा याची देखील “व्यवस्था” आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कामे वाटपाची देखील “व्यवस्था” आहे. त्यामुळे तिकिट कापलेलाखासदार एकदम “निकम्मा” होऊन जातो, अशी बिलकुलच स्थिती येत नाही. उलट त्याची दुसरी “राजकीय व्यवस्था” करण्याची व्यवस्था पक्षाने आणि संघ परिवाराने तयार केलेली आहे. त्याचाच एकंदरीत परिणाम म्हणून भाजपमध्ये काँग्रेस किंवा राष्ट्रवादी सारखी बंडखोरीची लाट पसरत नाही किंवा फेरबदल करताना त्याचा फारसा आवाज होत नाही.

त्या उलट काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये तिकिटे देण्याची व्यवस्थाच विशिष्ट “देवाण – घेवाणी”तून होत असल्याने आपोआपच ज्याचे “देणे” जास्त, त्याच्या खिशात तिकीट. त्यामुळे तुलनेने “कमी देणारा” लगेच बंडखोर होतो आणि ती “व्यवस्था” टप्प्याटप्प्याने पक्षातच “विकसित” होत जाते. हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बाबतीत घडले आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला जरी भाजपला खऱ्या अर्थाने आव्हान करावेसे वाटले, तरी प्रत्यक्षात उमेदवारांच्या याद्या जाहीर करून निवडणुकीच्या मैदानात येताना त्यांना वेळ लागतो. कारण तिकिटे वाटताना अथवा कापताना त्यांना त्या “देवाण – घेवाणीचा” विचार करावा लागतो आणि त्या पलीकडे जाऊन बंडखोरीची “पर्यायी व्यवस्था” करावी लागते. यामध्ये पक्ष नेतृत्व अडकत जाते आणि मूळ मुद्दा म्हणजे भाजपला देण्याचे आव्हान बाजूला पडून जाते!!

भाजपने वेगवेगळ्या राज्यांमधल्या 34 खासदारांची तिकिटे एका दणक्यात कापली, पण त्याचा मूळ आधार पक्षातल्या कुरघोडीच्या राजकारणापेक्षा खासदारांच्या परफॉर्मन्स पासून ते वेगवेगळ्या राज्यांमधल्या नव्या राजकीय आव्हानानुसार फेरबदलाच्या आवश्यकतेपर्यंत राहिला.

तेलंगणात आयारामांना संधी

तेलंगणातील 9 जागांसाठी भाजपने उमेदवारांची नावे जाहीर केली. त्यात एक दिवसापूर्वीच पक्षात दाखल झालेल्या बी. बी. पाटील यांचाही समावेश आहे. बी. बी.पाटील हे 2014 आणि 2019 मध्ये झहीराबादमधून खासदार राहिले. आता त्यांना त्याच जागेवरून भाजपने संधी दिली आहे. तेलंगणामधल्या एकूण 17 जागांपैकी भाजपने 9 जागांसाठी आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये बी. बी. पाटील यांच्याशिवाय पी. भरत यांना नगरकुर्नूलमधून संधी दिली आहे. त्यांच्या वडिलांनी काही काळापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

आसाममधून कोणाचे तिकीट कापले?  

आसाममधील लोकसभेच्या 11 जागांसाठी भाजपने उमेदवार जाहीर केले. यातील 6 उमेदवार विद्यमान खासदार आहेत तर उर्वरित 5 नवीन चेहरे आहेत. सिल्चरचे विद्यमान खासदार राजदीप रॉय यांचे तिकीट कापून परिमल सुक्ला बैद्य यांना उमेदवारी दिली आहे. स्वायत्त जिल्हा (राखीव) जागेवरून विद्यमान खासदार होरेन सिंग बे यांचे तिकीट रद्द करून अमरसिंह टिसो यांना उमेदवारी दिली आहे. गुवाहाटीमधून राणी ओझा यांचे तिकीट कापून बिजुली कलिता मेधी यांना उमेदवारी दिली आहे. तेजपूरमधून रणजीत दत्ता यांना तिकीट दिले असून, येथून विद्यमान खासदार पल्लब लोचन दास यांचे तिकीट कापले आहे. दिब्रुगडचे विद्यमान खासदार रामेश्वर तेली यांना हटवून केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांना तिकीट दिले आहे.

छत्तीसगडमध्ये 4 नव्या चेहऱ्यांवर बाजी

छत्तीसगडमधील 11 जागांसाठी भाजपच्या उमेदवारांच्या यादीत 4 नवीन चेहऱ्यांचा समावेश आहे. कमलेश जांगडे हे जांजगीर चंपा (राखीव) येथून विद्यमान खासदार गुहाराम अजगल्ले यांच्या जागी निवडणूक लढवणार आहेत. रायपूरमधून भाजपने विद्यमान खासदार सुनील कुमार सोनी यांचे तिकीट रद्द करून ज्येष्ठ नेते ब्रिजमोहन अग्रवाल यांना उमेदवारी दिली आहे. भाजपच्या उमेदवार रूप कुमारी चौधरी विद्यमान खासदार चुन्नीलाल साहू यांच्या जागी राज्यातील महासमुंद मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. कांकेर मतदारसंघातून विद्यमान खासदार मोहन मांडवी यांच्या जागी भाजपने भोजराज नाग यांना तिकीट दिले आहे.

दिल्लीत 5 पैकी 4 नवीन उमेदवार

भाजपने दिल्लीतील लोकसभेच्या जागेसाठी 5 उमेदवारांची घोषणा केली असून, त्यापैकी विद्यमान खासदारांच्या जागी 4 नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. पक्षाने 2 वेळा खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांना हटवून प्रवीण खंडेलवाल यांना चांदणी चौक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. पश्चिम दिल्लीतून भाजपने 2 वेळा खासदार परवेश साहिब सिंह वर्मा यांच्या जागी कमलजीत सेहरावत यांना तिकीट दिले आहे. यामध्ये भाजपच्या दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांच्या कन्या बन्सुरी स्वराज यांना नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली असून, केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी यांचे तिकीट कापले आहे. भाजपने दक्षिण दिल्लीतून रमेश बिधुरी यांना हटवून रामवीर सिंह बिधुरी यांना उमेदवारी दिली आहे.

गुजरातमध्ये 5 खासदारांची तिकिटे रद्द

गुजरातमधील लोकसभेच्या 26 पैकी 15 जागांसाठी भाजपने उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपने राज्यातील 5 विद्यमान खासदारांची तिकिटे कापली असून केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया आणि पुरषोत्तम रुपाला यांना तिकीट दिले आहे. माजी केंद्रीय राज्यमंत्री मोहन कुंडारिया राजकोटमधून, पोरबंदरमधून रमेश धाडुक, अहमदाबाद पश्चिममधून किरीट सोलंकी, बनासकांठामधून परबत पटेल आणि पंचमहालमधून रतनसिंग राठोड यांचा तिकीट कापलेल्या खासदारांचा समावेश आहे. केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला राजकोटमधून निवडणूक लढवणार आहेत. धाडुक यांच्या जागी मांडविया यांना पोरबंदरमधून रिंगणात उतरवले आहे.

अहमदाबाद पश्चिम (राखीव) जागेवर किरीट सोळंकी यांच्या जागी भाजपने दिनेश मकवाना यांना, तर पंचमहालमध्ये विद्यमान खासदार रतनसिंग राठोड यांच्या जागी राजपालसिंह जाधव यांना तिकीट दिले आहे.

झारखंडमध्ये जयंत सिन्हा यांच्यासह या खासदारांची तिकिटे कापली

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने झारखंडमधील 14 पैकी 11 जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली. झारखंडमध्ये माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांचा मुलगा जयंत सिन्हा यांच्याकडे असलेल्या हजारीबाग मतदारसंघातून भाजपने मनीष जैस्वाल यांना उमेदवारी दिली आहे. तीन वेळा खासदार सुदर्शन भगत यांच्या जागी समीर ओराव यांना लोहरदगा (एसटी) जागेसाठी तिकीट दिले आहे.

मध्य प्रदेशात 7 नवे चेहरे

मध्य प्रदेशातील उमेदवारांच्या यादीत भाजपने 7 विद्यमान खासदारांच्या जागी नवीन चेहऱ्यांचा समावेश केला आहे. पक्षाने विद्यमान खासदार विवेक नारायण शेजवलकर यांच्या जागी ग्वाल्हेर लोकसभा मतदारसंघातून भरतसिंह कुशवाह यांना उमेदवारी दिली आहे. गुना येथील विद्यमान खासदार कृष्णपाल सिंह यादव यांना हटवून केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना या जागेवरून उभे केले आहे. राजबहादूर सिंग यांच्या जागी लता वानखेडे यांना सागरमधून तिकीट देण्यात आले आहे.

भाजपने विदिशाचे खासदार रमाकांत भार्गव यांना हटवून मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना या जागेवरून उमेदवारी दिली आहे. सध्या प्रज्ञा सिंह पक्षाच्या खासदार असलेल्या भोपाळ मतदारसंघातून आलोक शर्मा उमेदवार असतील. पक्षाच्या उमेदवार अनिता नागर सिंह चौहान रतलाम (राखीव) जागेवरून निवडणूक लढवणार आहेत. गुमानसिंग डामोर हे सध्या या जागेवर भाजपचे खासदार आहेत.

– राजस्थानमध्ये 5 नवे चेहरे

राजस्थानमध्ये भाजपने लोकसभेच्या 25 पैकी 15 जागांसाठी नावांची घोषणा केली. राज्यातील 5 विद्यमान खासदार रंजिता कोळी, राहुल कासवान, देवजी पटेल, अर्जुन लाल मीना आणि कनकमल कटारा यांची तिकिटे रद्द करण्यात आली आहेत. त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांना पक्षाच्या खासदार प्रतिमा भौमिक यांच्याकडे असलेल्या त्रिपुरा पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने पश्चिम बंगालमधील अलीपुरद्वार (राखीव) जागेवरून मनोज तिग्गा यांना उमेदवारी दिली आहे जिथून जॉन बारला विद्यमान खासदार आहेत. यूपीमध्ये भाजपने 47 खासदारांना आणखी एक संधी दिली आहे, तर गमावलेल्या 4 जागांवर नवीन उमेदवारांना संधी दिली आहे.

तिकिटे कापलेल्यांपैकी माजी आरोग्यमंत्री हर्षवर्धन, प्रज्ञा ठाकूर जयंत सिन्हा गौतम गंभीर यांनीच सौम्य भाषेत प्रतिक्रिया व्यक्त केल्या. ते राजकारणातून बाजूला झाले. त्याच्या बातम्या झाल्या पण बाकी कोणीही फार मोठ्या प्रतिक्रिया व्यक्त केले असे घडले नाही. पण एवढ्या मोठ्या प्रमाणावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीत तिकिटे कापली गेली असती, तर इतक्या सौम्य प्रतिक्रिया उमटण्यापर्यंतच विषय थांबला असता का??, हा खरा सवाल आहे.

(राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे काका – पुतण्यांचे दोन्ही पक्ष. कारण आज जरी ते वेगळे झाले असले तरी प्रत्यक्षात त्यांची राजकीय संस्कृती एकच आहे आणि ती काँग्रेसी आहे. त्यामुळे लेखात “राष्ट्रवादी काँग्रेस” हा तात्विक पातळीवर एकच घटक गृहीत धरला आहे.)

BJP dropped 34 MPs from the first list, no sound of disesendance outside party, but if Congress – NCP cut the tickets sounds of disesendance have been much higher

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात