आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन
पुणे दि.२-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचे आणि उरळी देवाची येथील नगर रचना परियोजनेअंतर्गत विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. स्वातंत्र्य लढ्यामध्ये महत्वाचे योगदान देणाऱ्या आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारक तरुण पिढीला ऊर्जा देणारे ठरेल, असे प्रतिपादन यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी केले.The memorial of Adya Revolutionary Guru Lahuji Vastad Salve will give energy to the young generation – Chief Minister Eknath Shinde
संगमवाडी परिसरात आयोजित या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आदी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा वारसा पुढे नेणाऱ्या आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे भव्य स्मारक उभारले जात असल्याबद्दल आनंद व्यक्त करून मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, क्रांतीगुरू लहुजी वस्ताद यांच्या आदर्शानुसार चालणारे सरकार असल्याने सर्वसामान्यांसाठी अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आज करण्यात आले आहे. मातंग समाज प्रामाणिक आणि कष्टाळू आहे, दिलेला शब्द पाळणारा आहे. बार्टीप्रमाणे आर्टीची स्थापना करून सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचे कार्य केले आहे. त्यामुळे मातंग समाजातील मुलांना आता उच्च शिक्षण घेता येईल. स्पर्धेच्या युगात या समाजाला इतर समाजाच्या बरोबर विकासात सहभागी करून घेण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.
शासनाने नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात गड किल्ले , महापुरुषांच्या स्मारकासाठी तरतूद ठेवली आहे. नव्या पिढीला महापुरुषांच्या कार्य, बलिदानापासून प्रेरणा मिळावी यासाठी स्मारके उभारण्यात येत आहेत. भिडेवाडा येथे देखील सावित्रीबाई फुले यांचे स्मारक होत आहे. लहुजी वस्ताद यांच्या हातातील दांडपट्ट्याला शासनाने राज्य शस्त्राचा दर्जा दिला आहे. आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाच्या माध्यमातून मातंग समाजातील नव्या पिढीला प्रेरणा मिळण्यासोबत उच्च पदावर जाता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांनी क्रांतीची ज्योत हजारो मनात पेटवली असे सांगून उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, आज छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य वाढविणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाच्या भूमीपूजनानंतर छत्रपतींच्या मावळ्याच्या स्मारकाचे भूमिपूजन होत आहे याचा आनंद आहे. क्रांतीगुरू लहुजी वस्ताद यांनी शस्त्राने पारंगत वीर तयार करण्यासाठी देशातील शस्त्राचे प्रशिक्षण देणारी पहिली शाळा काढली म्हणून त्यांना आद्य म्हटले जाते. आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद यांनी क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके,लोकमान्य टिळक, महात्मा ज्योतिबा फुले यांना प्रशिक्षण दिले.
समाजातील विषमता दूर करण्याचे कार्य करणाऱ्या महात्मा फुले यांच्या पाठीशी ते भक्कमपणे उभे राहिले. १८५७ च्या स्वातंत्र्य समरात लहुजी वस्ताद साळवे यांनी प्रशिक्षित केलेले क्रांतिकारक लढत होते. देह ठेवण्यापर्यंत त्यांनी देशाची सेवा केली. अशा थोर क्रांतिकाराचे स्मारक रूपाने स्मरण करणे आवश्यक आहे. ही प्रेरणा सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी स्मारक उभारण्यात येत आहे. आता आर्टीची स्थापना करण्यासोबत आरक्षणात होणारा अन्याय दूर करण्यासाठी शासनाने समिती स्थापन केली आहे. येत्या काळात चिरागनगर मध्ये लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक उभारण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकासाठी अनेकांनी प्रयत्न केले. बहुजन समाजातून आलेल्या आणि आपल्या कर्तृत्वाने समाजाला दिशा देणाऱ्यांमधून लहुजी वस्ताद साळवे यांचे कार्य मोठे आहे. लहुजी वस्ताद साळवे यांचे घराणे पराक्रमी घराणे म्हणून प्रसिद्ध होते. लहुजी वस्ताद साळवे यांनी ही परंपरा राखत इंग्रजी सत्तेला आव्हान देण्याचे कार्य केले आणि तरुणांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण दिले. इंग्रजी सत्तेला उलथवून टाकण्यासाठी तरुणांच्या मनात विद्रोहाची ज्योत पेटवली. अशा थोर पुरुषाचे त्यांच्या कार्याला साजेसे स्मारक उभे राहणार आहे. पुढच्या पिढीला अभिमान वाटेल असे स्मारक उभारण्यात येईल.
लहुजी वस्तादांच्या कार्याची आठवण ठेवत तरुणांनी त्यांचा विचारा स्विकारावा, स्मारक विचाराचे केंद्र असतात. तरुणांनी महापुरुषांपासून चांगला विचार घ्यायला हवा. व्यायाम, शिस्त, सचोटी आणि शिक्षणाने मेंदू बळकट करीत अन्यायाविरुद्ध लढण्याची तयारी ठेवावी. क्रांतीवीर लहुजी वस्तादांसारख्यांच्या कार्यातून महाराष्ट्र उभा राहीला आहे. स्मारकाच्या रूपाने त्यांच्या कार्याचा ठेवा जपला जाईल, येणाऱ्या पिढ्यांना त्यातून प्रेरणा मिळत राहील. मातंग समाजाच्या कल्याणासाठी आर्टीसाठी तातडीने पाऊले उचलले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली. उरळी देवाची नगर रचना परियोजनेद्वारे ५-६ एकरात गरिबांसाठी घरे मिळतील,असेही ते म्हणाले.
मंत्री श्री.पाटील म्हणाले,आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे भव्य स्मारक असावे याची २० वर्षाची प्रतीक्षा पूर्ण झाली आहे. येत्या दोन वर्षात निधीची कोणतीही कमतरता पडू न देता स्मारकाचे काम पूर्ण करण्यात येईल. स्मारक पूर्ण झाल्यावर लहुजी वस्ताद साळवे यांचे कार्य लक्षात घेऊन उपक्रम राबवावे. नुकतेच अंदाजपत्रकात आर्टीची घोषणा करण्यात आली आहे, त्यामुळे मातंग समाजाच्या प्रगतीला गती मिळेल. समाजातील सुशिक्षित व्यक्तींनी शासनाच्या योजना शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले.
आमदार सुनील कांबळे आणि स्मारक समितीचे अध्यक्ष अशोक लोखंडे यांनीही यावेळी विचार व्यक्त केले.
प्रास्ताविक पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी केले. साडेपाच एकर जागा आरक्षित करण्यात आली असून स्मारकाच्या कामावर ११५ कोटी रुपये खर्च होणार आहे. त्यात म्युझिअम, आर्ट गॅलरी, वसतिगृह, वाचनालय, विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण हॉल आदी सुविधा असतील. परिसरात आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचा ३५ फूट उंचीचा पुतळा उभारण्यात येणार आहे. नगर नियोजन योजनेअंतर्गत उरळी देवाची येथे विकासकामे करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App