छत्रपती संभाजी महाराजांच्या लौकिकाला साजेशी स्मारकस्थळे उभारणार-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विशेष प्रतिनिधि 

पुणे : स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे वढू बुद्रुक येथील समाधी स्थळ व तुळापूर येथील बलिदान स्थळ ही पावन तीर्थक्षेत्रे असून ती अनेक पिढ्यांना त्यांची कीर्ती, शौर्य, पराक्रम यांची प्रेरणा आणि ऊर्जा देणारी ठरावीत यासाठी ही दोन्ही स्मारक स्थळे छत्रपती संभाजी महाराजांच्या लौकिकाला साजेशी असावीत यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. Chhatrapati Sambhaji Maharaj will build commemorative places

तुळापूर येथे स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ विकास भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, पुणे म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार सर्वश्री राहुल कुल, महेश लांडगे , अशोक पवार, पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, क्रीडा आयुक्त डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, छत्रपती संभाजी महाराजांनी मोगल, सिद्धी, पोर्तुगीज अशा अनेक परकीय सत्तांशी अखंड संघर्ष केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या स्वराज्याच्या पायाभरणीवर छत्रपती संभाजी महाराजांनी कळस चढविला. मराठा साम्राज्यापेक्षा १५ पट मोठे असणाऱ्या मोगल साम्राज्याला छत्रपती संभाजी महाराजांनी जेरीस आणले. त्यांनी अनेक लढाया केल्या. संपूर्ण जीवनात ते एकही लढाई हरले नाहीत.

छत्रपती संभाजी महाराज प्रखर धर्माभिमानी होते. धर्मकारण, अर्थकारण यात निर्विवाद वर्चस्व गाजवणारे छत्रपती संभाजी महाराज राजकारणात निपुण होते. त्याचबरोबर ते अत्यंत कुशल संघटकही होते. त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या खुणा आणि त्यांचा इतिहास जपणे हे सर्वांचे कर्तव्य आहे.

राज्य शासन छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या आदर्शावर महाराष्ट्राची प्रगती, विकास आणि राज्यकारभार करीत आहे. सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचे कार्य, त्यांच्या जीवनात बदल घडविण्याचे कार्य, बळीराजाच्या पाठीशी ठाम राहण्याचे कार्य आज महाराष्ट्र शासन करत आहे, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

गुलामीची बंधने झुगारून परकीय आक्रमणाला कणखर उत्तर देणारे धर्माभिमानी छत्रपती संभाजी महाराज यांच्यासारखा राजा होणे नाही, असे सांगून त्यांच्या बलिदानाने पावन झालेल्या या भूमीत विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, ज्यांच्या बलिदानाने मराठी माणसात जागृती निर्माण झाली, ज्यांनी मोघलांना सळो की पळो करून सोडले , अशा छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळाला व बलिदान स्थळाला भव्य स्वरूप देण्यासाठी आज विविध विकासकामांचे भूमिपूजन होत आहे याचा मनस्वी आनंद आहेचंद्र, सूर्य असेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांची प्रेरणा राहील- देवेंद्र फडणवीस. जोपर्यंत चंद्र व सूर्य आहेत तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे कार्य सर्वांनाच प्रेरणा देत राहील.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर हिंदवी स्वराज्य घशात घालण्याचे स्वप्न पाहणाऱ्या औरंगजेबाची कबर याच महाराष्ट्रात बांधावी लागली हे छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचे शूरवीर मावळे यांच्या कर्तृत्वाचे यश आहे, असे सांगून श्री.फडणवीस म्हणाले, ज्या काळात देशातील अनेक राजे रजवाडे औरंगजेबाला आणि मोगल सत्तेला शरण जात होते, त्यांचे मांडलिक होत होते त्या काळात प्राणाचे बलिदान देऊन छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षणासाठी लढत राहिले. धर्म, संस्कृती, राजकारण, राज्यकारभार, अर्थकारण, समाज व्यवस्था यावर छत्रपती संभाजी महाराजांची मते अत्यंत परखड होती. राजाने नेमके काय काम केले पाहिजे हे सांगणारे छत्रपती संभाजी महाराज होते, त्यांचाच आदर्श घेऊन केंद्र व राज्य शासन काम करीत आहे, असे त्यांनी सांगितले.

छत्रपती संभाजी महाराज स्मारक विकासाठी २६९ कोटींचा विकास आराखडा-उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाला साजेसे स्मारक शासनाच्या वतीने साकारण्याचा अनेक दिवसांचा संकल्प होता. स्मारक विकासाठी २६९ कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. तुळापूर येथे स्मारकासाठी आठ एकर जागा उपलब्ध झाली आहे. तर वढु बु. येथे दोन एकर जागा उपलब्ध झाली असून केईएम हॉस्पिटला देण्यात आलेली आणखी दोन एकर जागा ताब्यात घेऊन एकूण चार एकर जागेत छत्रपती संभाजी महाराजांचे समाधी स्थळ आणि परिसराची विकास कामे करण्यात येतील. या कामांतर्गत संग्रहालय, प्रशासकीय कार्यालय, वैद्यकिय कक्ष, सभागृह, स्मरणिका दुकाने, छत्रपती संभाजी महाराज यांचे ६० ते ६५ फुट उंच धातूचे प्रतिकात्मक शिल्प, अडीचशे मीटर लांबीचा वॉकींग प्लाझा, जीएफआरसी तंत्रज्ञानावर आधारित संभाजी महाराजांच्या जीवनपटाची, विचारधारांची व साहित्याची माहिती दर्शविणारे भित्तीचित्रे, भिमा नदीच्या घाटाचा विकास, बोटीचे फलाट विकसीत करणे आदी कामे करण्यात येणार आहेत.

श्री.पवार म्हणाले, येत्या ३० महिन्यात हे काम पूर्ण होईल. समाजासमोर आदर्श ठेवणारे जे महापुरुष होऊन गेले त्यांचे शौर्य, इतिहास नवीन पिढीला समजावा यासाठी ही स्मारक स्थळे सदैव प्रेरणादायी ठरतील. हे स्मारक दर्जेदार आणि अभिमानास्पद व्हावे यासाठी छत्रपती संभाजी महाराज यांच्या लौकिकाला साजेसे स्मारक उभे करत असताना शासन कुठेही कमी पडणार नाही, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमपूर्वी मान्यवरांच्या हस्ते वढु बु.येथील छत्रपती संभाजी महाराज समधीस्थळ विकास आणि तुळापूर येथील बलिदान स्थळ विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

Chhatrapati Sambhaji Maharaj will build commemorative places

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात