संत महंतांच्या लाठ्या काठ्या प्रसाद म्हणून स्वीकारू, पण गोदा आरती करूच; रामतीर्थ गोदावरी सेवा समितीची ठाम भूमिका!!

Ramtirth godavari seva samiti firm of performing godavari aarti!!

विशेष प्रतिनिधी

नाशिक : विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या श्री गंगा आरतीच्या धर्तीवर पवित्र श्री गंगा गोदावरी आरतीचा उपक्रम एका श्री शिवजयंती दिनापासून (19 फेब्रुवारी 2024) सुरू होत असून तिला वादाचे गालबोट लागत आहे. नाशिक मधल्या काही संत महंतांनी आणि पुरोहित संघाच्या काही सदस्यांनी लाठ्या काठ्या घेऊन रस्त्यावर उतरण्याची भाषा वापरली, त्या भाषेला रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले. संत महंतांच्या लाठ्या काठ्या आम्ही प्रसाद म्हणून स्वीकारू, पण गोदावरी आरती करूच, अशी भूमिका समितीने मांडली आहे. Ramtirth godavari seva samiti firm of performing godavari aarti!!

रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने काल पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेस अध्यक्ष जयंत गायधनी यांच्यासह उपाध्यक्ष नृसिंहकृपा दास, सचिव मुकुंद खोचे, कोषाध्यक्ष सौ. अशिमा केला, सदस्य डॉ. अंजली वेखंडे, प्रफुल्ल संचेती, राजेंद्र फड, चिराग पाटील आदी उपस्थित होते. यावेळी समितीने राज्य शासनाशी झालेल्या सर्व पत्र व्यवहाराचा खुलासा केला, तसेच राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या समवेत झालेल्या वेगवेगळ्या चर्चांचा तपशील सांगितला. गोदावरी सेवा समितीच्या उपक्रमांचा एक लघुपट यावेळी दाखविण्यात आला.

गंगा गोदावरी आरती संदर्भात आम्हाला कोणताही वाद उपस्थित करायचा नाही. समोरून पुरोहित संघ अथवा अन्य कोणीही लाठ्या काठ्यांची भाषा वापरली तरी आम्ही हिंदू समाजाच्या ऐक्य टिकविण्यासाठी त्यांच्याशी कोणताही संघर्ष करू इच्छित नाही. उलट धार्मिक विधी पुरोहित संघाच्या पुढाकाराने होऊन गोदावरी आरती व्हावी, अशी रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे मूळ भूमिका होती आणि आहे. परंतु पुरोहित संघ आणि काही लोकांनी या भूमिकेला प्रतिसादच दिला नाही, असे समितीचे अध्यक्ष जयंत गायधनी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

पत्रकार परिषदेतले महत्त्वाचे मुद्दे असे

– महाराष्ट्र शासनाने देखील पुढाकार घेऊन या उपक्रमाला सक्रिय चालना दिली आहे. समस्त नाशिककर श्री गंगा गोदावरी आरती उपक्रमाचे मनापासून स्वागत करत असून प्रत्यक्ष उपक्रमात सहभागी होण्यासाठी त्यांनी उत्साह दाखविला आहे.

– रामतीर्थ गोदावरी सेवा समिती गंगा गोदावरी आरतीच्या उपक्रमात अग्रक्रमाने सम्मिलित होत असून समस्त नाशिककरांची प्रतिनिधी या नात्याने नाशिक मधील सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन नियमितपणे आरतीचे आयोजन करणार आहे. दुतोंड्या मारुतीपाशी व्यासपीठ उभारून येथे 19 फेब्रुवारी रोजी गंगा गोदावरी आरती आणि अन्य सांस्कृतिक कार्यक्रम होऊन या आरतीची नियमित सुरुवात करणार आहोत.

– गंगा गोदावरी आरतीचा उपक्रम नाशिक बरोबरच गोदावरी तीरावरील विविध गावांमध्ये सर्व समाजाला बरोबर घेऊन पुढे नेण्याचा समितीचा प्रयत्न आहे. गोदावरी आरतीचा उपक्रम संपूर्ण समाजाचा असून त्या निमित्ताने सामाजिक समता आणि समरसतेचा संदेश संपूर्ण समाजात पसरावा आणि त्यातून समाज कल्याणची प्रेरणा मिळावी हा यामागचा समितीचा हेतू आहे.

– स्थानिक विरुद्ध बाहेरचे अथवा कोणत्याही वादामध्ये अथवा राजकीय हस्तक्षेपामध्ये गोदावरी आरती सारखा पवित्र उपक्रम अडकू नये, अशी समितीची मनापासूनची भावना आहे. गंगा गोदावरी तीर्थक्षेत्रावरील अन्य धार्मिक आणि सामाजिक उपक्रम करण्याचे अधिकार अथवा कर्तव्य याच्याशी रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचा संबंध नाही किंवा कुठल्याही वंशपरंपरागत अधिकारांमध्ये हस्तक्षेप करण्याचा समितीचा इरादाही नाही.

– रामतीर्थ गोदावरी सेवा समिती ही समाजतल्या सर्व घटकांना आपल्या बरोबर घेऊन चालणारी आणि सर्व समाजांना प्रतिनिधित्व देणारी समिती आहे. समितीच्या या गोदावरी आरतीच्या उपक्रमातून समस्त हिंदू समाज जोडला जावा. त्यातून विधायक कार्याला प्रेरणा मिळावी आणि गंगा गोदावरीचे अध्यात्मिक, धार्मिक आणि सामाजिक महत्त्व अधोरेखित व्हावे हा समितीचा प्रयत्न आहे.

वंशपरंपरागत पुरोहितांकडेच या आरतीची व्यवस्था सोपवावी. इतरांचा या आरतीशी काहीही संबंध नाही, अशी भूमिका घेत पुरोहित संघाच्या काही सदस्यांनी नाशिक मधील संत महंतांना भडकविण्याचे प्रयत्न केले. परंतु, वंश परंपरागत पुरोहितांच्या आरतीला रामतीर्थ गोदावरी समितीचा विरोध नाही. उलट समाजातल्या सर्व घटकांना बरोबर घेऊन गोदावरी आरतीचा उपक्रम वाढावा, त्याचा विस्तार व्हावा गोदावरीच्या तीरावर अनेक घाटांवर आरत्या व्हाव्यात आणि समस्त हिंदू समाजाने त्यात सहभागी व्हावे ही समितीची सामाजिक समरसतेची मूलभूत भूमिका आहे.

– रामतीर्थ गोदावरी समितीच्या दोन सदस्य चंद्रशेखर पंचाक्षरी आणि प्रतीक शुक्ल यांनी राजीनामे दिल्याची बातमी आली असली तरी त्यांनी तसे राजीनामे देऊ नयेत. सामंजस्याची भूमिका घेऊन समितीचे काम करावे, अशीच आजही समितीची भूमिका आहे.

– पण नाशिक मध्ये गंगा गोदावरीची आरती करण्याचा अधिकार फक्त वंश परंपरेच्याच पुरोहितांचाच आहे. इतरांचा नाही. त्यामुळे शासकीय निधीतून होणारी आरती गंगा गोदावरीचे वंशपरंपरेचेच पुरोहितच करतील. इतरांनी त्यात हस्तक्षेप करू नये, अशी भूमिका पंचकोटी पुरोहित संघाने घेतली. अर्थात या भूमिकेशी नाशिक मधले बहुसंख्य तीर्थपुरोहित सहमत नाहीत. उलट गोदावरीची आरती तीर्थपुरोहितांसह अन्य सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन सर्वसमावेशक पद्धतीनेच करावी, अशी भूमिका बहुसंख्य तीर्थपुरोहितांनी देखील घेतली. रामतीर्थ गोदावरी सेवा समिती देखील याच भूमिकेचा पुरस्कार करते.

मूळात आरतीसाठी शासनाने कुठलाही स्वतंत्र निधी दिलेलाच नाही. जनतेकडून निधी गोळा करून ही आरती नियमितपणे करायची आहे. रामतीर्थ गोदावरी सेवा समितीकडे सध्या 5 लाखांचा निधी उपलब्ध आहे. तो समितीच्या काही सदस्यांनी स्वखर्चातून दिला आहे. दररोजच्या नियमित आरतीसाठी महिन्याला साधारण 50 ते 60 हजार रुपये खर्च येणे अपेक्षित आहे हा निधी जनतेकडूनच गोळा करण्यात येणार आहे.

रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने जनतेकडून निधी गोळा करावा आणि तो पुरोहित संघाला द्यावा ही पुरोहित संघाची भूमिका समितीला मान्य होणे शक्य नव्हते. कारण गेल्या काही वर्षांपासून पुरोहित संघाचे ऑडिटच झालेले नाही अशा संस्थेकडे रामतीर्थ गोदावरी सेवा समिती जनतेकडून घेतलेल्या निधी कसा काय सोपवू शकते??, हा खरा प्रश्न आहे.

गंगा गोदावरी क्षेत्री येऊन लाखो भाविक आपली विविध धार्मिक कृत्ये करतात. त्या निमित्ताने पुरोहितांपासून अनेक समाज घटकांना विविध व्यवसाय आणि रोजगार त्यातून मिळतात. या व्यवसाय – रोजगारामध्ये हस्तक्षेपाचा समितीचा कोणताही इरादा नाही.

श्री गंगा गोदावरी आरती सारखा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रासाठी ललामभूत ठरणारा आहे. नाशिक आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान ठरणारी गोदावरी आरती अधिक भव्य दिव्य आणि सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने रामतीर्थ गोदावरी समिती आपल्या प्रयत्नांमध्ये कोणतीही कसूर ठेवणार नाही, अशी आम्ही ग्वाही देतो.

Ramtirth godavari seva samiti firm of performing godavari aarti!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात