विशेष प्रतिनिधी
मुंबई : सुरजागड इस्पात प्रा. लि. ने गडचिरोलीत ग्रीनफिल्ड इंटिग्रेटेड स्टील प्रकल्प स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी ते 10,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. विदर्भ विशेषत: गडचिरोलीसाठी ही प्रगतीची मोठी संधी आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठपुराव्याला हे मोठे यश आल्याचे मानले जात आहे. Surjagad will make Ispat Gadchiroli through the efforts of Devendra Fadnavis
सुरजागड इस्पात प्रा. लि.चे अध्यक्ष सुनील जोशी यांनी आज सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली आणि यावेळी याबाबत अत्यंत सकारात्मक चर्चा झाली. या प्रकल्पाच्या माध्यमातून 8000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत. या प्रकल्पात जागतिक दर्जाचे उत्पादनविषयक तंत्रज्ञान राहणार असून, पर्यावरण रक्षण हा त्याचा मुख्य गाभा असेल. त्यामुळे हा संपूर्णत: पर्यावरणपूरक स्टील प्रकल्प राहणार आहे, अशीही माहिती यावेळी सुनील जोशी यांनी दिली.
गडचिरोलीच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील असून, या भागात रोजगार निर्मितीसाठी सुद्धा सातत्याने प्रयत्न होत आहेत. गडचिरोलीत देशाचे पोलाद हब होण्याची क्षमता आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी सर्वतोपरी मदत राज्य सरकारतर्फे करण्यात येईल, अशी हमी यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सुनील जोशी हे दावोस परिषदेत सुद्धा सहभागी होणार असून, तेथे ते राज्य सरकारसोबत सामंजस्य करार सुद्धा करणार आहेत.
गडचिरोलीत विविध पायाभूत सुविधा प्रकल्प आणि मोठ्या प्रमाणात गुंतवणूक यावी, यासाठी नेहमीच देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार राहिला आहे. कोनसरी येथे एका प्रकल्पाचे उदघाटन आणि दुसर्या टप्प्याचे भूमिपूजन सुद्धा लवकरच होणार आहे. फडणवीस मुख्यमंत्री असताना या कोनसरी प्रकल्पाची पायाभरणी झाली होती. आता या नव्या गुंतवणुकीतून गडचिरोली आणि पर्यायाने विदर्भाच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App