INDI आघाडीच्या घटक पक्षांचे मोदी विरोधात सुरू असलेले सध्याचे एकूण राजकारण पाहता फक्त बैठका, पत्रकार परिषदा आणि नॅरेटिव्ह सेटिंग मध्ये विरोधकांचे राजकारण अडकले, पण पक्षात नेते आणि कार्यकर्त्यांना रोखून धरण्याचे बांध मात्र फुटले!!, अशी स्थिती आली आहे. कारण INDI आघाडीतली कुठलेच घटक पक्ष आपल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना आपल्याच पक्षांमध्ये रोखून धरण्यात अपयशी ठरत आहेत. Opposition only indulged in meetings, press conferences and narrative setting, doesn’t making real strategy to defeat PM Modi
वास्तविक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बलाढ्य भाजप सरकारला पराभूत करण्यासाठी तितकीच तगडी लढत देणारे देणारी नेतृत्वाची फळी INDI आघाडीने उभी केली पाहिजे. मोदींना हरवण्यासाठी खऱ्या अर्थाने डावपेचात्मक रणनीती आखली पाहिजे. या रणनीतीची तोड मोदींना निवडणुका होईपर्यंत सापडतात कामा नये, अशा पद्धतीची राजकीय व्यवहरचना INDI आघाडीला करता आली पाहिजे, तर आणि तरच खऱ्या अर्थाने मोदींवर मात करता येऊ शकेल, ही आजची वस्तुस्थिती आहे. परंतु यापैकी कुठलाही प्रयत्न न करता त्याऐवजी फक्त INDI आघाडीच्या नेत्यांच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये जाऊन 5 स्टार हॉटेलमध्ये बैठका घेणे, रोजच्या पत्रकार परिषदा घेणे त्यातून विशिष्ट नॅरेटिव्ह सेटिंग करण्याचा प्रयत्न करणे यापलीकडे कोणतेच राजकारण साधताना विरोधी नेते दिसत नाहीत.
वास्तविक विरोधकांकडे मातब्बर नेते नाहीत, असे बिलकुल नाही. उलट ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, एम. के. स्टालिन, सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, शरद पवार यांच्यासारखे तगडे नेते आहेत, पण प्रश्न फक्त हा आहे, की ते मनापासून कधीच एकत्र येऊ शकत नाहीत. मोदींना हरविण्यासाठी आवश्यक असलेली किमान पातळीची रणनीती देखील ते एकत्र बसून आखू शकत नाहीत. रणनीती आखणे तर सोडाच, पण या पक्षाच्या या बड्या नेत्यांकडे आपलेच नेते आणि आपले कार्यकर्ते आपल्याच पक्षात रोखून धरण्याची क्षमता देखील उरलेली नाही, ही वस्तुस्थिती आहे.
भाजपने आपले राजकारण साधून घेण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष फोडले हे खरेच, पण ते फुटण्यामागे भाजपची एवढी राजाकीय ताकद आहे, त्यापेक्षाही त्या दोन्ही पक्षांचे बडे नेते राजकीय दृष्ट्या दुबळे आहेत, हे खरे कारण आहे. आपल्याच नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना उभारी देण्यासाठी त्यांना काही देण्याची या बड्या नेत्यांकडे क्षमताच नाही.
शरद पवार हे नेहमी गांधी परिवाराला काँग्रेस मधला “सिमेंटिंग फोर्स” असे म्हणतात. कारण सिमेंट हे बांधकामात स्टील, विटा, लाकूड आदी साहित्याला सांधून ठेवण्याचे काम करते. गांधी परिवार काँग्रेसमधल्या विविध घटक, विविध नेत्यांना एकत्र बांधून ठेवण्याचे काम करतो. या अर्थाने गांधी परिवार हा काँग्रेस मधला “सिमेंटिंग फोर्स” आहे, असे पवार म्हणत असतात, पण खुद्द त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार हे “सिमेंटिंग फोर्स” उरलेले नाहीत. उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे “सिमेंटिंग फोर्स” उरलेले नाहीत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये एकही नेता “सिमेंटिंग फोर्स” होण्याच्या दर्जाचा नाही. अन्यथा त्यांच्या पक्षातून मिलिंद देवरांसारखा तरुण आणि अनुभवी नेता माजी खासदार निवडणुकीच्या ऐन तोंडावर पक्षाचा राजीनामा देऊन बाहेर पडला नसता.
शिवसेनेत देखील उरलेले आमदार खासदार उद्धव ठाकरेंना सोडून जाण्याचे निमित्त विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निकालाने उघडपणे दिले आहे. उद्धव ठाकरेंमध्ये किंवा संजय राऊत मध्ये, अगदी शरद पवारांमध्ये देखील “अँटी सिमेंटिंग फोर्स” डेव्हलप झाल्याची ही चिन्हे आहेत. पक्षात आपल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना रोखून धरणे हे निवडणुकीतल्या यशाचे खरे गमक ठरू शकते. परंतु नेमकी हीच क्षमता हे नेते गमावून बसले आहेत. मोदींच्या विरोधात खऱ्या अर्थाने डावपेचात्मक राजकारण करण्याची त्यांची ताकद उरलेली नाही.
… अन्यथा आत्तापर्यंत INDI आघाडीच्या नेत्यांनी 4 प्रत्यक्ष आणि 1 ऑनलाईन अशा 5 बैठका घेऊनही त्यांना जागा वाटपाचा प्रश्न सोडवता आलेला नाही. त्या उलट कालच्या INDI आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत ममता बॅनर्जी आणि अखिलेश यादव या मातब्बरांनी दांडी मारून मल्लिकार्जुन खर्गे आणि नितीश कुमार यांना आपला असलेला विरोध दाखवून दिला. लोकसभेच्या सुमारे 175 जागांवर काँग्रेससाठी मोठी समस्या उभी केली.
*
INDI आघाडीतल्या नेत्यांना खरंच काँग्रेसला मदत करायची असती आणि मोदींना हरवायचे असते, तर INDI गाडीतल्या नेत्यांनी खऱ्या अर्थाने रणनीती आखली असती, मोदींना तोडीस तोड डावपेचांमध्ये अडकवले असते, मुख्य म्हणजे नुसत्या बैठका, पत्रकार परिषदा आणि नॅरेटिव्ह सेटिंग असल्या किरकोळ बाबींमध्ये विरोधक अडकले नसते, पण ज्या अर्थी ते त्यात अडकलेत, त्याअर्थी विरोधकांना खऱ्या अर्थाने मोदींना हरवण्याची इच्छाच नाही, हेच यातले “अधोरेखित” आहे!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App