ब्युटी टिप्स देऊन आणि कॅंडी क्रश खेळून मोदींना आव्हान देता येईल का?? काँग्रेस नेते गंभीर कधी होणार??, हे सहज दिलेले शीर्षक नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान द्यायला निघालेल्या काँग्रेस नेत्यांच्या करतूतीनच हे शीर्षक सुचले आहे. Will Congress be able to challenge Modi by beauty tips and candy crush??; when will opposition become serious??
मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगण आणि मिझोरम या पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. भाजपने तिथे 150 पेक्षा जास्त उमेदवार आधीच जाहीर केले आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस उमेदवारांची यादी अजूनही गुलदस्त्यात आहे. काँग्रेस अद्याप म्हणजे 11 ऑक्टोबर 2023 पर्यंत एकही उमेदवार यादी प्रसिद्ध करू शकलेली नाही. काँग्रेसने फक्त बैठकांचा सिलसिला नुकताच सुरू केला आहे.
पण काल राहुल गांधींनी जयपूरचा दौरा करून तिथल्या महाराणी कॉलेजला भेट दिली आणि विद्यार्थिनींशी गप्पा मारताना त्यांना ब्युटी टिप्स दिल्या. आपण चेहऱ्याला साबण लावत नाही. क्रीम लावत नाही. फक्त पाण्याने चेहरा धुतो, असे ते म्हणाले. काँग्रेस पक्षाच्या कार्यामध्ये आपण एवढे मग्न आहोत की आपल्याला लग्न करायला वेळच झाला नाही, असे उत्तरही त्यांनी एका विद्यार्थिनीला दिले. हे झाले राहुल गांधींचे “कम्युनिकेशन स्किल”!!, त्यावर आक्षेप असायचे कारण नाही.
पण त्या पलीकडे जाऊन ज्यावेळी पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजप 150 पेक्षा जास्त उमेदवार जाहीर करून बसतो, त्यावेळी काँग्रेस नेत्यांची ही जबाबदारी नाही का??, की त्यांनी भाजपच्या पुढचे एक पाऊल टाकून आपले उमेदवार निश्चित करून त्यांना पुढे चाल द्यावी!!… पण तसे काही घडले नाही.
उलट राहुल गांधी एकतर जाहीर सभांमध्ये भाषणे करतात किंवा “कम्युनिकेशन स्किल” दाखवत ब्युटी टिप्स सारख्या निम्नस्तराच्या गोष्टी करतात.
राहुल गांधी म्हणाले- काँग्रेशासित राज्यांत जातनिहाय जनगणना करणार, जिथे सरकार येईल, तिथे करू
हे झाले राहुल गांधींचे, पण ज्यांच्यावर मुख्यमंत्रीपदाची प्रत्यक्ष जबाबदारी आहे, ते छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल तरी दुसरे काय करतात?? ते कॅंडी क्रश खेळतात. भूपेश बघेल यांचा कॅंडी क्रश खेळतानाचा एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल झाला आहे. त्यावरून भाजप नेत्यांनी त्यांची खेचली. त्यावेळी कॅंडी क्रश हा माझा सर्वात आवडता खेळ आहे, असे प्रत्युत्तर भूपेश बघेल यांनी भाजपच्या नेत्यांना दिले. हे उत्तरही सगळीकडे व्हायरल झाले. काँग्रेस नेत्यांनी त्यावर टाळ्या पिटल्या.
पण ज्या छत्तीसगडची विधानसभा निवडणूक जाहीर झाली तिथे भाजपने 90 पैकी 54 उमेदवार जाहीर करून झाले, पण काँग्रेसचा अजून एकही उमेदवार जाहीर झालेला नाही. उलट काँग्रेसची उद्या म्हणजे 12 ऑक्टोबरला बैठक होऊन कदाचित पक्षाची पहिली उमेदवारी यादी जाहीर होईल, असे वक्तव्य कालच छत्तीसगडच्या प्रभारी कुमारी शैलजा यांनी केले. कॅंडी क्रश खेळणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या राज्यातली काँग्रेसच्या उमेदवार यादीची ही अवस्था आहे.
काँग्रेसचे नेते पंतप्रधान मोदींच्या भाजपला आव्हान देण्याची भाषा जरूर करतात. त्यासाठी सोशल मीडियापासून जाहीर सभांपर्यंत भाषणे जरूर करतात, ते केलेच पाहिजे, पण महत्त्वाच्या आणि गंभीर मुद्द्यांवर ते कुठे बोलतानाच दिसत नाहीत. उलट फक्त राहुल गांधींना जे मुद्दे गंभीर वाटतात, ते अदानी – अंबानी यांच्यासारखे सामाजिक पातळीवरचे गैरलागू मुद्दे ते बोलत राहतात आणि मोदींनी 33 % महिला आरक्षणासारखा काँग्रेसचाच मुद्दा उचलून गुगली टाकली, की जातनिहाय जनगणनेचा राजकीय फुगा फुगवतात!! त्यापलीकडे काँग्रेसकडे मोदींना भिडण्याची कोणतीही गंभीर स्ट्रॅटेजीच नाही.
वास्तविक मोदींना भिडण्यासाठी, मोदींना अडचणीत आणण्यासाठी कितीतरी मुद्दे आज अस्तित्वात आहेत. कृषीमाल निर्यातीवर लावलेले 40 % निर्यात शुल्क, या गंभीर मुद्द्यावर कृषी क्षेत्रात ग्राउंड लेव्हलवर काम करणारे अधिकारी आणि कार्यकर्ते चिंता व्यक्त करतात, पण त्यावर ना काँग्रेस नेते बोलतात, ना माजी कृषिमंत्री बोलतात, ना त्यांची राष्ट्रवादी बोलते!!
ते काहीही बोलले, तर फक्त स्थानिक वर्तमानपत्रे आणि वृत्तवाहिन्या त्यांचा “पॉवर गेम” म्हणून उदो उदो करतात, पण जो मुद्दा थेट मोदी सरकारला टोचायला पाहिजे, तो तिथे नेऊन टोचण्याची या पक्षाच्या नेत्यांची क्षमताच नाही. ते फक्त पुतण्याला सत्तेच्या वळचणीला पाठवून मुलीसाठी स्वतःचा पक्ष मोकळा करून देण्याच्या मागे लागले आहेत.
कृषीमालावरचे निर्यात शुल्क 40 % आणि देशातल्या सर्व श्रीमंतांच्या इन्कम टॅक्स वरचा सर्वात मोठा स्लॅब 30 % यातली विसंगती काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा बाकीचे विरोधी पक्ष जनतेसमोर आणतच नाहीत. वास्तविक पाहता या मुद्द्यावरून सर्व विरोधकांनी रान उठवायला हवे होते, ते घडले नाही.
जसा मुद्दा कृषीमालावरच्या जादा निर्यात शुल्काचा, तसाच डोमेस्टिक सेविंग म्हणजे कुटुंबांची आर्थिक बचत घसरण्याचा मुद्दा आहे. देशाच्या आर्थिक प्रगतीचा डंका वाजत असताना डोमेस्टिक सेविंग तब्बल 19 % घसरण्याची गंभीर घटना घडते आहे. तब्बल 45 कोटी जनतेवर परिणाम करणारा हा विषय आहे. कारण डोमेस्टिक सेविंग किंवा कौटुंबिक बचत हा प्रामुख्याने महिला केंद्रित विषय आहे. पण त्याकडे काँग्रेस सह कुठल्याही विरोधी पक्षाचे लक्षच नाही. बँकिंग क्षेत्रातील संवेदनशील उच्चपदस्थ अधिकारी याकडे आवर्जून लक्ष वेधतात, पण संसदेच्या विशेष अधिवेशनात किंवा सर्वसाधारण अधिवेशनात काँग्रेस सह बाकीचे विरोधक त्या विषयाला स्पर्श देखील करत नाहीत.
अर्धे कच्चे विषय, अर्धे कच्चे ज्ञान आणि बोथट हत्यारे या आधारावर काँग्रेस सह सर्व विरोधक मोदींना आव्हान देऊ इच्छित आहेत. मोदींना आव्हान देणे बिलकुलच कठीण नाही, पण त्यासाठी अभ्यास मात्र तगडा पाहिजे. मोदी ज्या तयारीने निवडणुकीत उतरतात, त्यापेक्षा जास्त तयारी विरोधकांची पाहिजे. पण नेमके इथेच विरोधक कमी पडतात… आणि यातच मोदींच्या यशापेक्षा सर्व विरोधकांच्या अपयशाची बीजे दडली आहेत!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App