बाळासाहेबांच्या मागे उद्धव ठाकरेंनी 10 वर्ष शिवसेना एकसंध ठेवली. पण सुप्रिया सुळे यांना कार्यकारी अध्यक्ष झाल्यावर महिनाभर देखील राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध ठेवता आली नाही, असाच राजकीय संदेश आज संपूर्ण महाराष्ट्रभर गेला आहे.Balasaheb, Uddhav maintained Shiv Sena for 10 years, after Supriya Sule became working president, NCP split in just a month!!
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित दादांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्याबरोबर 9 मंत्र्यांनी शपथ घेतली आणि त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे 35 ते 40 आमदार राजभवनात उपस्थित होते. याचा अर्थ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली असून अजितदादांनी आपल्या समर्थकांसह शिंदे – फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात प्रवेश केला आहे.
यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया फार बोलकी आहे. कर्तृत्ववान व्यक्तीला दुय्यम स्थान दिले की असे घडते, हे महाराष्ट्रने आधी पाहिले. आज ते पुन्हा घडले आहे. अजितदादांनी विकासाला साथ देत आमच्याबरोबर येण्याचा निर्णय घेतला. त्याचे आम्ही स्वागत करतो, असे एकनाथ शिंदे म्हणाले. याचा अर्थच एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांच्या सुप्रिया सुळे यांना कार्यकारी अध्यक्ष करण्याच्या निर्णयावर टोला हाणला.
बाळासाहेब ठाकरे यांनी बाकीच्या सर्व नेत्यांना बाजूला सारून आपले पुत्र उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेची सूत्रे दिली होती, तेव्हा शिवसेनेत फूट पडली नाही. 2012 मध्ये बाळासाहेबांच्या निधनानंतर देखील शिवसेनेत फूट पडली नाही, तर 2022 मध्ये उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकीर्दीत उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाशी गद्दारी केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. याचा अर्थ बाळासाहेबांच्या निधनानंतर तब्बल 10 वर्षे उद्धव ठाकरेंनी शिवसेना पक्ष आपल्या नियंत्रणाखाली एकसंध ठेवला होता. पण खासदार सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष होऊन अजून 1 महिना सुद्धा उलटला नाही, तोच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली दोन तृतीयांश आमदार अजितदादांसमवेत निघून गेले, हेच चित्र महाराष्ट्रभर निर्माण झाले आहे.
संजय राऊत शरद पवारांशी बोलले. आपण भक्कम आहोत आणि उद्धव ठाकरे यांच्या साथीने आपण परत महाविकास आघाडी उभी करू, अशी ग्वाही शरद पवारांनी आपल्याला दिल्याचे वक्तव्य संजय राऊत यांनी केले, हे खरे मानले तरी शरद पवारांच्या हयातीतच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन तृतीयांश फूट पडली आणि ती देखील सुप्रिया सुळे कार्यकारी अध्यक्ष बनल्यानंतर अवघ्या महिनाभरात फूट पडली, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App