विशेष प्रतिनिधी
पुणे : राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि एका नागरिकाला झालेल्या मारहाण प्रकरणी वादग्रस्त बनलेले जितेंद्र आव्हाड यांना अपशब्द वापरणारे सतीश कुलकर्णी हे पोलिस अधिकारी अथवा पुणे पोलिसांत कोणत्याही पदावर नियुक्तीस नसल्याचे पुणे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
राष्ट्रवादी युवक आघाडीचे प्रदेश सचिव सुहास गाडेकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. सतीश कुलकर्णी या नावाने असलेल्या एका फेसबुक खात्याचा दाखला देऊन गाडेकर यांनी लिहिले होते, की स्वारगेट पोलिस स्टेशनचे पीएसआय सतीश कुलकर्णी यांनी जितेंद्र आव्हाडांबाबत केलेली कमेंट पहा. जनतेचे सेवक व अधिकारी हे लोकप्रतिनिधीवर अशी भाषा वापरत असतील तर कारवाई अपेक्षित आहे. सोबत त्यांनी सतीश कुलकर्णी यांचे आक्षेपार्ह असलेली पोस्टसुद्धा शेअर केली होती. त्याची तातडीने दखल घेऊन पुणे पोलिसांनी लगेचच ट्विट केले आणि खुलासा करताना लिहिले आहे, की पुणे शहर पोलिस आयुक्तालयात अथवा स्वारगेट पोलिस स्टेशनमध्ये सतीश कुलकर्णी नावाचे कोणीही अधिकारी नेमणूकीस नाहीत. त्यावर आव्हाड यांनी पुणे पोलिसांची बदनामी करणारे हे फेसबुक अकाऊंट कोणी चालू केले, अशी विचारणा केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सतीश कुलकर्णी या नावाची एक व्यक्ती सुमारे साडेतीन वर्षांपूर्वी पुण्यातील स्वारगेट पोलीस ठाण्यातून पोलिस उपनिरीक्षक पदावरुन निवृत्त झाली आहे. मात्र ट्वीट करणारी व्यक्ती आणि निवृत्त व्यक्ती या दोन्ही एकच आहेत का, याची खातरजमा अद्याप झालेली नाही.
काही दिवसांपुर्वी आव्हाड यांच्या बंगल्यावर एका अभियंत्याला आव्हाड यांचे अंगरक्षक आणि इतरांनी मिळून बेदम मारहाण केल्याची तक्रार दाखल आहे. खुद्द आव्हाड यांच्या उपस्थितीत ही मारहाण झाल्याचा आरोप आहे. आव्हाड आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काहींनी या मारहाणीचे समर्थन केले. कॅबिनेट मंत्र्यांच्या उपस्थितीत, त्याच्याच घरी कायदा हातात घेऊन बेदम मारहाण झाल्याच्या घटनेवर सोशल मीडियात मात्र जोरदार टीका होत आहे. आव्हाड यांनी एकीकडे इन्कार केला आहे, तर दुसरीकडे खेदही व्यक्त केला आहे. दुसरीकडे आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचे आव्हाड यांचे म्हणणे आहे.