विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने उठवून सर्वसामान्य व्यवहार सुरू झाले तरी उद्योगक्षेत्राचे चक्र फिरायला लागण्यास कमीत कमी तीन महिन्यांचा कालावधी लागेल, अशी चिन्हे आहेत. पायाभूत सुविधा क्षेत्र, औद्योगिक उत्पादन क्षेत्र आणि बांधकाम क्षेत्र यांचा यात समावेश आहे. ही क्षेत्रे सुरू करण्याचा रोडमॅप फिक्की आणि असोचाम यांनी तयार केला आहे. आर्थिक मंदीमुळे रोख रकमेची कमतरता, कामगारांचे स्थलांतर आणि मागणी – पुरवठ्याचे असंतूलन या प्रमुख आव्हानांना या क्षेत्रांना तोंड द्यायचे आहे. बांधकाम क्षेत्रात तर मागणीचे घटलेले प्रमाण ही सर्वाधिक चिंतेची बाब आहे. फिक्की, असोचाम या औद्योगिक आणि व्यापार संस्थांनी केलेल्या अभ्यास आणि सर्वेतून वरील निष्कर्ष पुढे आले आहेत. चीनी व्हायरसच्या प्रादूर्भावाशी दीर्घकालीन लढाई लढावी लागेल, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे याचा अर्थ त्याच्या वैद्यकीय परिमाणांबरोबरच आर्थिक परिणामाशीही जोडला पाहिजे कारण आर्थिक क्षेत्रापुढील आव्हाने अधिक दीर्घकालीन आहेत, असे असोचामचे सरचिटणीस दीपक सूद यांनी नमूद केले आहे. कामगारांनी मोठ्या प्रमाणावर स्थलांतर केल्याने त्यांना परत कामावर आणणे हे अनौपचारिक क्षेत्रासाठी जिकीरीचे काम ठरेल कारण लॉकडाऊन टप्प्या टप्प्याने उठविले तरी भारत त्या वेळी कदाचित कोविड १९ च्या तिसऱ्या टप्प्यात पोचलेला असेल. कोविड १९ सामाजिक संक्रमणाच्या धोक्याला तोंड देत कामगार परत कामावर येतील किंवा त्यांना आणावे लागेल. ऑटोमोबाईल, रिटेल, गारमेंट, ज्वेलरी, हॉस्पिटँलिटी, टूर्स अँड ट्रँव्हल्स या क्षेत्रांची चक्रे फिरण्यास तर तीन महिन्यांपेक्षा कितीतरी अधिक कालावधी लागेल. कायमच्या नोकऱ्या किंवा कॉन्ट्रँक्ट लेबर यांची ही क्षेत्रे असल्याने त्यांना नोकर कपात आणि त्यांच्या आर्थिक तरतुदीच्या आव्हानांचा सामना करावा लागेल, असे मत संदीप शहा यांनी नोंदविले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App