राष्ट्रवादी काँग्रेस पंचविशीत प्रवेश करत असताना शरद पवारांनी अखेर पक्षाचा सांधा बदलला. मराठीतले एक गीत आहे, “शब्दावाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले”, हेच शरद पवारांनी थोडे वेगळ्या भाषेत सादर केले, ते म्हणजे “शब्दासह साध्य केले, अर्धे मनातले”!! NCP@25 : sharad pawar could do only half of his mind in rearranging NCP leadership
शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष पदाची जबाबदारी विभागून खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे सोपवली. त्याच वेळी अजितदादा पवारांची राजकीय गाडी साईडिंगला टाकून दिली. कारण सुप्रिया सुळे कार्यकारी अध्यक्ष पदाबरोबरच महाराष्ट्राच्या प्रभारी म्हणूनही पद सांभाळणार आहेत आणि इथेच शरद पवारांनी “अर्धे मनातले” साध्य केले आहे. किंबहुना ते “मनातले अर्धेच” साध्य करू शकले आहेत!!
कार्यकर्त्यांना दिल्लीत “कात्रजचा घाट”
कारण शरद पवारांनी आपल्या निवृत्ती नाट्याचा प्रयोग मुंबईत विस्तारित आत्मचरित्राच्या प्रकाशन समारंभात केला होता. त्याचवेळी सुप्रिया सुळे या आपल्या राजकीय वारसदार असतील असे अपेक्षित असताना देखील ते घोषित करू शकले नव्हते. मुंबईतल्या आणि महाराष्ट्रातल्या कार्यकर्ते आणि नेत्यांनी त्यावेळी शरद पवारांचा तो प्रयत्न एक प्रकारे रोखून धरला होता. पण शरद पवारांनी अखेर आपल्याच महाराष्ट्रातल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना दिल्लीतल्या कार्यक्रमात “कात्रजचा घाट” दाखवला आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पंचविसाव्या वर्धापन दिन कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून घोषणा करून टाकली. पण हे करताना देखील त्यांनी ते कार्यकारी अध्यक्षपद अतिशय सावधगिरीने खंदून प्रफुल्ल पटेल यांनाही दिले.
सुप्रिया सुळे लिटमस टेस्ट
ही एक प्रकारे पवारांची वारस नेमण्याची “लिटमस टेस्ट” आहे. कारण सुप्रिया सुळे यांना थेट एकमेव कार्यकारी अध्यक्ष नेमले असते तर निवडणुकीतल्या जय पराजयाची सर्व जबाबदारी त्यांच्या एकट्याच्या खांद्यावर पडली असती आणि तिसऱ्यांदा मोदी लाटेत राष्ट्रवादी काँग्रेसला मिळून – मिळून किती विजय मिळू शकतो?, याची रास्त शंका असल्यामुळे सुप्रिया सुळे यांची ही जबाबदारी पवारांनी अतिशय चलाखीने प्रफुल्ल पटेल यांच्याबरोबर “डिव्हाइड” केली आहे.
त्याचवेळी सुनील तटकरे आणि जितेंद्र आव्हाड या फक्त “महाराष्ट्र मर्यादित” असलेल्या नेतृत्वांना वेगवेगळ्या राज्यांच्या जबाबदाऱ्या देऊन महाराष्ट्रातल्या ज्येष्ठ नेत्यांना एक प्रकारे काटशह दिला आहे, तो देखील अजितदादा प्रत्यक्ष स्टेजवर हजर असताना!!
दिल्लीतल्या कार्यक्रमातच का??
या कार्यक्रमातले मुख्य पोस्टर देखील अतिशय सूचक होते. त्यात स्वतः शरद पवार, प्रफुल्ल पटेल आणि त्यांच्याबरोबर फक्त सुप्रिया सुळे यांचा फोटो होता. त्याच वेळी शरद पवार वेगळी कुठली घोषणा करू शकतात याची भनक नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना लागली होती. पण मुंबईत जशी पवारांच्या निवृत्ती घोषणेनंतर रिएक्शन उमटली, तशी रिएक्शन दिल्लीत उमटण्याची शक्यता नव्हती. किंबहुना तशी रिएक्शन उमटू नये याची “काळजी” घेतली गेली होती. कारण शरद पवारांना मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये “रोखून” धरणारे कार्यकर्ते आणि नेते तिथे नव्हते. त्यामुळे पवारांचे राष्ट्रवादीचा सांधा बदलणे सहज शक्य झाले. किंबहुना पवारांनी ते दिल्लीत जाऊन साध्य करून घेतले!!
आता नव्या टीम कडे राष्ट्रवादी काँग्रेसचा विस्तार देशव्यापी करण्याची जबाबदारी अशावेळी आली आहे, की प्रत्यक्षात निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीचा राष्ट्रीय दर्जा निवडणूक परफॉर्मन्सच्या आधारे काढून घेतला आहे.
अजितदादांचा राजकीय ऑप्शन खुला
सुप्रिया सुळे यांच्याकडे मात्र महाराष्ट्र दिला याचा अर्थ अजित पवारांची राजकीय गाडी पूर्णपणे साईडिंगला टाकून त्यांना त्यांचा “राजकीय ऑप्शन” शरद पवारांनी त्यांना खुला करून दिला आहे. नजीकच्या भविष्यात महाराष्ट्रात राष्ट्रवादीत अजितदादा गटविरुद्ध सुप्रिया सुळे गट हे उघडपणे राजकीय युद्ध रंगणार आहे, हे सांगायला कोणत्या राजकीय ज्योतिषाची गरज नाही. आत्तापर्यंतही तो संघर्ष सुरू होताच, पण तो सुप्त होता. आता सुप्रिया सुळे यांच्या हातात कार्यकारी अध्यक्षपदाचा “सेंगोल” आला आहे. त्याच वेळी अजितदादांना दिल्लीतल्या कार्यक्रमात स्टेजवर बसवूनही पोस्टरवर त्यांचा फोटो नव्हता आणि प्रत्यक्षात पहिल्या अनाउन्समेंट मध्ये त्यांच्याकडे पवारांनी कुठली जबाबदारीही सोपवलेली नाही, यातच अजितदादांचे राष्ट्रवादीतले भवितव्य अधोरेखित होते आणि हेच शरद पवारांनी, “शब्दासह साध्य केले, अर्धे मनातले” हे स्पष्ट करते!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App