प्रतिनिधी
मुंबई : केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या अधिपत्याखाली असलेल्या राजस्थान येथील पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातील कार्यक्रम समितीच्या अध्यक्षपदी महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजस्थानचे राज्यपाल तसेच पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे अध्यक्ष कलराज मिश्रा यांच्या अध्यक्षतेत अलीकडेच झालेल्या बैठकीत कार्यकारी समितीने एकमताने सुधीर मुनगंटीवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. Sudhir Mungantiwar as Chairman of Program Committee of Western Region Cultural Centre;
राज्याच्या सांस्कृतिक खात्याच्या मंत्रीपदाचा कार्यभार सांभाळल्यापासून सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या कामांची देशाच्या सांस्कृतिक विभागाने घेतलेली ही दखल असल्याचे मानले जात आहे. भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अधिपत्याखाली देशात सात क्षेत्रीय सांस्कृतिक केंद्रांचे कार्य चालते. यात उत्तर क्षेत्र सांस्कृतिक केंद्र पटियाला (पंजाब), पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूर (राजस्थान), दक्षिण क्षेत्र सांस्कृतिक केंद्र तंजावुर (तामिळनाडू), दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर (महाराष्ट्र), पूर्व क्षेत्र सांस्कृतिक केंद्र कोलकाता (पश्चिम बंगाल), उत्तर मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र प्रयागराज (उत्तर प्रदेश) आणि उत्तर पूर्व क्षेत्र सांस्कृतिक केंद्र दीमापूर (नागालँड) या केंद्रांचा समावेश आहे.
भारतीय पारंपरिक लोककलांना प्रोत्साहन देण्याची या सांस्कृतिक केंद्रांची जवळपास साडेतीन दशकांची परंपरा आहे. यातील पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या कार्यक्रम समितीच्या अध्यक्षपदी सुधीर मुनगंटीवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्राच्या संचालक किरण सोनी गुप्ता यांनी नियुक्तीच्या संदर्भातील पत्र मुनगंटीवार यांना पाठविले आहे. तसेच कार्यक्रम समितीच्या बैठकीचे नेतृत्व करण्याचीही विनंती केली आहे. मुनगंटीवार यांची नियुक्ती करताना आनंद होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे. ना. मुनगंटीवार यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असणार आहे. ना. मुनगंटीवार यांनी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री म्हणून आयोजित केलेले अनोखे सांस्कृतिक उपक्रम तसेच वेळोवेळी घेतलेले क्रांतिकारी निर्णय याची केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने दखल घेतली आहे, हेच यातून सिद्ध होते. लोककला जतन करणे आणि लोककलावंतांना प्रोत्साहन देणे, याबाबतीतही त्यांनी सातत्याने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत, हे विशेष.
व्यापक कार्यक्षेत्र
पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या अंतर्गत सहा राज्य येतात. यात राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात, गोवा या राज्यांचा तसेच दमण दीव आणि दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे. त्यामुळे ना. मुनगंटीवार यांना सर्व सहा राज्यांमधील लोककलावंतांसाठी काम करण्याची उत्तम संधी प्राप्त झाली आहे. विशेष म्हणजे या माध्यमातून महाराष्ट्रातील लोककलांना राष्ट्रीय पातळीवर अधिक मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देण्यावरही ना. मुनगंटीवार यांचा भर असणार आहे.
मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली मे महिन्यात बैठक
पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या संचालकांनी नियुक्तीच्या संदर्भातील पत्रात आगामी बैठकीचेही निमंत्रण दिले आहे. २०२३-२०२४ या वर्षात आयोजित करावयाच्या कार्यक्रमांचे नियोजन या बैठकीत होईल. ही बैठक सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली मे महिन्यात होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App