विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये रामनवमीच्या पूर्वसंध्येस उसळलेल्या दंगलीने राजकीय वातावरण तापले आहे. कारण, २ मे रोजी महाविकास आघाडीची या शहरात सभा होणार आहे, तर तत्पूर्वी घडलेल्या या दंगलीने शहरात तणाव निर्माण झाला आहे आणि ही दंगल पूर्वनियोजित होती असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. याशिवाय ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांनीही या दंगलीवरून भाजपा व शिंदे-फडणीस सरकार टीका केली आहे. विशेष म्हणजे इतकी वर्षे जे नेते हिंदूत्वाच्या नावावर आक्रमक भूमिका घेत होते, तेच आज या दंगलीवर ज्या प्रकारे प्रतिक्रिया देत आहेत, हे पाहून शहरातील स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकारी संभ्रमात पडले असून हिंदूत्वाच्या मुद्यावर त्यांची अडचण होत असल्याचे सांगितले जात आहे.Compromise with Hindutva Thackeray staunch Hindutva officials are confused by Khaire and Danve role in Sambhajinagar riots
छत्रपती संभाजीनगर शहर म्हणजेच पूर्वीचे औरंगाबाद येथील राजकारण हे आतापर्यंत धर्मावरच चालल्याचं दिसून आलं आहे आणि तसाच राजकीय इतिहासही दिसून येतो. कारण, या जिल्ह्याला सलग दोन दशकं शिवसेना खासदार लाभले, शिवाय महापालिकेतही अनेक वर्षे यांचंच राज्य, आमदारही त्यांचेच होते. प्रत्येक निवडणूक ही ‘खान की बाण?’ अशीच रंगल्याचे दिसून आले. मात्र मागील लोकसभा निवडणुकीत चित्र बदललं जिल्ह्यात एमआयएमचे खासदार निवडून आले. तर, राज्यातही राजकीय उलथापालथ होऊन सत्तेवर शिंदे-फडणवीस सरकार आले. तेव्हापासून खरं हिंदुत्व कोणाचं यावरून जणूकाही रस्सीखेचच पाहायला मिळत आहे. परंतु आतापर्यंत हिंदुत्वासाठी अनेक दंगली किंवा वादांमध्ये आक्रमक भूमिका घेणारे शहरातील स्थानिक व पक्षाचे वरिष्ठ नेते आता आघाडी धर्म पाळण्यासाठी घेत असलेली भूमिका पाहून, स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.
‘’त्यांना तेव्हाच सोलून काढलं असतं तर…’’ छत्रपती संभाजीनगरच्या दंगलीवर बाळा नांदगावकरांचं संतप्त विधान!
आतापर्यंत मतदारांसमोर कट्टर हिंदुत्ववादी म्हणून समोर जात असलेले हे कार्यकर्ते, पदाधिकारी मनात असूनही हिंदुत्वासाठी उघडपणे समोर येऊ शकत नाहीत, अशी खंत नाव न सांगण्याच्या अटीवर व्यक्त करत आहेत. शिवाय त्यांना त्यांच्या मतदारांसमोर जाण्यासही अवघडल्यासारखे होत असल्याचे सांगितले जात आहे. कारण, जर राज्यातील राजकीय गणित पूर्वीप्रमाणे असतं तर आज जे नेते भाजपा किंवा शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधत आहेत, तेच नेते कदाचित हिंदुत्वासाठी त्यांच्याच सोबत खांद्याला खांदा लावून उभा राहू शकले असते, असं स्थानिक राजकीय अभ्यासक सांगत आहेत. एकूणच आघाडी धर्म पाळण्यासाठी आणखी किती तडजोड करावी लागणार? असा प्रश्न छत्रपती संभाजीनगरच्या दंगलीच्या निमित्ताने ठाकरे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मनात नक्कीच निर्माण झाला असावा, असेच यावरून दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App