विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्यातील भाजपा खासदार गिरीश बापट यांचे आज (बुधवार) आजाराने निधन झाले आहे. त्यांचे पार्थिव दुपारी २ ते ६ पर्यंत शनिवार पेठेतील निवासस्थानी अंतदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे आणि सायंकाळी ७ वाजता वैकुंठ स्मशान भूमी येथे अंत्यसंस्कार होतील. BJP MP Girish Bapat passed away
गिरीश बापट यांनी त्यांच्या राजकीय जीवनात संघ स्वयंसेवक, कामगार नेता, नगरसेवक, आमदार, मंत्री आणि खासदार अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. पुण्यातील कसबा मतदारसंघातून गिरीश बापट १९९५ पासून सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. यानंतर २०१९च्या लोकसभा निवडणुकीत गिरीश बापट यांनी काँग्रसेच्या मोहन जोशी यांना पराभव करत ते लोकसभेत पोहचले होते.
गिरीश बापट यांचा जन्म ३ सप्टेंबर १९५० रोजी पुण्यात झाला. तळेगाव दाभाडेमधून प्राथमिक शिक्षण झाल्यावर त्यांचे माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल रमणबागेत झाले. बीएमसीसीत वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यावर बापट १९७३ मध्ये टेल्को कंपनीमध्ये कामगार म्हणून रुजू झाले. त्यानंतर दोन वर्षांतच आणीबाणीमध्ये १९ महिने ते तुरुंगात होते. त्यानंतर गिरीश बापट यांच्या राजकीय कारकीर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.
१९८६ मध्ये ते पुणे महानगरपालिकेत नगरसेवक झाले आणि पुढे सलग तीन टर्म त्यांनी नगरसेवकपद राखले. याशिवाय महापालिकेत स्थायी समितीचे अध्यक्ष झाले होते. यानंतर पुढे १९९५ साली त्यांनी पहिल्यांदा कसबा मतदार संघातून विधनासभ निवडणूक लढवली आणि तेव्हापासून सलग पाच टर्म ते आमदार म्हणून विजयी झाले. यानंतर २०१९ मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक जिंकली आणि पुण्यातील भाजपा खासदार म्हणून ते संसदेत पोहचले.
गिरीश बापच यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी मैत्रीपूर्ण संबंध होते आणि त्यांचा जनसंपर्कही दांडगा होता. राजकारणातील सर्वसमावेशकता कशी असावी, याचे उत्तम उदाहरण म्हणून त्यांच्याकडे पाहिले जायचे. त्यांना आदराने भाऊ म्हणून संबोधले जायचे. आज त्यांच्या निधनानंतर अनेक नेत्यांना भावना व्यक्त करताना अश्रू अनावर होत आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App