विशेष प्रतिनिधी
असदुद्दीन ओवैसी यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते नेहमीच भाजपची बी टीम म्हणून हिणवत असतात. पण नागालँड मधल्या गेल्या दोन दिवसांमधल्या राजकीय घडामोडी लक्षात आल्यानंतर शरद पवारच बनलेत का भाजपची बी टीम??, अशी शंका राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. स्वतः असदुद्दीन ओवैसी यांनी तशा असल्याचे ट्विट तर केले आहेच, पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील तशाच प्रकारचा संशय महाराष्ट्राच्या विधानसभेतही अपरोक्षपणे व्यक्त केल्याने पवारांच्या राजकारणाविषयी संशयाचे जाळे घट्ट झाले आहे.Is sharad Pawar B team of BJP??, what political history from 1999 tells the truth??
नागालँड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अनपेक्षितपणे 7 आमदार निवडून आल्यानंतर शरद पवारांनी भाजपला नव्हे, तर भाजप प्रणित सरकारचे मुख्यमंत्री न्यूफो ऱ्हिओ यांना पाठिंबा देऊन टाकला. वास्तविक पाहता भाजप आणि एनडीपीपी या आघाडीने नागालँड मध्ये 60 पैकी 37 जागा जिंकून पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन केले. या आघाडीने कोणालाही पाठिंबा मागितला नव्हता, तरीदेखील पवारांनी त्यांना न मागताच पाठिंबा देऊन टाकल्याने महाराष्ट्रातील अनेकांच्या राजकीय भुवया उंचावल्या. असदुद्दीन ओवैसी यांनी याच संदर्भात खोचक ट्विट केले. आम्हाला भाजपची बी टीम म्हणून हिणवता. मग शरद पवारांनी नागालँड मध्ये भाजप प्रणित सरकारला न मागताच पाठिंबा देऊन टाकला. आता त्यांनाही आता तुम्ही राजकीय अस्पृश्य ठरवणार का?? बरं हे काही पहिल्यांदाच घडलेले नाही आणि हे शेवटचेही नाही, असे ट्विट करून ओवैसी यांनी एकाच वेळी काँग्रेसला आणि पवारांना डिवचले आहे.
गुलाबरावांनी डिवचले, अजितदादा संतापले
2014 मध्ये देखील महाराष्ट्रात स्थिर सरकार आणण्यासाठी शरद पवारांनी भाजपला न मागताच पाठिंबा दिला होता. नागालँड मध्येही त्यांनी स्थिर सरकारचे कारण देत तिथल्या सरकारला न मागताच पाठिंबा दिला आहे. याचा उल्लेख जसा ओवैसींनी ट्विटमध्ये केला, तसाच तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत देखील केला. गुलाबराव पाटलांनी जेव्हा राष्ट्रवादीवर “50 खोके नागालँड ओके”, अशा शब्दांत शरसंधान साधले, ते अजितदादांना आवडले नाही. त्यामुळे गुलाबरावांना त्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला.
मुख्यमंत्र्यांचे अजितदादांना प्रत्युत्तर
पण मध्येच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हस्तक्षेप करून, दादा गेले कित्येक महिने तुम्ही आम्हाला खोके खोके म्हणून चिडवता. पण आज तुम्हाला गुलाबराव बोलले तर तुम्हाला राग आला. तुमचं म्हणजे असा आहे आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून. पण जेव्हा आम्हाला आमच्याकडे तुम्ही बोटे दाखवत होतात तेव्हा तीन बोटे तुमच्याकडे होती हे तुम्ही विसरलात. नागालँड मध्ये तिथल्या सरकारने तुम्हाला पाठिंबा मागितला नव्हता, तरी देखील तुम्ही तो देऊन टाकलात. महाराष्ट्रातही तुम्ही 2014 मध्ये असेच केले होते. भाजपने तेव्हा पाठिंबा मागितला नसताना तुम्ही तो देऊन टाकला होता. शरद पवार मोठे नेते आहेत. पण ते नेहमी जे बोलतात त्याच्या उलटे करतात. ते म्हणाले होते, देशात परिवर्तनाची लाट आहे. मग कसब्यातल्या परिवर्तनाची लाट अशी होती का?? कसब्यातून भाजपचा उमेदवार पडला म्हणून देशात परिवर्तनाची लाट निर्माण झाली. मग तुम्ही आणि पवार साहेब भाजपने तीन राज्ये जिंकल्याचे विसरलात का?? आणि चिंचवड मध्ये देखील तुमच्याच बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीचा पराभव झाला हे तुम्हाला दिसले नाही का??, असे एका पाठोपाठ एक टोले एकनाथ शिंदे यांनी अजितदादांना हाणून घेतले.
असदुद्दीन ओवैसी आणि एकनाथ शिंदे या दोन टोकाच्या राजकीय ध्रुवांनी शरद पवारांच्या संशयास्पद राजकीय भूमिकेवर नेमकेपणाने बोट ठेवले!!
1999 राष्ट्रवादीच्या स्थापनेचे इंगित
पण पवारांची ही संशयास्पद राजकीय भूमिका अजिबात नवीन नाही. लोकांची मेमरी शॉर्ट असते. लोकांना 2014 पूर्वीचे तसे काही आठवतही नाही. पण शरद पवारांनी भाजपशी उघडपणे कधीच युती केली नाही, पण छुपेपणाने त्यांच्याशी डील केल्याशिवाय ते कधी राहिलेही नाहीत. हा अनुभव 1999 मध्ये काँग्रेसला आला होता. सोनिया गांधींच्या परकीय नागरिकत्वाचा मुद्दा खरंतर भाजपचा होता. भाजपने त्यावेळी अटलजी – अडवणीच्या नेतृत्वाखाली प्रमोद महाजन, सुषमा स्वराज आदी नेत्यांमार्फत तो राष्ट्रीय पातळीचा मुद्दा बनवला होता.
पवार, संगमा, अन्वर
पण 1999 मध्ये अचानक शरद पवार, पी. ए. संगमा आणि तारिक अन्वर या काँग्रेसमधल्या नेत्यांना सोनिया गांधींचे परकीय नागरिकत्व आठवले आणि त्यांनी परकीय नागरिक देशाचा पंतप्रधान नको, अशी भूमिका घेऊन त्यांना पत्र लिहिले. त्यानंतर काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. पवार, संगमा आणि अन्वर यांना काँग्रेसने बाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतरचा राष्ट्रवादीचा इतिहास सर्वज्ञात आहे. ज्या सोनिया गांधींचे परकीय नागरिकत्वाचा मुद्दा पवारांनी उचलून धरला होता, त्याच सोनियांशी पवारांना जुळवून घ्यावे लागले होते. त्यामुळेच पवारांना महाराष्ट्रातल्या सत्तेत वाटा मिळवता आला होता.
सोनियांच्या परकीयत्वाचा मुद्दा भाजपचा
पण सोनिया गांधींच्या परकीय नागरिकत्वाचा मूळ मुद्दा हा भाजपचा होता. तो पवारांनी काँग्रेसमध्ये बंड करण्यासाठी वापरला होता. तेव्हा देखील अटलजी – अडवाणींबरोबर काही डील झाल्याच्या बातम्या त्या वेळच्या माध्यमांमध्ये झळकल्या होत्या. केंद्रात एनडीए सरकार आल्यानंतर पंतप्रधान अटलजींनी पवारांना राष्ट्रीय डिझास्टर मॅनेजमेंट कमिटीचे प्रमुखही बनवले होते. त्यावेळी मराठी माध्यमांनी या नेमणुकीचे कौतुक केले होते.
पवारांच्या संशयास्पद भूमिकेवर ठळक प्रश्न
मग पवार तेव्हापासून भाजपची बी टीम आहेत का?? 2014 मध्ये फक्त भाजपला न मागताच महाराष्ट्रात पाठिंबा देऊन त्याची झलक त्यांनी दाखवली होती का?? आणि 2023 मध्ये नागालँड मधल्या भाजप प्रणित सरकारला न मागताच पाठिंबा देण्याने तो इतिहासच त्यांनी पुन्हा रिपीट केला आहे का?? ही पवारांच्या राजकीय कारकीर्दीतवर उमटलेली ठळक प्रश्नचिन्हे आहेत. भले काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते असदुद्दीन ओवेसींना भाजपची बी टीम म्हणत असतील. पण ती खरंच वस्तुस्थिती आहे?? की पवारांनीच आतापर्यंतच्या राजकारणात न सांगता आणि कोणाला न कळता भाजपची बी टीम म्हणून भूमिका बजावली आहे??, हे ज्याचे त्याने समजून घेतले पाहिजे..
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App