विनायक ढेरे
नाशिक : शिवसेनेत उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे अशी संघटनात्मक पातळीवर देखील फूट पडली असली तरी नाशिक मध्ये या फुटी मध्ये राजकीय वेगळेपण आहे. खासदार हेमंत गोडसे हे त्यांच्या “पॉलिटिकल कंपल्शन”मुळे एकनाथ शिंदे गटात दाखल झाले आहेत, तर शिवसेनेचे 34 नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्या गटात गेले आहेत. हे नगरसेवक आज उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मुंबईत मातोश्रीवर पोहोचले आहेत. त्यांनी आपली ठाकरे गटाशी निष्ठा दाखवणारी प्रतिज्ञापत्र सादर केली आहेत. Shivsena splits nashik has unique political case as MP hemant godse in shinde camp, corporaters are in Uddhav Thackeray camp
– नाशिकचे राजकीय वैशिष्ट्य
नाशिक मधली शिवसेनेतली ही फूट ही राजकीय वैशिष्ट्य दाखवून देणारी आहे. कारण नाशिक मध्ये खासदारकी आणि आमदारकीच्या पातळीवर शिवसेनेचा खरा लढा राष्ट्रवादी काँग्रेसशी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे वजनदार नेते छगन भुजबळ यांच्याशी शिवसेनेचा स्थानिक पातळीवर उभा पंगा आहे. त्याला ओबीसी विरुद्ध मराठा राजकारणाची ठळक किनार आहे. छगन भुजबळ यांच्या विरोधात शिवसेनेचे राजकारण गेल्या 10 – 15 वर्षात जास्त मजबुतीने उभे राहिले आहे. त्यातच 2014 मध्ये मोदी लाटेत हेमंत गोडसे यांच्या रूपाने शिवसेनेने मराठा उमेदवार देऊन मोठा विजय मिळवला. मोदी लाटेत हेमंत गोडसे यांनी हेवीवेट छगन भुजबळ यांचा तब्बल 1 लाख 87 हजार मतांनी पराभव केला. त्यानंतर हेमंत गोडसे यांनी मागे वळून पाहिले नाही. 2019 मध्ये त्यांनी समीर भुजबळ यांचा असाच दणक्यात पराभव केला. नाशिक मध्ये खासदार रिपीट होत नाही. हा गेल्या किमान 5 ते 7 निवडणुकांचा इतिहास आहे. पण हेमंत गोडसेंनी मोदी लाटेच्या बळावर ते रेकॉर्ड तोडले.
एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना शह : उद्धव यांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा
– हेमंत गोडसे यांचे पॉलिटिकल कंपल्शन
या पार्श्वभूमीवर नाशिक मध्ये शिवसेना-भाजप युती मधून निवडणूक लढवणे हे हेमंत गोडसे यांच्यासाठी “पॉलिटिकल कंपल्शन” आहे. कारण नाशिक शहर आणि जिल्ह्यातील भाजपची ताकद संघटनात्मक पातळीवर तर आहेच पण आमदारांच्या पातळीवर देखील आहे. नाशिक शहरात देवयानी फरांदे सीमा हिरे आणि राहुल ढिकले हे 3 आमदार भाजपचे आहेत. या पार्श्वभूमीवर हेमंत गोडसेंना राजकीय अस्तित्व यशस्वीरित्या टिकवून ठेवण्यासाठी भाजपशी युती करणे भाग आहे. त्यामुळेच ते शिंदे गटात गेले आहेत.
– भुजबळांचा ओसरता प्रभाव
पण नगरसेवकांच्या बाबतीत असे नाही. नाशिक शहरांमध्ये शिवसेना आणि भाजप हे हिंदुत्ववादी पक्ष एवढे मजबूत आहेत की त्यांनी एकमेकांशी स्पर्धा करून आपापल्या पातळीवरच्या सत्ता टिकवल्या आहेत. तेथे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष शिवसेना आणि भाजप यांच्या खिजगणतीत नाहीत. छगन भुजबळ जरी राष्ट्रवादीचे हेवीवेट नेते असले तरी शहराच्या राजकारणावरचा प्रभाव त्यांचा ओसरला आहे. पालकमंत्री म्हणून त्यांनी 2004 ते 14 या काळात शहरात राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत करण्याचा जरूर प्रयत्न केला. परंतु 2014 नंतर त्यांच्या प्रभावाला जी ओहोटी लागली की 2019 मध्ये अडीच वर्षांच्या पालकमंत्री काळाच्या काळात थोडीशी सावरली. पण आता परत सत्ता गेल्यानंतर आणखी ओहोटी लागणार आहे. त्यामुळे शहर पातळीवर आणि जिल्हा पातळीवर देखील राष्ट्रवादीचा प्रभाव घसरता दिसतो आहे.
– नगरसेवकांना मुक्त चॉईस
अशा स्थितीत नगरसेवक पातळीवर राष्ट्रवादी ही शिवसेना आणि भाजप यांना आव्हान देण्याच्या स्थितीत उरलेली नाही. त्यामुळे शिवसेना नगरसेवकांना शिंदे गट की ठाकरे गट असा मुक्त चॉईस आहे. नगरसेवकांना राष्ट्रवादीचे फारसे आव्हान नसल्याने ते आपापल्या टर्म्स अँड कंडिशनवर ते ठाकरे अथवा शिंदे गटाची जुळवून घेऊ शकतात. त्यामुळे आज शिवसेनेचे 34 नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले आहेत आणि दुसरीकडे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे मात्र शिंदे गटात जाऊन विसावले आहेत. त्याच्या मागचे राजकीय इंगित हे ओबीसी विरुद्ध मराठा राजकारण आणि स्थानिक पातळीवरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे घसरते प्रभावहीन राजकारण यात दडले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App