चर्चेतला चेहरा : दीपक केसरकर आणि बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ यांची आठवण!!

एकनाथ शिंदे यांचे बंड झाल्यानंतर त्यांच्या खालोखाल गेल्या 4-5 दिवसांत जो एक चेहरा महाराष्ट्रभर आणि देशभर चर्चेत आला आहे, त्यांचे नाव दीपक केसरकर!!Deepak kesarkar, a good spokesman of eknath shinde faction a slight remembrance of v.n.gadgil

दीपक केसरकर हे महाराष्ट्राला नारायण राणे यांच्या बंडानंतर कोकणात शिवसेनेच्यावतीने त्यांच्याशी टक्कर घेणारा आणि यशस्वी होणारा नेता म्हणून माहिती आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात 5 वर्षे गृहराज्यमंत्री म्हणून काम केलेला नेता म्हणूनही माहिती आहे.

पण आता एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर त्यांची जी प्रवक्तेपदी नेमणूक झाली आहे त्यानंतर त्यांचा चेहरा अधिक चर्चेत येऊन तो राष्ट्रीय पातळीवर पोहोचला आहे.



गेल्या काही दिवसात दीपक केसरकर यांनी विविध वृत्तवाहिन्यांना मराठी आणि हिंदीतून ज्या छोट्या – मोठ्या मुलाखती दिल्या आहेत, त्यातून एकनाथ शिंदे यांच्या गटाची संयमी भूमिका तर दिसतेच, पण त्या पलिकडे जाऊन एखाद्या पक्षाचा आणि गटाचा प्रवक्ता कसा असावा याचा उत्तम नमुना दीपक केसरकर यांनी सादर केल्याचे दिसले आहे.

कमी “बोलणे”, जास्त सांगणे!!

यासंदर्भात बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ यांची सहज आठवण झाली आहे. पक्षाच्या प्रवक्त्याने कमी “बोलावे” आणि बरेच काही “सांगावे”, असे विठ्ठलराव गाडगीळ म्हणत असत आणि जर पक्षाचा प्रवक्ता “बरेच बोलत” असेल तर तो खूप “कमी सांगतो”, असे गृहीत धरावे असेही ते सुचित करत असत!!

प्रवक्तेपदाचा वस्तुपाठ

विठ्ठलराव गाडगीळ काँग्रेस अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे तब्बल 20 वर्षे प्रवक्ता होते. ऑन रेकॉर्ड स्वच्छ बोलणे, वादग्रस्ततेत अजिबात न अडकणे आणि ऑफ द रेकॉर्ड जे सांगायचे ते सांगणे आणि दडवायचे ते दडवून ठेवणे, हे बॅरिस्टर गाडगीळ यांचे वैशिष्ट होते. त्यावेळी जरी सोशल मीडिया एवढा प्रभावी नव्हता तरी पक्षाचे रिपोर्टिंग कसे करावे, विश्लेषण कसे करावे, याचा वस्तुपाठ म्हणजे बॅरिस्टर गाडगीळ होते!!

इथे दीपक केसरकर यांची बॅरिस्टर गाडगीळ यांच्याशी तुलना करण्याचा अजिबात हेतू नाही. पण वादग्रस्त न होता ठामपणे आपला मुद्दा कसा मांडावा हे सध्या तरी दिपक केसरकर यांच्याकडे बघून बाकीच्या पक्षाच्या प्रवक्त्यांनी शिकावे अशी नक्की स्थिती आहे.

सुधीर मुनगंटीवार हातवारे करून मोठ्या आवाजात बोलतात. पक्षाच्या प्रवक्त्याने पत्रकारांसमोर जाहीर भाषणात बोलतात तसे बोलायचे असते का??, हा प्रश्न आहे.

राऊतांचे एका वाक्यात वर्णन

संजय राऊत यांच्या बाबतीत तर हा प्रश्न सुद्धा येत नाही. दीपक केसरकर यांनी एका वाक्यात संजय राऊत यांचे वर्णन करून टाकले आहे. पक्षाचा प्रवक्ता कसा नसावा हे संजय राऊत यांच्याकडे पाहून शिकावे. आदित्य ठाकरे हे वयाने लहान पण प्रगल्भ नेते आहेत. त्यांनी आपल्या पिताजींकडून संयम शिकावा पण संजय राऊत यांच्याकडून काहीही शिकू नये, असा जो सल्ला दीपक केसरकर यांनी दिला आहे त्यातच “पवारबुद्धीच्या” संजय राऊत यांच्या प्रवक्ते पदाचे सारसर्वस्व सामावले आहे!!

 स्ट्रॅटेजी सांगायची नसते

दीपक केसरकर यांनी आणखी एक महत्त्वाचे विधान करून आपल्यातल्या चाणाक्ष प्रवक्त्याचे दर्शन घडवले आहे वृत्तवाहिन्यांच्या ज्युनिअर पत्रकाराला सुद्धा सर / मॅडम असे संबोधून पक्षाची स्ट्रॅटेजी ठरवायची असते आणि ती अंमलात आणायची असते ती जाहीरपणे सांगायची नसते, असे दीपक केसरकर म्हणाले आहेत!! बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ यांचे हेच तर वेगळ्या भाषेत मत असायचे!!

 कसोटीचा फलंदाज

गेल्या गेल्या 4-5 दिवसांमध्ये दीपक केसरकर यांनी एकनाथ शिंदे गटाची जी एक बाजू ठळकपणे संयमाने लावून धरली आहे ती कसोटी क्रिकेट मधल्या फलंदाजाला सारखी आहे. कसोटी क्रिकेट मधला फलंदाज धडधड वाटेल तसे शॉट मारून आऊट होत नाही. दीर्घकालीन इनिंग खेळायची असेल तर तो खेळपट्टीवर पाय रोवून उभा राहतो आणि संधी मिळेल तेव्हा संयमी फटके मारतो, हेच धोरण दीपक केसरकर यांनी अवलंबले असल्याचे दिसून येत आहे.

 माध्यमांचे उचकवणे, केसरकरांचा संयम

त्यामुळे मराठी माध्यमे एकनाथ शिंदे यांच्या गटाला वेगवेगळ्या पद्धतीचे रिपोर्टिंग करून कितीही उचकवत असली किंबहुना एकनाथ शिंदे यांचा गटाचा जो काही स्ट्रॅटेजिक प्लॅन असेल तो फसवण्यासाठी प्रयत्न करत असली तरी दीपक केसरकर यांच्या प्रवक्ते पदातून आणि वक्तव्यातून तो प्लॅन कुठेही लिक होताना दिसत नाही किंवा दीपक केसरकर देखील कुठेही अनावश्यक वक्तव्य करून आपला संयम सोडत नाहीत. त्यांच्या काही दिवसातल्या वक्तव्यांच्या निमित्ताने सध्यातरी विठ्ठलराव गाडगीळांची आठवण झाली इतकेच!

Deepak kesarkar, a good spokesman of eknath shinde faction a slight remembrance of v.n.gadgil

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात