निवडणुकांमध्ये एकामागून एक पराभवाचे काँग्रेसला अवघड जागी दुखणे झाले आहे आणि आता जावई डॉक्टर बनून त्यावर उपचार करायला येणार आहेत…!! काँग्रेस नेत्यांची त्यामुळे फार मोठी पंचाईत झालेली सध्या दिसते आहे. पक्षाच्या गेले अडीच वर्षे हंगामी अध्यक्ष असलेल्या सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा हे आपली पत्नी प्रियंका गांधींच्या मदतीसाठी काँग्रेसच्या राजकारणात प्रवेश करणार आहेत. “लोकांची इच्छा असेल तर मी राजकारणात प्रवेश करेन,” असे सर्वसाधारण राजकीय पालुपद लावत त्यांनी आधीच राजकारणात प्रवेश केला आहे… पण आता आणखी ते कोणत्या राजकारणात प्रवेश करणार आहेत…?? हा खरा म्हणजे प्रश्न आहे. Robert Vadra: Pain in the difficult place of Congress and son-in-law doctor !!
पण या प्रश्नाकडे आणखी एका वेगळ्या पैलूने पाहण्याची गरज आहे. तो पैलू अर्थातच रायबरेली नावाच्या मतदारसंघाचा आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला आणि 403 आमदारांच्या विधानसभेचे काँग्रेसचे फक्त 2 आमदार उरले. या दारुण पराभवत रायबरेलीचा फार “मोठा” वाटा राहिला आहे…!! रायबरेली लोकसभेच्या अंतर्गत सर्व विधानसभा मतदार संघांमध्ये काँग्रेसला पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. एका दृष्टीने रायबरेलीची “अमेठी” होण्याच्या दिशेने प्रवास पूर्ण झाला आहे. अमेठीत जसा 2019 च्या निवडणुकीत राहुल गांधींचा पराभव झाला, तसा पराभव 2024 च्या निवडणुकीत रायबरेली देखील होऊ शकतो, या भीतीने काँग्रेसला ग्रासले आहे. अर्थात 2024 च्या निवडणुकीत स्वतः सोनिया गांधी याच रायबरेली च्या उमेदवार असतील की नाही याविषयी मात्र शंका आहे. मग त्यांच्याऐवजी प्रियांका गांधी तेथून मैदानात उतरतात की जावयाला तेथून मैदानात उतरवण्याचा मनसूबा आखला जात आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
रॉबर्ट वाड्रा राजकारणात प्रवेश करणार याच्या बातम्या सर्व प्रसारमाध्यमांनी रंगवून दिल्या. पण वाड्रांच्या राजकारण प्रवेशाचे इंगित मात्र फारसे कोणी समजावून सांगितलेले दिसले नाही. रॉबर्ट वाड्रा यांच्या राजकारण प्रवेशामध्ये प्रियंका गांधी यांच्या रायबरेलीच्या उमेदवारीचा राजकीय अँगल आहे का??, हे तपासावे लागेल आणि तो जर तसा असेल तर आपल्या पत्नीला निवडून आणण्यासाठी रॉबर्ट वाड्रा हे राजकारणात प्रवेश करणार असतील तर त्याची पार्श्वभूमी देखील तपासली गेली पाहिजे.
येत्या 2 वर्षात नॅशनल हेरल्ड केसचा निकाल लागण्याची दाट शक्यता आहे किंबहुना असा निकाल लावणे मोदी सरकार साठी “पोलिटिकल कंपल्शन” असू शकते. अशा स्थितीत जर सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे दोन्ही नेते निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने राजकीय दृष्ट्या जायबंदी झाले, तर पर्यायी उमेदवार रॉबर्ट वाड्रा यांच्या रूपाने हाताशी असावा, असा विचार गांधी कुटुंबाने केला असल्यास त्यात गैर मानण्याचे कारण नाही. नॅशनल हेरॉल्ड ही जशी गांधी कुटुंबीयांची “खासगी” मालमत्ता आहे तशीच काँग्रेस देखील आता गांधी कुटुंबीयांची “खासगी” मालमत्ता झाली आहे हे उघड आहे. मग अशा “खाजगी” मालमत्तेत आपल्या जावयाला वाटा देणे यास देखील कसे गैर मानता येईल…??
त्यामुळे रॉबर्ट वाड्रा यांच्या राजकारण प्रवेशाचे हे विविध पैलू लक्षात घेतले तर खुद्द काँग्रेसचे देखील यातले “पोलिटिकल कंप्लशन” लक्षात येईल. अर्थात रॉबर्ट वाड्रा जरी “जनतेच्या इच्छेने” राजकारणात प्रवेश करणार असले तरी जनता त्यांना अपेक्षित असणारा कौल देईलच याची कुठलीही गॅरंटी नाही. जनतेने आधीच काँग्रेसच्या बहिण भावंडांना दोन – तीनदा नाकारले आहे. तरी देखील काँग्रेसजन “पोलिटिकल कंप्लशन” म्हणून त्यांचे नेतृत्व स्वीकारत आहेत. कदाचित रॉबर्ट वाड्रा यांचे राजकारण प्रवेशानंतरचे नेतृत्व काँग्रेसजन स्वीकारतीलही… पण कळीचा प्रश्न फक्त हा आहे, की बहिण भावांना नाकारणारी जनता जावयाचे नेतृत्व कौल देऊन स्वीकारेल का…?? त्याचे उत्तर जनता मतदान यंत्राद्वारे येईल यात शंका नाही…!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App