तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आज जाहीरपणे आपली राष्ट्रीय राजकारणाची महत्त्वाकांक्षा बोलून दाखवली आहे. तेलंगणामधील संगारेड्डी जिल्ह्यात जाहीरपणे त्यांनी तेलंगणाला यापुढे राष्ट्रीय राजकारणात फार मोठी भूमिका वठवायची आहे असे जाहीर केले. इतकेच काय पण त्यांनी “बंगारू तेलंगण” अर्थात “सुवर्ण तेलंगणा”चे स्वप्न आपण साकार केल्याचाही दावा केला आणि त्या पुढे जात त्यांनी पुढचे आपले लक्ष्य “बंगारू भारत” अर्थात “स्वर्णिम भारत” असले पाहिजे, असेही जाहीर केले. sharad pawar and k chandrashekhar rao meet
के चंद्रशेखर राव यांनी भारताला “बंगारू भारता”चे किंवा “स्वर्णिम भारता”चे स्वप्न दाखवणे यात काही गैर काही नाही. लोकशाही देशात कुठल्याही प्रांतातल्या कुठल्याही नेत्याला देशपातळीवर राजकारण करण्याची निश्चितच मुभा आहे किंबहुना राज्यघटनेने दिलेला तो अधिकार आहे. तो अधिकार जर के. चंद्रशेखर राव बजावत असतील तर त्यामध्ये गैर मानण्याचे अजिबात कारण नाही.
पण मूळ प्रश्न त्यापुढचा आहे… अधिकार आणि मुभा या पलिकडे जाऊन जाहीररीत्या महत्वाकांक्षा बोलून दाखवणाऱ्यांचा इतिहास जर बघितला तर तो मात्र राष्ट्रीय राजकारणाच्या पातळीवर विपरीत असल्याचे दिसून येते. राष्ट्रीय राजकारणाची म्हणजे पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा यापूर्वी अनेकांनी बोलून दाखवली, पण ती साध्य करून दाखवली का…?? हा जेव्हा प्रश्न विचारला जातो तेव्हा त्याचे उत्तर मात्र नकारार्थी आहे…!!
इंदिरा गांधी – मोरारजी देसाई यांच्या इतिहासात शिरण्याची गरज नाही. कारण मोरारजी देसाई यांनी इंदिरा गांधीं विरोधक दोनदा संसदीय पक्षाची निवडणूक हरले असले तरी सार्वत्रिक निवडणुकांनंतर मात्र त्यांनी पंतप्रधान पद मिळवून दाखवले आहे. शिवाय त्यांनी 1977 च्या निवडणुकीत जाहीर रीत्या आपल्या पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा बोलून दाखवलेली नव्हती
पण के चंद्रशेखर राव यांनी जोशी राष्ट्रीय राजकारणाची महत्त्वाकांक्षा आज बोलून दाखवली आहे तशीच महत्त्वाकांक्षा 1991 च्या निवडणुकीत त्या वेळचे महाराष्ट्राचे काँग्रेसचे मुख्यमंत्री शरद पवार यांनी निवडणूक प्रचाराच्या वेळी बोलून दाखवली होती. राजीव गांधींची 1991 च्या ऐन निवडणुकीत हत्या झाली आणि त्यानंतर दिल्लीतल्या पंतप्रधानपदाची स्पर्धा खऱ्या अर्थाने खुली झाली होती. त्यावेळी महाराष्ट्रात मतदान व्हायचे होते. शरद पवारांनी नेमका हाच धागा पकडत त्यावेळी महाराष्ट्रभर प्रचाराची रणधुमाळी उडवून दिली होती. “केंद्रात नेतृत्व करण्याची महाराष्ट्राला संधी आहे”, असे जवळजवळ ते प्रत्येक भाषणात म्हणत होते. शरद पवारांच्या या भाषणाचे आकर्षण महाराष्ट्रातील जनतेला त्या वेळी वाटले होते आणि खरोखरच राजीव गांधींच्या हत्येनंतर निर्माण झालेली सहानुभूतीची लाट असो किंवा शरद पवारांच्या भाषणाचे आकर्षण असो महाराष्ट्राच्या जनतेने काँग्रेसच्या पारड्यात भरभरून मते देत काँग्रेसला त्यावेळी 48 पैकी 36 खासदार निवडून दिले होते. महाराष्ट्राने काँग्रेसच्या वाट्याला हे फार मोठे यश दिले होते. खऱ्या अर्थाने शरद पवार यांची राष्ट्रीय पातळीवरची महत्त्वाकांक्षा फळाला येऊ शकेल असा हा आकडा होता…!!
सर्वाधिक मानधन घेण्याचा मान तेलंगणचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांना ; मासिक ४ लाख १० हजार रुपये मिळतात
पण नेमकी शरद पवारांनी आपली महत्त्वाकांक्षा जाहीर इच्छा बोलून दाखवली आणि तिथेच ते फसले. 36 पैकी फक्त 6 खासदारांनी उघडपणे शरद पवारांची पाठराखण केली आणि शरद पवारांना पंतप्रधान पदाच्या शर्यतीतून पी. व्ही. नरसिंह राव यांच्या पुढे हार पत्करावी लागली. हा इतिहास 1991मध्ये घडला आहे. त्यावेळी नरसिंह रावांनी अजिबात आपली महत्त्वाकांक्षा जाहीर रित्या बोलून दाखवलेली नव्हती आपल्या सर्व हालचाली ते शांतपणे आणि चपखलपणे करताना दिसत होते. याची साक्ष नंतर त्यांच्याजवळ असणार्या अनेक नेत्यांनी दिली आहे. यामध्ये दस्तुरखुद्द शरद पवारांचे एकेकाळचे उजव्या हात सुरेश कलमाडी हे देखील होते. शरद पवारांना आपली पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा जाहीर सभांमध्ये बोलून दाखवल्याचा “खामियाझा” भोगावा लागला असे मत अनेक त्यावेळच्या राजकीय निरीक्षकांनी व्यक्त केले आहे.
के चंद्रशेखर राव यांनी आज नेमके तसेच “तेलंगणाला राष्ट्रीय राजकारणात फार मोठी भूमिका बजावण्याची संधी आहे,” असे बोलून दाखविले आहे.
वास्तव काय सांगते? आकडे काय बोलतात?
तेलंगणच्या एकूण खासदारांची संख्या 15 आहे. महाराष्ट्राच्या एकूण खासदारांची संख्या तेव्हा 48 होती. आजही 48 आहे. 1991 मध्ये महाराष्ट्र मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळी 36 खासदार निवडून आले होते. तेलंगणच्या एकूण खासदारांच्या दुपटीपेक्षा ही जास्त संख्या आहे. तेव्हा शरद पवारांना 36 खासदारांच्या नेमका काय अनुभव आला…??
अशा स्थितीत तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांनी आपली महत्त्वाकांक्षा जाहीर रित्या बोलून दाखवणे याचा नेमका अर्थ काय होतो?? आणि याचा परिणाम काय होईल…??, हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज असेल असे वाटत नाही…!!
हा… एक मात्र नक्की तेलंगणच्या सर्वसामान्य मतदाराला जर के. चंद्रशेखर राव यांच्या घोषणेचे आकर्षण वाटले तर मात्र त्यांच्या पारड्यात तेलंगणची जनता भरभरून मते देईल हे निश्चित… हेच शरद पवारांच्या बाबतीत 1991 मध्ये घडले होते. पण त्यांच्या राष्ट्रीय महत्त्वाकांक्षेचे नंतर काय झाले?? हा इतिहास फार जुना नाही. इतिहासाची साक्ष ही अशा पद्धतीने महत्त्वाकांक्षा जाहीररित्या बोलून दाखवणाऱ्यांच्याविरोधात आहे हे फक्त या निमित्ताने सांगितले एवढेच…!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App