गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मारकावरून महाराष्ट्रात राजकीय वाद सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश सरकारने लतादीदींचे उचित स्मारक उभारण्यासाठी पुढचे पाऊल देखील टाकले आहे. लतादीदींचे जन्मगाव इंदूरमध्ये त्यांच्या नावाने संगीत अकादमी महाविद्यालय आणि संग्रहालय उभे राहणार आहे. त्याच शहरामध्ये लतादीदींचा भव्य पुतळा उभारण्याचाही मनसूबा मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी बोलून दाखवला आहे.Memorial of Latadidi on Shivatirtha
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात मात्र लतादीदींच्या स्मारकाच्या मुद्द्यावरुन राजकीय घमासान होताना दिसत आहे. भाजप आणि काँग्रेस हे दोन परस्पर कट्टर विरोधी पक्ष लतादीदींच्या स्मारकाबाबत एकत्र आलेले दिसत आहेत. या दोन्ही पक्षाच्या नेत्यांना म्हणजे भाजपचे आमदार राम कदम आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना, लतादीदींचे अंत्यसंस्कार जिथे झाले त्याच ठिकाणी म्हणजे शिवतीर्थावरच त्यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हावे असे वाटत आहे. परंतु शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी मात्र वेगळा विसंवादी सूर लावला आहे. लतादीदींचे स्मारक करणे सोपे नाही. देशाने त्याचा विचार करावा, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.
संजय राऊत यांच्या या प्रतिक्रियेमागचे नेमके इंगित काय आहे?? कोणते राजकारण यामागे दडले आहे??, असा सवाल महाराष्ट्राच्या मनात उठल्याशिवाय राहत नाही.
Lata Mangeshkar : लता मंगेशकर बनू शकल्या नाहीत प्रिन्सेस ऑफ डुंगरपूर, बहुतेकांना माहिती नसलेला किस्सा
शिवतीर्थाचा गेल्या 50 वर्षांचा इतिहास पाहिला तर तो जास्तीत जास्त राजकीय दृष्ट्या शिवसेनेशी जोडला गेला आहे. त्यातही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी जोडला गेला आहे. बाळासाहेब ठाकरे आणि क्वचितच राज ठाकरे यांचा अपवाद वगळता बाकीच्या कोणत्याही राजकीय नेत्याने शिवतीर्था सारख्या भव्य पटांगणावर जाहीर सभा घेण्याची हिंमत दाखवलेली नाही. कारण तेवढी गर्दीच जमविण्याची महाराष्ट्रातल्या नेत्यांकडे क्षमताच नाही.
या पार्श्वभूमीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या नावाशी शिवतीर्थाचा संबंध जोडला गेला आहे. त्याच शिवतीर्थावर 2012 मध्ये बाळासाहेबांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. तेथेच कालांतराने त्यांचे समाधीस्थळ उभे राहिले आहे. त्यामुळे बाळासाहेब आणि शिवतीर्थ या नात्यावर कायमचे शिक्कामोर्तब झाले आहे.
आता अशा स्थितीत तेथे गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचेही अंत्यसंस्कार झाले आहेत. त्यातूनच लतादीदींचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक शिवतीर्थावर उभारले जावे, अशा मागण्या पुढे आल्या आहेत. यामध्ये भाजप आणि काँग्रेसचे नेते प्रामुख्याने आघाडीवर दिसत आहेत. या दोन परस्पर विरोधी पक्षांचे नेते लतादीदींच्या स्मारकाच्या मुद्यावर एकत्र येणे हा शिवसेनेला राजकीय काटशह देण्याचा प्रकार मानण्यात येत आहे. शिवतीर्थावर फक्त शिवसेनेची मक्तेदारी असू नये, असा यामागचा हेतू दिसत आहे.
त्याचबरोबर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे प्रचंड लोकप्रिय होते. त्याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. परंतु, लतादीदी यादेखील आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या गायिका होत्या. त्यांचेही उचित स्मारक शिवतीर्थावर करणे ही भूमिका देखील योग्य असल्याचे काँग्रेस आणि भाजप या दोन परस्पर विरोधी पक्षांचे आग्रही मत असल्याचे दिसून येत आहे.
शिवतीर्थावर लतादीदींचे स्मारक होणे यातून शिवसेनेची मक्तेदारी जशी मोडीत निघेल, तसाच एका पूर्व वेगळा योगायोगही साधला जाऊ शकतो. तो म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधी स्मारकाशेजारी लतादीदींचे समाधी स्मारक आणि त्यांच्यासमोर या दोघांचेही अधिदैवत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे स्मारक असणे हा तो योगायोग आहे. आता हा योगायोग नेमका कोणाला साधायचा नाही…?? यामध्ये महाविकास आघाडी तला दुसरा महत्त्वाचा घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसची काय भूमिका असेल??, हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे…!! या गुलदस्त्यातील भूमिकेतच संजय राऊत यांच्या लतादीदींच्या स्मारकाविषयीच्या वेगळा विसंवादी सूर लावण्याचे रहस्य दडले आहे काय…??
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App