विशेष प्रतिनिधी
रत्नागिरी – सुमारे ४०० वर्षाहून अधिक जुना महाकाय गोरख चिंचेचा वृक्ष (आफ्रिकन बाओबाब वृक्ष ) रत्नागिरी येथे असल्याचे समजतात रत्नागिरी जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांनी त्याचे महत्त्व ओळखून तात्काळ त्याचे जतन आणि संवर्धन करण्याचा निर्णय घेतला आहे.400 years old Gorakhchinch tree found in Ratnagiri
पर्यटनदृष्ट्या हेरिटेज ट्रीचा वापर करून तेथे उत्तम पर्यटन स्थळ निर्माण करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. तसेच खाजगी कंपनीच्या सीआरपीएस फंडातून हेरिटेज ट्री म्हणून पर्यटन सेल्फी पॉइंट विकसित करण्यात येणार आहे. ह्या झाडाचे महत्व काय किती वर्षांपूर्वीचा आहे ही माहिती देखील तिथे लावली जाईल असं त्यांनी सांगितले. हा वृक्ष मूलतः आफ्रिका खंडातला, मादागास्कर, अरबी द्वीपकल्प तसेच ऑस्ट्रेलिया येथे व आता उष्ण कटिबंधीय प्रदेशांत आढळतो. याच्या नऊ प्रजातींपैकी सहा फक्त मादागास्करमध्ये आढळतात.
त्याची उंची ५० फुटांपर्यंत असून हा पानगळी वृक्षात मोडतो. खोडाचा परीघ १०० फुटांपर्यंतही असतो. खोडाचा जाड पापुद्रा राखाडी रंगाचा असतो. फुले मांसल ५ पाकळ्यांची असून, लांब देठाने झाडावर लटकत राहतात. याची फुले रात्री फुलतात. त्यांना मंद सुवास असतो. फुले गळून तेथे बाटलीच्या आकाराची फूटभर लांबीची फळे येतात. ती राखाडी रंगाच्या व कठीण कवचाच्या दुधी भोपळ्यांसारखी दिसतात. खोडामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठवले जाते, त्यामुळे पाणी कमी असलेल्या प्रदेशातसुद्धा हे वृक्ष तग धरतात. त्यांचे आयुष्य १००० वर्षे असते. खोडे पोकळ झालेले काही वृक्षसुद्धा आढळले आहेत. अशा खोडात मादागास्करमध्ये आलेल्या वादळाच्या वेळी काही लोकांनी आश्रय घेतला होता.
https://youtu.be/6FUZyq9fMQE
महाराष्ट्रात नगर जिल्ह्यात धमोरी येथे पुरातन वृक्ष असून परिसरातील लोक येथे पूजा करतात गोरक्षनाथ यांचे शिष्य अडबनगीनाथ यांनी याच ठिकाणी तप केले अशी आख्यायिका आहे. गोरखचिंचेखाली बसून गोरक्षनाथांनी शिष्यांना विद्यादान केले, म्हणून याला गोरखचिंच हे नाव पडल्याचे सांगितले जाते. याच्या बाओबाब या आफ्रिकन नावाचा अर्थ ज्येष्ठवर्य असा आहे.फळाचे साल मखमली असून वजन साधारण १.५ किलो असते. गोरखचिंचेच्या पानांत ‘क’ जीवनसत्त्व, शर्करा, पोटॅशिअम व टार्टरेट असते. ताज्या बियांची भाजी करतात, तर काही वेळा त्या भाजून कॉफीऐवजी वापरतात. गरापासून शीत पेय करतात.
गराचा उपयोग दाह कमी करण्यासाठी होतो. आव, अजीर्ण, अतिसार, भोवळ यांवर या पेयाचा उपयोग होतो. जंगली प्राणी याची पाने आवडीने खातात. माणसे खोडाचे तुकडे चघळून शोष कमी करतात. खोडाच्या अंतरसालापासून मजबूत दोर व गोणपाट तयार केले जातात. फळाच्या वाळलेल्या करवंट्यांचा उपयोग पाणी पिण्यासाठी करतात. लाकूड हलके असते. त्यामुळे गुजरातमध्ये याच्या लाकडापासून मासेमारीसाठी होड्या तयार केल्या जातात. अंतरसाल उत्तम, टिकाऊ असल्यामुळे त्याचा वापर ब्राऊन पेपर तयार करण्यासाठी होतो. या वृक्षावर सुगरणीसारखे पक्षी घरटी करतात.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App