शिथिलीकरणानंतर १ नोव्हेंबरला खुल्या झालेल्या राणीच्या बागेला गेल्या दोन महिन्यात तीन लाख ३० हजारांहून अधिक पर्यटकांनी भेट दिली आहे.Tourists flock to Mumbai’s Rani Bagh once again
विशेष प्रतिनिधी
मुंबई : लॉकडाऊनमध्ये घरात अडकलेले नागरिक शिथिलीकरणानंतर बाहेर पडू लागल्याने मुंबापुरीच्या पर्यटनस्थळांमध्ये महत्त्वाचे स्थान असलेल्या राणीच्या बागेत पर्यटकांची प्रचंड गर्दी होऊ लागली आहे.शिथिलीकरणानंतर १ नोव्हेंबरला खुल्या झालेल्या राणीच्या बागेला गेल्या दोन महिन्यात तीन लाख ३० हजारांहून अधिक पर्यटकांनी भेट दिली आहे.
राणीच्या बागेतील प्रवेश शुल्काच्या माध्यमातून पालिकेच्या तिजोरीत सव्वाकोटी रुपयांहून अधिक महसूल जमा झाला आहे.आधुनिक तंत्रज्ञान, देश-विदेशातील प्राणिसंग्रहालयांचा अभ्यास आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन याच्या आधारावर नव्याने बांधण्यात आलेले पिंजरे आणि सुशोभीकरण यामुळे पर्यटकांची पावले राणीच्या बागेकडे वळू लागली आहेत.
नाताळाच्या सुट्टीमुळे राणीच्या बागेत मोठय़ा संख्येने पर्यटक येतील अशी उद्यान प्रशासनाला अपेक्षा आहे.१ डिसेंबर ते २७ डिसेंबर या कालावधीत एक लाख ६५ हजार ७१४ पर्यटकांनी राणीच्या बागेत हजेरी लावली असून या काळात प्रवेश शुल्कापोटी पालिकेला ६६ लाख ९८ हजार ९२५ रुपये इतका महसूल मिळाला.
पक्षी दालनही पर्यटकांची पसंती
राणीच्या बागेतील नव्याने खुले झालेले पक्षी दालन पर्यटकांच्या पसंतीला उतरले आहे.वन्य अधिवासातील या पक्ष्यांना काचेतून पाहता येते.यामध्ये धनेश, लांडोर,गोल्डन फेजन्ट,पोपटांचे विविध प्रकार, मिलिटरी मकाऊ, आफ्रिकन ग्रे पॅरेट, कॉकिटेल आदी अनेक पक्ष्यांचा समावेश आहे.
तसेच राणीच्या बागेतील हम्बोल्ट पेंग्विन आणि वाघ पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरले आहेत. रणथंबोर किल्ल्याची प्रतिकृती असलेल्या पिंजऱ्यातील ‘शक्ती’ वाघ आणि ‘करिष्मा’ वाघिणीला पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App