शिवसेनेचा संयुक्त पुरोगामी आघाडीत अर्थात यूपीएमध्ये जानेवारी 2022 च्या सुरुवातीला प्रवेश होणे ही शिवसेना पक्षप्रमुख – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सोनिया गांधींशी जवळीक होण्याची नांदी आहे? की शरद पवारांच्या यूपीएमधल्या नेतृत्वाला बळकटी देण्यासाठी करण्यात आलेली राजकीय खेळी आहे, हे येणारा काळच ठरवणार आहे.Shiv sena in UPA ?: Strength of Pawar’s leadership?
पण शिवसेना यूपीएमध्ये सामील होणार हीच मोठी बातमी झाली आहे. शिवसेना महाराष्ट्रातल्या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीत सर्वात अस्वस्थ असलेला पक्ष आहे. शिवसेनेचे नेते मुख्यमंत्री आहेत, पण निधी मिळवण्यात ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले आहेत. सत्तेचे सर्व लाभ राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मग शिवसेना अशा क्रमाने मिळताना दिसत आहेत. म्हणजे तीन पक्षांच्या आघाडीत शिवसेना तिसऱ्या क्रमांकावर राहिल्याने शिवसैनिक, आमदार – खासदार त्रस्त आहेत.
पण मग शिवसेना त्यापेक्षा मोठ्या आघाडीत म्हणजे यूपीएत जाऊन नेमके काय करणार?, हाच खरा प्रश्न आहे. यूपीए सारख्या राष्ट्रव्यापी महत्त्वाच्या आघाडीत शिवसेनेचे स्थान काय राहणार…?? शिवसेना यूपीएमध्ये गेल्यावरखासदारांच्या संख्याबळात यूपीएमधला काँग्रेसच्या खालोखालचा पक्ष ठरणार आहे.
शिवसेनेचे सर्व खासदार मोदींचे पोस्टर मागे लावून निवडून आले असले तरी 18 खासदार ही लहान सहान संख्याबळ नाही. (राष्ट्रवादीचे फक्त 5 खासदार आहेत.) मग शिवसेनेचे हे खासदारांचे डबल डिजिट मोठे संख्याबळ यूपीएमध्ये काँग्रेसच्या राजकीय वळचणीला जाणार…?? की भविष्यावर नजर ठेवून यूपीएमध्ये आपले नेतृत्व बळकट करण्यासाठी पवार वापरणार…?? हा खरा प्रश्न तयार झाला आहे…!!
सहाच महिन्यांपूर्वी शिवसेनेचे खासदार प्रवक्ते आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी सोनिया गांधी यांचे नेतृत्व बाजूला करून यूपीएच्या नेतृत्वपदावर शरद पवारांना विराजमान करण्यासाठी मोठी मोहीम चालविली होती. मराठी माध्यमांनी, शरद पवार आता यूपीएचे चेअरमन झालेच…!!,
अशा भावनेतून जोरदार चर्चाही रंगविल्या होत्या. पण फक्त मराठी माध्यमांमध्ये चर्चा घडवून यूपीए सारख्या राष्ट्रव्यापी आघाडीचे चेअरमन कसे कोणाला बनवता येईल?, याचा विचार मराठी माध्यमांनी त्यावेळी केला नाही. पण काँग्रेसने महाविकास आघाडीत राहूनही संजय राऊत यांच्या त्या प्रस्तावाची पुरती वासलात लावली होती. हा नजीकचा इतिहास आहे.
सहा महिन्यानंतर ममता बॅनर्जी पश्चिम बंगालची निवडणूक जिंकून महाराष्ट्रात आल्या. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना भेटल्या. दुसऱ्या दिवशीच्या शरद पवारांना सिल्वर ओकमध्ये जाऊन भेटल्या. सिल्वर पोर्चमध्ये उभे राहून त्यांनी यूपीएचे राजकीय अस्तित्वच पुसून टाकले…!!
पण त्यानंतर 5-7 दिवसांमध्येच संजय राऊत हे राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना भेटले. त्यानंतर खुद्द सोनिया गांधी यांनी शरद पवारांचा सकट सगळ्या विरोधकांची बैठक 10 जनपथ मध्ये बोलावली. तेव्हा संजय राऊत हे शरद पवारांना समवेत तेथे गेले. सोनिया गांधींचे बैठकीचे निमंत्रण खुद्द शरद पवारही टाळू शकले नाहीत. त्यानंतर शिवसेनेच्या यूपीए प्रवेशाच्या अटकळींना वेग आला.
काँग्रेसमध्ये दस्तुरखुद्द सोनिया गांधी यांचे कार्ड ऍक्टिव्हेट झाल्यानंतर यूपीए देखील पुन्हा ऍक्टिव्हेट झाली. अशा “ऍक्टिव्हेटेड” यूपीएमध्ये शिवसेनेचा प्रवेश होताना तो प्रवेश सोनिया गांधी यांच्याशी शिवसेनेची जवळीक झाली अशा दृष्टीने होणार आहे…??, की आपली यूपीए चेअरपर्सन होण्याची जुनी महत्त्वाकांक्षा पूर्ण करून करून घेण्यासाठी शरद पवार हे शिवसेनेच्या खासदारांच्या मोठ्या संख्याबळाचा वापर करून घेणार आहेत…??
… की यूपीएतील खासदारांच्या संख्याबळाच्या दृष्टीने एक आणि दोन नंबरवर असलेले काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांचे नेतृत्व कायमच सिंगल डिजिटमध्ये राहिलेल्या राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला पूर्णपणे बाजूलाच काढतील…??, हे येणारा काळच ठरवेल. यातली मुख्य राजकीय मेख सोनिया गांधी यांचे “पॉलिटिकल कार्ड ऍक्टिव्हेट” झाले आहे ही असणार आहे…!!
एवढेच नाही तर आत्तापर्यंत फक्त महाराष्ट्रात असणारे सुप्तावस्थेतले उद्धव ठाकरे कार्ड हे राष्ट्रीय पातळीवर सोनियांच्या खालोखाल यूपीएमध्ये चालायला लागले तर…?? हे पवारांना परवडेल…?? शिवसेनेतला युपीए प्रवेश पवारांच्या “पुढाकाराने” होणार असला तरी तो उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांच्या “परस्पर संमतीने” होणार आहे, हाच यातला सर्वात मोठा कळीचा मुद्दा आहे, हे विसरून चालणार नाही…!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App