विशेष प्रतिनिधी
मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रखर टीका केली होती. परंतु, त्या टीकेला प्रत्युत्तर देणे टाळून भाजपने काँग्रेस नेते सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाणांना टार्गेट केले आहे. bjp latest news
राज्यात राजकीय वक्तव्यांची पतंगबाजी सुरू असताना भाजपने आज अशोक चव्हाणांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. मुंबईत सैनिकांच्या जागेवर आदर्श इमारत उभी करताना महाराष्ट्राचा विकास आठवला नाही का?, असा सवाल भाजपने केला आहे. bjp latest news
उत्तर प्रदेशात उभारण्यात येणाऱ्या फिल्मसिटीसंबंधी योगी आदित्यनाथ मुंबई भेटीत चर्चा करणार असून गुंतवणूकदारांना आमंत्रित करणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे अशोक चव्हाण यांनी भाजपावर निशाणा साधला होता. त्याला भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उत्तर दिले आहे.
“आपण मुख्यमंत्री असताना त्यावेळेस सैनिकांच्या जागेवर आदर्श इमारत उभी करताना महाराष्ट्राची प्रगती आठवली नाही? महाराष्ट्रात उद्योग येणारच इथे प्रगती होणारच फक्त जरा आदर्श पलीकडे पाहा आपल राज्य अजून उत्तम कस होईल याचा विचार करा.” असे केशव उपाध्ये यांनी ट्विट केले आहे.
उपाध्ये यांनी अशोक चव्हाण यांचे ट्विट देखील सोबत जोडले आहे. ज्यामध्ये अशोक चव्हाण यांनी म्हटले होते की, “भाजपच्या ५ वर्षाच्या काळात दिवसाढवळ्या महाराष्ट्रातील अनेक उद्योग अन् कार्यालये गुजरातला पळवण्यात आली. आता महाराष्ट्रातले सरकार बदलले, तर उत्तरप्रदेश सरकारच्या नावाखाली बॉलिवूडचे लचके तोडण्याची पटकथा तयार झालेली दिसते. पण भाजपच्या काळात जे झाले ते आम्ही पुन्हा घडू देणार नाही.
देशातील सर्व राज्यांची प्रगती झाली पाहिजे आणि त्यासाठी केंद्र व सर्व राज्यांनी एकमेकांना सहकार्य केले पाहिजे, याबाबत दुमत नाही. पण ताकदीच्या बळावर दुसऱ्याच्या ताटातील घास हिसकावून पोट भरणे योग्य नाही. या पापात महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी सहभागी होऊन महाराष्ट्राशी द्रोह करू नये,” असा टोला देखील राज्यातील भाजपा नेत्यांना अशोक चव्हाण यांनी लगावला होता. याला उपाध्ये यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
वास्तविक आधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील योगींच्या बॉलिवूड भेटीवर टीका केली होती. ती टीका अधिक प्रखर होती. मात्र, या दोन्ही नेत्यांच्या टीकेचा उपाध्ये यांच्या ट्विटमध्ये उल्लेखही नाही. त्यांनी ठाकरे आणि सुळे या दोन्ही नेत्यांच्या टीकेला थेट उत्तर देण्याचे भाजपने टाळून अशोक चव्हाणांना आदर्श घोटाळ्यावरून टार्गेट केले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App