नाशिक : एकीकडे संघावर हल्लाबोल, तर दुसरीकडे मुस्लिम आरक्षणासाठी घटना बदल, हा राहुल गांधी आणि काँग्रेस त्यांचा डाव झाला उघड!!
त्याचे झाले असे :
काँग्रेसची विद्यार्थी संघटना NSUI पुणे दिल्लीतल्या जंतर-मंतरवर धरणे आंदोलन केले. देशाची शिक्षण व्यवस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघ खराब करतोय सगळ्यांचा शिक्षणाचा हक्क मारतोय, असा आरोप तिथे सगळ्या वक्त्यांनी केला. त्यामध्ये लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भर घातली. संघाचे लोक प्रत्येक विद्यापीठांमध्ये आपला कुलगुरू बसवून विद्यापीठाची सगळी शिक्षण व्यवस्था ताब्यात घेत आहे. युवकांचे शैक्षणिक भवितव्य बरबाद करत आहे, असा आरोप राहुल गांधींनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशातल्या युवकांच्या बेरोजगारी विषयी काही देणे घेणे नाही. त्यांना देशातले उद्योग बाहेर चाललेत याचे भान नाही. त्यांना फक्त आदानी आणि अंबानी यांचे कल्याण करायचे आहे. देशात रोजगार तयार झाला नाही तरी त्यांना काही फरक पडत नाही. पण काँग्रेस आणि INDI आघाडी आता मागे हटणार नाही देशातल्या युवकांसाठी पुढे होऊनच लढाई लढत राहील. आपण सगळे मिळून भाजप आणि संघाला हरवू, अशी गर्जना राहुल गांधींनी त्या धरणे आंदोलनात केली.
राहुल गांधींनी एकीकडे शिक्षण व्यवस्थेच्या मुद्द्यावरून संघ आणि भाजपवर तोफा डागल्या, पण दुसरीकडे कर्नाटक सरकारने मुस्लिमांना ठेकेदारी 4 % आरक्षण देण्याचा कायदा मंजूर केला. त्याआधी तेलंगणाच्या विधानसभेने SC, ST OBC आरक्षणातली टक्केवारी काढून ती मुस्लिम आणि अल्पसंख्याकांना बहाल केली. पण इतकेच करून काँग्रेस थांबली नाही. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी त्यापुढे जाऊन मुस्लिम आरक्षणासाठी राज्यघटनेत बदल करायची भाषा वापरली. देशात आतापर्यंत सरकारांनी अनेक निर्णय घेतले, न्यायालयांनी देखील निर्णय दिले, पण त्यानंतर राज्यघटना बदलून त्या निर्णयांमध्ये बदल केले, तसेच मुस्लिम आरक्षणाच्या बाबतीत करता येईल, असे शिवकुमार म्हणाले.
शिवकुमार यांच्या वक्तव्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी धर्मावर आधारित आरक्षणाला ठाम नकार दिला असताना काँग्रेस आता मुस्लिम लीगच्या धोरणानुसार देशातल्या दलितांचे आरक्षण काढून घेऊन ते मुस्लिमांना बहाल करत असल्याचा आरोप राज्यसभेचे नेते जे. पी. नड्डा यांनी केला, तर केंद्रीय कायदेमंत्री किरण रिजिजू यांनी काँग्रेसच्या नेत्यांना लोकसभेत ठोकून काढले. पण शिवकुमार यांनी आपले वक्तव्य मागे घेतले नाही. त्या उलट त्यांनी आपण नड्डा यांच्यापेक्षा सीनियर लीडर असल्याची मखलाशी करून भाजपवरच पलटवार केला. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी संसदेत सारवासारव करायाचा प्रयत्न केला. पण काँग्रेस डी. के. शिवकुमार यांचे वक्तव्य नाकारणार का??, त्यांचा निषेध करणार का??, या भाजपच्या युक्तीवादावर कुठल्याही काँग्रेस नेत्याने तोंड उघडले नाही.
त्यामुळे या सगळ्या वादामधून काँग्रेसचा खरा डावच उघड्यावर येऊन पडला. एकीकडे शिक्षण व्यवस्था किंवा देशातल्या वेगवेगळ्या व्यवस्थांच्या मुद्द्यांवर संघ आणि भाजपला घेरायचे आणि दुसरीकडे वेगवेगळ्या आरक्षणांवर घाला घालून राज्यघटनेत बदल करून मुस्लिमांना धार्मिक आधारावर आरक्षण द्यायचे हाच तो डाव उघड्यावर आला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App