विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मोदी आडनावाला चोर ठरविल्याबद्दल राहुल गांधींना सुरत कोर्टाने दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. त्यानंतर कायदेशीर तरतुदीनुसार लोकसभेच्या सभापतींनी राहुल गांधींची खासदारकी रद्द केली. पण त्यानंतर देशातल्या सर्व माध्यमांनी भाजपने सर्व विरोधी पक्षाच्या ऐक्याला बूस्टर डोस दिल्याच्या बातम्या केल्या आहेत. ममता बॅनर्जी यांच्यापासून उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत अनेक नेत्यांनी राहुल गांधींच्या बाजूने प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. त्यामुळेच राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्याच्या निमित्ताने भाजपच्या नेतृत्वाने सर्व विरोधकांची साध्य नसलेली एकजूट साध्य करून दाखविली आहे, अशा आशयाच्या या बातम्या आहेत. Rahul Gandhi disqualified from loksabha; political compulsion on all opposition parties to stand behind Congress
बातमीतले “बिटवीन द लाईन्स”!!
पण या बातम्यांकडे वेगळ्या दृष्टीने पाहून त्यातले “बिटवीन द लाईन्स” वाचले, तर काही वेगळेच मुद्दे समोर येतात. ज्या ममता बॅनर्जी, के. चंद्रशेखर राव, नवीन पटनाईक अखिलेश यादव हे वेगवेगळ्या प्रादेशिक पक्षांचे नेते जे राहुल गांधींचे नेतृत्व मानायलाच तयार नव्हते, त्यांना भाजपच्या एका राजकीय खेळीने काँग्रेसच्या मागे उभे राहायला लावले आहे. याचा अर्थ प्रादेशिक नेत्यांची भाजपने काँग्रेसच्या मागे फरफट केली आहे. इतकेच नाही तर नाईलाजास्तव या नेत्यांना राहुल गांधींच्या पाठीशी उभे राहावे लागले आहे.
विरोधकांचे पॉलिटिकल कंपल्शन
दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो, तो म्हणजे राहुल गांधींचे खासदारकी रद्द करून भाजपने त्यांनाच विरोधकांचा “सर्वोच्च नेता” बनवून मोदींसमोर त्यांनाच उभे करण्याचे “पॉलिटिकल कंपल्शन” सर्व विरोधकांना केले आहे आणि या “पॉलिटिकल कंपल्शन” मध्ये सध्या तरी काँग्रेस सह सगळ्या विरोधकांना अडकवले आहे.
मोदी विरुद्ध राहुल
एक प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतःच्या विरोधातील खेळाडू स्वतःच निवडला आहे!! अन्यथा राहुल गांधींच्या लंडन मधल्या भाषणानंतर ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, नवीन पटनाईक, के. चंद्रशेखर राव हे नेते राहुल गांधींच्या नेतृत्वापासून तसे फटकूनच राहात होते. उलट या सर्व नेत्यांनी काँग्रेसला वगळून सर्व विरोधी पक्षांच्या ऐक्याची तयारी देखील चालवली होती. ममता बॅनर्जी यांनी या एकजुटीसाठी अखिलेश यादव, नवीन पटनाईक यांच्याशी चर्चा देखील केली होती. पण आता निदान भाजपच्या आजच्या खेळीने ममता बॅनर्जी आणि बाकीच्या प्रादेशिक पक्षांच्या काँग्रेसला वगळून विरोधी ऐक्य करण्याच्या प्रयत्नांवर एक प्रकारे पाणी फेरले आहे.
मोदींचे रणकौशल्य
कोणत्याही लढाईत ठिकाण आणि विरोधक स्वतःहून निश्चित करणे हे एखाद्या कसलेल्या सेनापतीचे विशेष रणकौशल्य मानले जाते. हे रणकौशल्य कदाचित भाजपच्या नेतृत्वाने राहुल गांधींची खासदारकी रद्द करून दाखविले आहे. राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्याने नाईलाजास्तव का होईना, पण बाकीच्या सर्व विरोधकांना आता त्यांचे नेतृत्व मान्य करून मोदीं विरोधातील लढाई लढावी लागणार आहे. याचा अर्थ 2024 चा सामना मोदींच्याच अपेक्षेनुसार मोदी विरुद्ध राहुल असा रंगणार आहे. असेच होणार असेल, तर त्यामध्ये सरशी कोणाची होईल हे सांगायला फार मोठ्या राजकीय अभ्यासाची जरूरत नाही!!
भाजपची पुढची राजकीय खेळी
राहुल गांधींचे खासदारकी रद्द केल्यानंतर काँग्रेसने भाजप वर केलेला राजकीय हल्ला परतवून लावण्यासाठी भाजपने देखील तितकीच तयारी चालवली आहे. भाजपने मोदी मंत्रिमंडळातील सर्व ओबीसी मंत्र्यांची बैठक घेऊन राहुल गांधींवर राजकीय प्रतिहल्ला चढवण्याची तयारी चालवली आहे. राहुल गांधींनी सर्व मोदींना चोर ठरवून ओबीसी समाजाविरुद्ध अवमानकारक उद्गार काढल्याचा प्रचार हे ओबीसी मंत्री करणार आहेत. याचा अर्थ भाजपची तयारी देखील काँग्रेस इतकीच मजबूत आहे. राहुल गांधींची खासदारकी वाचवण्यासाठी काँग्रेसचे देशभर निदर्शने करत असतील, तर भाजपचे नेते आणि कार्यकर्ते देखील मागे राहणार नाहीत, हाच इशारा या खेळीतून भाजपने दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App