काँग्रेसने हिंग लावून नाही विचारले, म्हणून विलीनीकरण बारगळले; कबुली देणे भाग पडले!!, अशीच राजकीय अवस्था शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि ममता बॅनर्जींची तृणमूळ काँग्रेस यांची झाल्याचे चित्र आज वेगवेगळ्या वक्तव्यांवरून समोर आले.
पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या तृणमूळ काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर त्यांचा पक्ष फुटला. 20 खासदारांनी आणि 58 आमदारांनी वेगळा सवता सुभा मांडला. त्याबरोबर ममता बॅनर्जी “जागेवर” आल्या. त्यांनी दिल्लीत जाऊन सोनिया गांधींची दोनदा भेट घेतली. अभिषेक बॅनर्जी सुद्धा राहुल गांधींना दोनदा जाऊन भेटले. त्यामुळे काँग्रेस आणि तृणमूळ काँग्रेस यांच्या विलीनीकरणाच्या बातम्या प्रसार माध्यमांमध्ये फुटल्या. पण काँग्रेसने तसा कुठलाच प्रस्ताव दिला नसल्याचा खुलासा काँग्रेसच्या सर्वच वरिष्ठ नेत्यांनी केला.
– कल्याण बॅनर्जींनी टाकली नांगी
त्यामुळे आता विलीनीकरण होत नाही, हे पाहून तृणमूळ काँग्रेसच्या नेत्यांनी सुद्धा नांगी टाकून त्याची कबुली देऊन टाकली. जेवढी मला माहिती मिळाली आहे, त्यानुसार आमचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होत नाही, हे मी तुम्हाला सांगू शकतो. त्यापलीकडे काही सांगता येणार नाही, असे वक्तव्य अभिषेक बॅनर्जींवर चिडलेले, पण ममता बॅनर्जींच्या जवळ असलेले तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी केले. याचा अर्थच सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना भेटी दिल्या, तरी तृणमूल काँग्रेसला विलीनीकरणाचा प्रस्ताव दिला नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळेच तृणमूल काँग्रेस मूळ काँग्रेस पक्षात विलीन होणार नाही, असे वक्तव्य कल्याण बॅनर्जी यांना करणे भाग पडले.
– सुप्रिया सुळेंची तशीच कबुली
कल्याण बॅनर्जी यांनी जसे वक्तव्य केले, तसेच वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी नागपूर मध्ये केले. काँग्रेस आणि शरद पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी एकमेकांना विलीनीकरणाचा प्रस्ताव दिलेला नाही. काँग्रेसने आम्हाला तसा प्रस्ताव दिला नाही किंवा आमच्याकडूनही काँग्रेसला तसा प्रस्ताव गेला नाही, असा खुलासा सुप्रिया सुळे यांनी केला.
– पवारांनीच विषयाला तोंड फोडले, पण…
वास्तविक 2024 मध्येच शरद पवारांनी प्रादेशिक पक्षांच्या काँग्रेस मधल्या विलीनीकरणाच्या विषयाला तोंड फोडले होते. त्यानंतर गेल्या दोन वर्षांमध्ये बऱ्याच राजकीय घडामोडी झाल्या. पण काँग्रेसने एकदाही राष्ट्रवादी काँग्रेसला अधिकृतपणे विलीनीकरणाचा कधीच प्रस्ताव दिला नाही. शरद पवारांच्या गोटातून अनेकदा वेगवेगळ्या बातम्यांच्या पुड्या सुटल्या. त्यात अगदी शरद पवारांना काँग्रेसच्या अध्यक्षपदाची ऑफर दिल्याच्या बातमी पुडी सुद्धा कालच फुटली. पण काँग्रेसच्या गांधी परिवाराने शरद पवारांना ना कधी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची ऑफर दिली ना कधी शरद पवारांना मर्यादेच्या पलीकडे जाऊन जवळ केले. त्यामुळेच सुप्रिया सुळे यांना काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसला विलीनीकरणाचा प्रस्ताव दिला नसल्याचा खुलासा करणे भाग पडले.
– विलीनीकरण बारगळले
काँग्रेसने हरलेल्या प्रादेशिक पक्षांना हिंग लावून विचारले नसल्याचेच हे लक्षण ठरले आणि म्हणूनच विलीनीकरण बारगळले. यापेक्षा बाकी काही घडले नाही.
Congress rejected TMC and NCPsp
महत्वाच्या बातम्या
- RSS : संघाला बदनाम करण्यासाठी मोठा अपप्रचार; पण त्यावर संघाचे उत्तर काय??
- Belfast Riots : बेलफास्टमध्ये स्थलांतरितांविरोधी हिंसाचार भडकला; घरे जाळली, पोलिसांवर हल्ले, आयर्लंड-यूकेमध्ये तणाव
- पवारांना म्हणे, काँग्रेसच्या अध्यक्षपदाची ऑफर की राजकीय पुडी??; पण पवारांनी अध्यक्षपदाची निवडणूक लढविली, तेव्हा काय झाले होते??