नाशिक : एकीकडे शरद पवार आजारी असताना आणि तरीसुद्धा शरद पवार गटाने त्यांच्याच नावाचा आग्रह राज्यसभेसाठी धरला असताना उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांनी मात्र परस्पर चर्चा करून राज्यसभा आणि विधान परिषदेचे गणित बसवायचे तयारी चालविण्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्यात. त्यामुळे शरद पवारांच्या राजकीय विश्वासार्हतेविषयी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांना दाट संशय वाटतो, हेच राजकीय वास्तव यातून समोर आले. Uddhav Thackeray
शरद पवारांच्या शरीरातले पाणी कमी झाल्याने आणि अन्य चाचण्यांसाठी त्यांना पुन्हा एकदा रुबी रुग्णालयात दाखल केल्याची बातमी आली स्वतः सुप्रिया सुळे यांनीच त्यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली. शरद पवारांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे त्यांनी आभार मानले.
काँग्रेसचा पवार विरोधी मतप्रवाह
पण त्या आधीच उद्धव ठाकरे आणि काँग्रेस हायकमांड यांनी राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीची चर्चा केल्याची बातमी समोर आली. यामध्ये दोन्ही पक्षांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला या चर्चेतून वगळले होते. राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवारांचे नाव जरी राज्यसभेसाठी पुढे केले असले, तरी ते महाविकास आघाडी कडून निवडणूक लढवणार राज्यसभेवर निवडून जाणार आणि भाजपलाच डोळा मारत बसणार असे घडणार असेल, तर आपण आपली मते त्यांना का द्यायची??, असा एक मतप्रवाह काँग्रेस मधून यापूर्वीच समोर आलाय. हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रवाहाची दखल घेत काँग्रेस हायकमांडशी चर्चा देखील केली.
रोटेशन नुसार जागा शिवसेनेची
या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस हायकमांडशी केलेल्या चर्चेला विशेष महत्त्व आहे. रोटेशन नुसार राज्यसभेची जागा शिवसेनेची आहे, असा खुलासा यापूर्वीच आदित्य ठाकरे यांनी केला संजय राऊत यांनी जरी शरद पवारांच्या नावाचा आग्रह धरला असला, तरी आदित्य ठाकरे यांनी परस्पर संजय राऊत यांच्या आग्रहाला छेद दिला. म्हणूनच उद्धव ठाकरेंनी थेट काँग्रेस हायकमांडशी चर्चा केली. या चर्चेतून उद्धव ठाकरे यांचा विधान परिषदेचा मार्ग मोकळा होऊ शकतो. कारण काँग्रेसच्या 16 आमदारांची मते आणि शिवसेनेच्या 20 आमदारांची मते अशी 36 मते घेऊन ते विधान परिषदेवर पोहोचू शकतात. त्यासाठी त्यांना शरद पवारांच्या 10 आमदारांच्या मतांची गरज नाही. पण शरद पवारांना मात्र महाविकास आघाडीतून राज्यसभेवर पोहोचायचे असेल, तर मात्र काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या आमदारांच्या मतांची गरज आहे, पण शरद पवारांची राजकीय विश्वासार्हता नसल्याने दोन्ही पक्षांचा आतून त्यांना विरोध आहे.
अजितदादांचीच राष्ट्रवादी पवार फोडतील??
या पार्श्वभूमीवर शरद पवार आजारी असले तरी जर त्यांच्या मनात असेल तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे एकच उमेदवार म्हणून ते राज्यसभेत पोहोचू शकतात, पण त्यासाठी त्यांना भाजपच्या संमतीची गरज लागेल आणि महाविकास आघाडीशी त्यांचे संबंध कायमचे तुटतील. ही राजकीय किंमत मोजायची तयारी असेल, तरच शरद पवार राज्यसभेत पोहोचू शकतील. अन्यथा त्यांना अजित पवारांचे राष्ट्रवादी सुद्धा फोडून स्वतःसाठी मते मिळवावी लागतील पण राजकीय दृष्ट्या मात्र इथेही ते तोट्यात जाण्याची शक्यता आहे. कारण अजित पवारांची राष्ट्रवादी फोडल्याचा त्यांच्यावर राजकीय कारकिर्दीच्या अखेरीस ठपका येईल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App