नाना बोलले, त्यांचे काय चुकले…?? ते खरे बोलले हे चुकले काय…??


विनायक ढेरे

नाशिक – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बोलले… पण त्यांचे काय चुकले…?? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आपल्यावर पाळत ठेवतात. त्यांच्याकडे रोज आयबीचा रिपोर्ट जातो. त्यांचे माझ्या हालचालींवर लक्ष असते, हेच ते बोलले ना…!! मग खरेच आहे की ते. कोणत्याही नेत्याचा असा रिपोर्ट मुख्यमंत्र्यांपर्यंत आणि गृहमंत्र्यांपर्यंत जातोच. ही रूटीन प्रॅक्टिस असल्याचे नबाब मलिकांनी सांगितलेच आहे. हे सांगताना त्यांनी नानांना काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांकडून हे समजावून घ्या म्हणून डिवचलेही आहे. Nana patole`s statement irkes shiv sena and NCP again

तरीही नाना जे बोलले यात मुख्यमंत्र्यांची कशी काय बदनामी होते…?? यात उपमुख्यमंत्र्यांना राग येण्यासारखे काय आहे…?? नाना म्हणाले, पुण्याचे पालकमंत्री बारामतीकर आहेत. ते काँग्रेस नेत्यांची कामे करीत नाहीत. नाना खरे बोललेत का ते…?? पुण्याचे बारामतीकर पालकमंत्री काँग्रेस नेत्यांची कामे करतात का…?? करत असतील तसे ठणकावून सांगावे त्यांनी. पण मग ते का चिडले किंवा संतापले आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली नानांची…?? नाना म्हणाले, की बरोबर राहुन पाठीत खंजीर खुपसलेला सहन करणार नाही. नानांचे हे विधान टोचले का बारामतीकर पालक मंत्र्यांना…?? नाना खरे बोललेत का हे…?? त्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे का…?? खंजीर खुपसण्याचा नुसता भाषणात केलेला उल्लेख जर एवढा खुपत असेल, तर प्रत्यक्ष ज्यांच्या पाठीत खंजीर खुपसला जात असेल, त्यांना किती वेदना झाल्या असतील आणि होत असतील…?? याचा विचार केला आहे का बारामतीकर पुण्याच्या पालकमंत्र्यांनी…??आणि पुन्हा तेच या सगळ्या प्रकारात मुख्यमंत्र्यांची कशी काय बदनामी होते…?? नानांनी तर मुख्यमंत्र्यांविषयी फक्त पाळत ठेवण्याचे विधान केले. पाठीत खंजीर खुपसण्याचे विधान त्यांनी मुख्यमंत्र्यांना लावलेच नव्हते. तरीही उपमुख्यमंत्री चिडल्याची बातमी आल्यावर शिवसेना प्रवक्तेही चिडले आणि त्यांनीही नानांना सुनावून घेतले.

पण एवढे करूनही हे समजतच नाही, की नानांचे भाषण शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांना एवढे का टोचले…?? ते स्वबळाची भाषा बोलले म्हणून…?? की आणखी काही बोलले म्हणून…?? नाना म्हणाले, काँग्रेस वाढत चालली आहे. त्यामुळे या दोन मित्र पक्षांच्या पायाखालची वाळू सरकायला लागली आहे. म्हणूनच ते आपल्याला अडकवणार आहेत, वगैरे वगैरे बरेच भाषण नानांनी केले.

नेमके तेच दोन्ही पक्षांच्या नेत्यांना खटकले आहे. त्यांनी यातली खरी मेख ओळखली आहे. काँग्रेस वाढणार म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढणार. सत्तेतला वाटा काँग्रेस जास्त मागणार. त्यांची मजल मुख्यमंत्रीपदापर्यंत जाणार आणि मग आपल्या राजकीय अस्तित्वाला नख लागणार हे दोन्ही मित्र पक्ष पुरते जाणून आहेत. म्हणूनच नानांना त्यांच्या तीन दिवसांपूर्वीच्या भाषणाचा मुद्दा उकरून काढून कालपासून त्यांना झोडायचे काम सुरू आहे. नानांना झोडायची सुरूवात राष्ट्रवादीने केली आहे म्हणून शिवसेनेने त्यात हात धुवून घेतलाय इतकेच…!!

Nana patole`s statement irkes shiv sena and NCP again

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*