विशेष प्रतिनिधी
मुंबई : MPSC Online Exam विविध विद्यार्थी संघटनांकडून सातत्याने होत असलेल्या मागण्यांची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षा पद्धतीत होणाऱ्या बदलांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करत, एमपीएससीची संगणकआधारित (ऑनलाईन) परीक्षा पद्धत लगेचच लागू न करता, ती ऑगस्ट २०२७ पासून अंमलात आणण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तोपर्यंत सर्व परीक्षा या सध्याच्या प्रचलित (ऑफलाईन) पद्धतीनेच घेतल्या जाणार आहेत.MPSC Online Exam
या महत्त्वपूर्ण बैठकीला एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार, राज्याचे मुख्य सचिव आणि सामान्य प्रशासन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.MPSC Online Exam
- संगणक आधारित परीक्षांची प्रक्रिया ऑगस्ट 2027 पासून करा लागू; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
‘पारदर्शक प्रक्रिया आणि वेळेवर निकाल हाच माझा आग्रह’
बैठकीत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परीक्षा प्रक्रियेबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “राज्यात एक सुरक्षित आणि पारदर्शी निवड प्रक्रिया असावी, हा कायमच माझा आग्रह राहिला आहे. त्यादृष्टीने परीक्षापद्धती सुद्धा पूर्णपणे पारदर्शीच असली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या परीक्षा वेळेत झाल्या पाहिजेत आणि त्याचे निकाल सुद्धा वेळेतच लागले पाहिजेत, यावर आपला भर आहे.”
संगणकआधारित परीक्षा २०२७ पासून का?
एमपीएससीने संगणकआधारित परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या निर्णयाला अनेक विद्यार्थ्यांचा विरोध होता. यावर तोडगा काढताना मुख्यमंत्री म्हणाले की, “सुधारणांचा हा क्रम हाती घेताना एका व्यवस्थेकडून दुसऱ्या व्यवस्थेकडे मार्गक्रमण करणे तितकेच सुरळीत असले पाहिजे. या मोठ्या बदलासाठी प्रत्येक यंत्रणेला सज्जतेसाठी पुरेसा अवधी मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे टप्प्या-टप्प्याने या सुधारणा राबवत संगणकआधारित परीक्षांची प्रक्रिया ही लगेच लागू न करता ऑगस्ट २०२७ पासून अंमलात आणावी.”
विद्यमान प्रचलित पद्धतीनेच होणार परीक्षा
या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना नवीन परीक्षा पद्धतीसाठी सराव करायला आणि मानसिकरीत्या तयार व्हायला पुरेसा वेळ मिळणार आहे. तसेच, सरकारी यंत्रणांनाही आपली सज्जता वाढवता येईल. तोपर्यंत एमपीएससीच्या सर्व परीक्षा या विद्यमान प्रचलित पद्धतीनेच (सध्याच्या ऑफलाईन पद्धतीने) घ्याव्यात, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यानुषंगाने आता पुढील अधिकृत निर्णय एमपीएससीने घ्यावा, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सूचित केले आहे.
MPSC च्या ऑनलाइन परीक्षेला विद्यार्थ्यांचा विरोध का?
MPSC ची परीक्षा संगणकाधारित (CBT) पद्धतीने घेण्याच्या निर्णयाला राज्यभरातील स्पर्धा परीक्षा उमेदवारांनी विरोध दर्शवला आहे. विद्यार्थ्यांच्या मते, केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) आणि बहुतांश राज्य लोकसेवा आयोगांच्या परीक्षा अजूनही ऑफलाइन पद्धतीनेच घेतल्या जातात. त्यामुळे महाराष्ट्रातच ऑनलाइन परीक्षेचा आग्रह का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. ऑनलाइन परीक्षांमध्ये तांत्रिक अडचणी आणि संभाव्य गैरप्रकारांची भीती, विविध सत्रांमुळे लागू होणाऱ्या ‘नॉर्मलायझेशन’ पद्धतीमुळे गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय होण्याची शक्यता, तसेच पारंपरिक ऑफलाइन परीक्षा अधिक पारदर्शक असल्याचा दावा करत विद्यार्थ्यांनी जुनीच परीक्षा पद्धत कायम ठेवण्याची मागणी केली आहे.
MPSC Online Exam Decision Postponed; New System From August 2027
महत्वाच्या बातम्या
- Ukraine : युक्रेनमध्येच बनणार फ्रान्सची क्रूझ क्षेपणास्त्रे; इंटरसेप्टर आणि ग्लाइड बॉम्बही बनतील; युक्रेनची संरक्षण उत्पादन क्षमता वाढेल
- Kudankulam : भारतातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पाचा डेटा लीक; दावा- हॅकर्सनी माहिती डार्क वेबवर टाकली
- संगणक आधारित परीक्षांची प्रक्रिया ऑगस्ट 2027 पासून करा लागू; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
- Igatpuri Tourist : इगतपुरीतील पर्यटक मारहाण प्रकरण; 9 आरोपींची पोलिसांनी काढली धिंड; 18 तारखेपर्यंत कोठडी