विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : Manoj Jarange Patil मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर केलेल्या टीकेला मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “काँग्रेसचे सरकार असताना त्यांनी तरी ओबीसी समाजासाठी काय केले? झोके बांधून दिले होते का?” असा सवाल करत जरांगेंनी वडेट्टीवारांवर निशाणा साधला. तसेच मराठा आणि ओबीसी समाजाने एकमेकांशी संघर्ष न करता सरकारविरोधात एकत्र लढले पाहिजे, असेही ते म्हणाले.Manoj Jarange Patil
उपोषण मागे घेतल्यानंतर प्रकृती बिघडल्याने मनोज जरांगे पाटील यांच्यावर सध्या छत्रपती संभाजीनगरातील गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याच ठिकाणी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विविध मुद्द्यांवर भूमिका मांडली.Manoj Jarange Patil
‘काँग्रेस आणि महायुती दोघांनीही काही केले नाही’
विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना जरांगे म्हणाले, “काँग्रेसच्या काळात ओबीसी समाजाचे काय भले झाले? त्यांनी काय मोठे काम केले? हे सरकारही काही फार चांगले नाही. पण काँग्रेसनेही मराठा आणि ओबीसी समाजासाठी विशेष काही केलेले नाही.”
ते पुढे म्हणाले, “मराठा आणि ओबीसी समाजाने एकमेकांविरोधात उभे राहण्याऐवजी एकत्र आले पाहिजे. राजकारणी आपल्यात वाद निर्माण करतात आणि आपण त्यात अडकतो.”
‘मुख्यमंत्री ओबीसी आरक्षणाला धक्का लावत नाहीत’
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर वडेट्टीवार यांनी केलेल्या टीकेबाबत विचारले असता जरांगे यांनी वेगळी भूमिका मांडली.
“मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री ओबीसी आरक्षणाला धक्का लावत नाहीत. आमच्या नोंदी सापडल्या आहेत, त्यानुसार आमचा हक्क आम्हाला मिळायला हवा. ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, ही आमचीही भूमिका आहे,” असे ते म्हणाले.
‘मराठा-ओबीसींनी सरकारला प्रश्न विचारले पाहिजेत’
जरांगे यांनी पुन्हा एकदा मराठा आणि ओबीसी समाजाला एकत्र येण्याचे आवाहन केले.
“दोन्ही समाजांनी सरकारला प्रश्न विचारले पाहिजेत. तुम्ही सरकारच्या बाजूने उभे राहता आणि मग आमच्यावर टीका करता. त्यामुळे समाजांचे नुकसान होते,” असे ते म्हणाले.
वडेट्टीवार यांनी ओबीसींसाठी रस्त्यावर उतरू असा इशारा दिल्याबाबत विचारले असता जरांगे यांनी टोला लगावत, “रस्त्यावर उतरा, ओढ्यात उतरा किंवा कुठेही उतरा,” अशी प्रतिक्रिया दिली.
धनंजय मुंडेंवर पुन्हा निशाणा
संवादादरम्यान जरांगेंनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही अप्रत्यक्षपणे गंभीर आरोप केले. उपोषणादरम्यान राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमोर आपण नार्को चाचणीचा मुद्दा उपस्थित केला होता, याची आठवण करून देत त्यांनी हा विषय पुन्हा उकरून काढण्याचा इशारा दिला.
“परळीतील काही घडामोडींमध्ये कोणाचा सहभाग होता, कोण कोणाला भेटत होते, आरोपी कोण असायला पाहिजे होते आणि त्यांना साथ कोणी दिली, हे सर्व मी आता बाहेर काढणार आहे,” असे म्हणत त्यांनी धनंजय मुंडेंना अप्रत्यक्ष इशारा दिला.
आरक्षणाच्या मुद्द्यावर नवा वाद
जरांगे यांच्या या वक्तव्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्याबरोबरच राज्यातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. उपोषण मागे घेतल्यानंतरही मराठा-ओबीसी आरक्षणाचा वाद, ५८ लाख कुणबी नोंदी आणि सरकारच्या आश्वासनांवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत.
दरम्यान, जरांगे यांनी सरकारला दिलेल्या मुदतीत शासननिर्णय न निघाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशाराही कायम ठेवला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहण्याची चिन्हे आहेत.
What Did Congress Do for OBCs?: Manoj Jarange Patil Retaliates Against Vijay Wadettiwar
महत्वाच्या बातम्या
- एकनाथ शिंदे राष्ट्रवादीला कोकणात दणका द्यायच्या तयारीत; अनिकेत सुनील तटकरेंना निवडणूक अवघड!
- शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये; 10 जून पर्यंत मान्सूनच्या पावसाच्या आगमनाची शक्यता धूसर; IMD चा इशारा
- Malappuram : केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडूत एनआयएचे १९ ठिकाणी छापे; मलप्पुरम स्फोटकसाठा प्रकरणात मोठी कारवाई
- Pune-Pimpri : पुणे-पिंपरी दारूकांडाचे धक्कादायक सत्य समोर; एकूण मृतांची संख्या 22 वर पोहोचली