विशेष प्रतिनिधी
मुंबई : Jayant Patil राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्याबाबत गेल्या काही दिवसांपासून विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे. जयंत पाटील राज्याचे नवे अर्थमंत्री होणार, तसेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे सत्ताधारी महायुतीत जाणे किंवा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे विलीनीकरण होणार, अशा चर्चांना जोर आला होता. मात्र, या सर्व चर्चांना आता खुद्द जयंत पाटील यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले आहे. पंढरपूर येथे शक्तिपीठ महामार्गाविरोधात सुरू असलेल्या शेतकरी अधिवेशनाला उपस्थित राहिल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना जयंत पाटील यांनी एनडीएमध्ये जाण्याची किंवा अर्थमंत्रिपद स्वीकारण्याची कोणतीही चर्चा नसल्याचे स्पष्ट केले.Jayant Patil
‘एनडीएकडून निमंत्रणच नाही, मग प्रश्नच कुठे?’
एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना जयंत पाटील म्हणाले, “एनडीएने आम्हाला काय निमंत्रण दिलंय? तिथे जाण्याचा प्रश्नच कसा निर्माण होतो? आम्ही कुठल्याही स्पर्धेत नाही. आम्ही कुठलेही खाते मागितलेले नाही किंवा कोणतीही मागणी केलेली नाही.” अर्थमंत्रिपदाच्या चर्चांवर मिश्कील भाष्य करत ते म्हणाले, “गेल्या दोन-तीन दिवसांत तुम्ही माध्यमांनी मला दोन-तीन वेळा अर्थमंत्रिपदाची शपथच दिली आहे.”Jayant Patil
विलीनीकरणाच्या चर्चांनाही पूर्णविराम
दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाबाबतही जयंत पाटील यांनी स्पष्ट भूमिका मांडली. “आमची कोणाशीही विलीनीकरणाची चर्चा सुरू नाही. या क्षणापर्यंत कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नाही. माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्या पाहून आमचीच करमणूक होते,” असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, “आम्ही आजही सरकारच्या विरोधातच काम करत आहोत. शक्तिपीठ महामार्गाविरोधातील आंदोलनासाठी आम्ही येथे आलो आहोत. त्यामुळे सत्तेत जाण्याच्या चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नाही.”
‘सर्व आमदार-खासदार शरद पवारांसोबतच’
पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये, असे आवाहन करत जयंत पाटील म्हणाले की, “सर्व आमदार, खासदार आणि कार्यकर्ते शरद पवार साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवण्याचे कारण नाही.”
सोनम वांगचुक प्रकरणावर केंद्र सरकारवर टीका
दिल्लीतील जंतर-मंतरवरील आंदोलनस्थळावरून पर्यावरण अभ्यासक सोनम वांगचुक यांना हटवून रुग्णालयात दाखल करण्याच्या कारवाईवरही जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर टीका केली. ते म्हणाले, “वीस दिवसांपासून शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या सोनम वांगचुक यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात हलवणे समजू शकते. मात्र, लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या इतर समर्थकांना हटवण्याचे कारण समजत नाही.”
‘पत्नीला सोबत राहण्याची परवानगी द्यावी’
जयंत पाटील यांनी सोनम वांगचुक यांच्या पत्नीला त्यांच्यासोबत राहण्याची परवानगी देण्याची मागणी केली. त्यांनी यापूर्वीच्या घटनेचाही उल्लेख करत म्हटले की, “याआधी वांगचुक यांना राजस्थानमध्ये नेले होते, तेव्हाही त्यांच्या पत्नीला भेटू दिले नव्हते. त्यांना ताब्यात का घेतले आणि नंतर का सोडले, हे आजतागायत स्पष्ट झालेले नाही.”
नेमकं प्रकरण काय?
गेल्या 28 जूनपासून सोनम वांगचुक हे ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ जंतर-मंतर येथे उपोषण करत होते. त्यांची प्रकृती खालावल्याने आणि डॉक्टरांनी आरोग्याबाबत गंभीर इशारा दिल्यानंतर दिल्ली हायकोर्टाच्या आदेशानुसार दिल्ली पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. या कारवाईनंतर आंदोलनस्थळी तणाव निर्माण झाला असून, 20 जुलै रोजी प्रस्तावित ‘संसद मार्च’च्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
No NCP Merger or NDA Alliance: Jayant Patil Dismisses Finance Minister Rumors
महत्वाच्या बातम्या
- पोलिसी बळावर टेल्कोचे आंदोलन मोडून काढणाऱ्या पवारांना सोनम वांगचुकचे आंदोलन मोडून काढल्याचे दुःख!!
- सुप्रिया सुळे यांना पुढचे काही दिवस गप्प राहण्याचा सल्ला; पण दिला कुणी आणि कशासाठी??
- आषाढी वारीत वारकऱ्यांच्या सेवेसाठी ‘फिनोलेक्स’चा पुढाकार; लाखो साहित्याचे वाटप; वारकऱ्यांकडूनही उपक्रमाचे कौतुक
- Japan : बुलेट-ट्रेन प्रकल्प उशिरा झाल्याने जपानचे माजी मंत्री नाराज; म्हटले- आम्ही खूप मेहनत केली, पण भारतीय मंत्र्यांचे वर्तन खराब होते