विशेष प्रतिनिधी
पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विस्तार म्हणजे संघ आणि समाज यांनी एकरूप होऊन राष्ट्रकार्यासाठी सज्ज होणे` याच उद्दिष्टाने संघ शताब्दीनिमित्ताने देश व राज्यभरात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात ७ शासकीय जिल्ह्यांमधून समाजातील विविध संस्था- संघटनांतर्फे तीन हजारांहून अधिक ‘सकल हिंदू संमेलनांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात १२ लाख नागरिकांसह संघ स्वयंसेवक – कार्यकर्ते सहभागी होत आहेत. तसेच मागील महिन्यात शताब्दीनिमित्ताने झालेल्या गृहसंवाद अभियानात १० लाख ८५ हजारांहून अधिक कुटुंबापर्यंत स्वयंसेवक पोहोचले. त्यांनी कुटुबांतील सदस्यांशी पंचपरिवर्तनाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. अशी माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे संघचालक प्रा. सुरेश (नाना) जाधव यांनी दिली.
संघ आणि समाजातील दुवा अधिक घट्ट करण्यासाठी एप्रिल अखेरपर्यंत प्रांतभरात ३००० तर पुणे महानगरात ४५० सकल हिंदू संमेलनाचे आयोजन होणार आहेत, असेही प्रा. जाधव यांनी सांगितले.
गृहसंवाद अभियानात पश्चिम महाराष्ट्र प्रांतात संघदृष्ट्या असलेल्या २४ जिल्ह्यात १० लाख ८५ हजार कुटुंबापर्यंत पोहोचण्यासाठी ४५ हजारांहून अधिक संघ स्वयंसेवक- कार्यकर्ते सहभागी झाले. तर या अभियानाचा भाग असलेल्या पुणे महानगरात ५५ नगरातील ५१२ वस्त्यांमधून ३ लाख ४९ हजार ५३ घरांपर्यंत स्वयंसेवक पोहचले व प्रत्यक्ष संवाद साधला. त्यात १० हजार ८७९ स्वयंसेवक कार्यकर्ते सहभागी झाले होते. अशी माहिती जाधव यांनी दिली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा दि. १३ ते १५ मार्च २०२६ दरम्यान हरियाणा येथे झाली. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या प्रतिनिधी सभेमध्ये देशभरातून 1438 प्रतिनिधी सहभागी झाले होते. प्रतिनिधी सभा आणि संघाची पश्चिम महाराष्ट्र प्रांतातील कार्याची सद्य:स्थिती संबंधाने सोमवारी (१६ मार्च २६) आयोजित पत्रकार परिषदेत रा. स्व. संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक प्रा. सुरेश (नाना) जाधव यांनी माहिती दिली. यावेळी पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव, पुणे महानगर कार्यवाह सचिन भोसले, विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष अभय कुलकर्णी उपस्थित होते.
संघाचा विस्तार केवळ शाखांपुरता मर्यादित न राहता, तो समाजाच्या अखेरच्या घटकापर्यंत पोहोचून समाजकार्यात विरघळून जावा, हा या सकल हिंदू संमेलनांच्या आयोजनाचा मुख्य हेतू आहे. या संमेलनांच्या माध्यमातून सकल हिंदू समाजातील विविध जाती-जमाती, पंथ आणि घटकांना एकत्र आणून ‘समरस आणि संघटित’ समाज निर्मितीचा प्रयत्न केला जाणार आहे. पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या नियोजनानुसार, एप्रिल अखेरपर्यंत प्रांतातील गाव, वस्ती आणि नगर स्तरावर ही सकल हिंदू संमेलने होणार आहेत. यामध्ये राष्ट्रभक्ती, सामाजिक एकता आणि सेवा कार्यावर विशेष भर दिला जाणार असून, हजारो स्वयंसेवक आणि नागरिक या उपक्रमात सक्रिय सहभागी होत आहेत.
प्रतिनिधी सभेबद्दल अधिक माहिती देताना प्रांत संघचालक प्रा. नानासाहेब जाधव यांनी सांगितले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तीन दिवसीय अखिल भारतीय प्रतिनिधी सभा, संघटन कार्याचा विस्तार, राष्ट्रहितासाठी समाजातील सज्जन शक्तीची अधिक सक्रियता आणि सामाजिक समरसतेच्या संकल्पासह पार पडली. गेल्या वर्षभरात संघटन कार्यात लक्षणीय वाढ झाली आहे. देशभरात संघाच्या शाखांमध्ये सुमारे ६ हजारांची भर पडली असून त्या ८८ हजारांहून अधिक झाल्या आहेत, तर शाखांची ठिकाणे ५५ हजारांपेक्षा जास्त झाली आहेत. यासोबतच साप्ताहिक मिलन आणि संघमंडळींच्या संख्येतही वाढ झाली आहे. संघटन कार्याचा हा विस्तार केवळ आकड्यांपुरता मर्यादित नसून अंदमान, अरुणाचल प्रदेश, लेह आणि दुर्गम जनजातीय क्षेत्रांतही संघाच्या शाखा कार्यरत आहेत, हे महत्त्वाचे आहे. संघ शताब्दी वर्षाच्या कार्यक्रमांमध्ये हा संघटनात्मक विस्तार स्पष्टपणे दिसून येत आहे.
डॉ. दबडघाव म्हणाले, “संघटनात्मक विस्तारासोबतच संघ समाजात गुणवत्ता वाढविण्यासाठी निरंतर कार्य करत आहे. ‘पंच परिवर्तना’च्या माध्यमातून समाजाला सकारात्मक बदलासाठी प्रेरित करणे महत्त्वाचे आहे. भारतीयत्व किंवा हिंदुत्व हा केवळ एक विचार नसून ती एक जीवनशैली आहे आणि त्या माध्यमातून समाजात गुणवत्तेचा विस्तार व्हायला हवा. याच उद्देशाने समाजातील सज्जनशक्तीला एकत्र करणे आणि या विधायक शक्तीचा राष्ट्रहितासाठी उपयोग होणे आवश्यक आहे.’’
एकूण आकडेवारीनुसार, देशात गेल्या वर्षी ५१,७४० ठिकाणी ८३,१२९ शाखा कार्यरत होत्या, त्या आता वाढून ५५,६८३ ठिकाणी ८८,९४९ शाखा झाल्या आहेत. अशा प्रकारे एका वर्षात ३,९४३ नवीन ठिकाणे जोडली गेली असून शाखांच्या संख्येत ५,८२० ने वाढ झाली आहे.
संघ कार्याची पश्चिम महाराष्ट्र प्रांतातील आकडेवारी
नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, सांगली, सातारा आणि कोल्हापूर या सात शासकीय जिल्ह्यांना पश्चिम महाराष्ट्र प्रांत म्हणून ओळखले जाते. सर्वच तालुका आणि उपखंड स्तरावर संघाचे कार्य पोहचलेले आहे. या विस्तारात पश्चिम महाराष्ट्र प्रांतात १९८ ठिकाणी ७७६, शाखा ३०७ ठिकाणी ७०५ साप्ताहिक मिलने व २६० ठिकाणी २८४ संघमंडळी असा विस्तार आहे. तर सेवाभारती आणि रा.स्व. संघाच्या विविध संस्थांच्या वतीने १७ प्रकारची ८०० हून अधिक सेवा कार्ये प्रांतात सुरु आहेत.असेही डॉ. दबडघाव यांनी सांगितले.
कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग
संघ स्वयंसेवकांच्या सर्वांगीण विकासासाठी वर्षभरात विविध प्रशिक्षण वर्गांचे आयोजन होते. पश्चिम महाराष्ट्र प्रांतात मागील वर्षभरात ९८५ संघ कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. ज्यामध्ये १२ प्राथमिक वर्गांमधून ५४३ कार्यकर्त्यांना प्रशिक्षण मिळाले. तर दोन संघ शिक्षा वर्गांतून ४४२ कार्यकर्ते प्रशिक्षित झाले. यावर्षी एप्रिल आणि मे महिन्यातही संघ शिक्षा वर्गांचे नियोजन करण्यात आले आहे. साधारणपणे प्रांतातील १,५०० कार्यकर्ते वर्षभरात विविध प्रशिक्षण वर्गात सहभागी होतात.
प्रस्तावित संघ प्रशिक्षण वर्ग
सोलापूर येथे १५ मे ते ३१ मे दरम्यान संघ शिक्षा वर्ग (सामान्य) तर नागपूर येथे याच कालावधीत संघ शिक्षा वर्ग विशेष होईल. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी पुणे परिसरात १९ जून ते ५ जुलै दरम्यान संघ शिक्षा वर्ग प्रस्तावित आहे. जळगाव येथे १० मे ते ३१ मे कालावधीत कार्यकर्ता विकास वर्ग १ होणार आहे. अखिल भारतीय स्तरावर होणारा कार्यकर्ता विकास वर्ग २ हा नेहमीप्रमाणे नागपुरात १० मे ते ५ जून या कालावधीत पार पडेल,या वर्गाला सरसंघचालक उपस्थित असतात.
प्रतिनिधी सभेत संत शिरोमणी सद्गुरु श्री रविदासजी यांच्या ६५० व्या प्रकट वर्षाच्या निमित्ताने त्यांना आदरांजली वाहण्यात आली. संत शिरोमणी रविदासजी यांनी सामाजिक कुप्रथा आणि विषमतेविरुद्ध लढा देत समरस समाज घडवला. त्यांनी श्रमाची प्रतिष्ठा, सदाचार आणि जातीभेदाचा त्याग यावर भर दिला. परकीय आक्रमकांच्या काळात स्वधर्माचे रक्षण करत त्यांनी मीराबाईंसारख्या अनेकांना प्रेरित केले. त्यांचे जीवनकार्य आजही विभाजनकारी शक्तींविरुद्ध राष्ट्रीय एकात्मतेसाठी अत्यंत मार्गदर्शक आणि प्रेरणादायी आहे. असे प्रतिपादन प्रतिनिधी सभेत निवेदनाद्वारे केले आहे .
प्रतिनिधी सभेत गेल्या वर्षभरात निधन झालेल्या विविध मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यात पू. दुर्गानंद गिरी महाराज, उपमुख्यमंत्री अजित पवार, डॉक्टर अशोक मोडक, वसंत देवधर, यशवंतराव लेले, श्रीमती शालिनीताई पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
पश्चिम महाराष्ट्र प्रांतातील – उल्लेखनीय उपक्रम
२ जानेवारी १९४० रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कराड येथील भवानी सायं शाखेला भेट दिली होती. या ऐतिहासिक प्रसंगाचे स्मरण म्हणून यावर्षी प्रांतातील १२ जिल्ह्यांमध्ये’बंधुता परिषदे’चे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेमध्ये २७३६ बंधू सहभागी झाले होते.
समाजाभिमुख उपक्रमात पुणे महानगरातील सिंहगड भागात ‘पॉलिथीन मुक्त मंदिर क्षेत्र’ अभियानांतर्गत पर्यावरणपूरक आषाढी एकादशी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्राचीन श्री क्षेत्र विठ्ठलवाडी मंदिर परिसरात आषाढी एकादशीला पॉलिथीन आणि थर्माकोल कचऱ्याची समस्या निर्माण होऊ नये, यासाठी मागील तीन वर्षांपासून कागदी पिशव्यांच्या वापराला प्रोत्साहन देण्याचा निरंतर पुढाकार घेतला जात आहे. मंदिर न्यास, पुणे महानगरपालिका, पोलीस विभाग आणि स्वयंसेवकांच्या समन्वयाने यासाठी योजना आखण्यात आली. विविध शाळा, सामाजिक संस्था आणि नागरिकांच्या सहकार्याने ११ हजार पेक्षा अधिक कागदी पिशव्या तयार करून त्यांचे वाटप करण्यात आले. एकादशीच्या दिवशी सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत स्वयंसेवकांनी फूल विक्रेते आणि भाविकांना मोफत कागदी पिशव्या उपलब्ध करून दिल्या.
संघटनात्मक कार्यक्रमात पुण्यातील सिंहगड भागात संस्कृत सुभाषित स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सिंहगड भागातील बारा शाखांनी त्यात सहभाग घेतला. तसेच मानचित्र परिचयाचे एकूण 49 कार्यक्रम झाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App