– नारी तू नारायणी परिषदेत महिलांच्या आत्मनिर्भरतेवर विचारमंथन
विशेष प्रतिनिधी
पुणे : त्याग, पराक्रम आणि सेवा समाजघडणीसाठी आवश्यक आहे. महिलांमध्ये ऋजुता असते.त्यामुळे सेवेची प्रेरणा मुळातच त्यांच्या अंगी असते. संकल्प, सहृदयता, समय आणि सातत्य यांच्या आधारे स्त्रियांनी अनेक क्षेत्र पादाक्रांत केली आहेत. समाजाच्या उत्थानासाठी पंचपरिवर्तानातील सर्व क्षेत्रात सेवा आवश्यक आहे आपण कृतीतून सर्वत्र पोहोचुया असा संदेश डॉ. अनघा लवळेकर यांनी दिला.
राष्ट्र सेविका समिती आणि ज्ञानभारती यांच्या वतीने ‘नारी तू नारायणी’ परिषदेचे आयोजन कर्वेनगर येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या के. बी. जोशी सभागृहात करण्यात आले होते. त्यावेळी समारोप सत्रात त्या बोलत होत्या. जिजामाता स्मारक समिती आणि बाया कर्वे स्त्री अभ्यास आणि संशोधन केंद्र या परिषदेचे सह आयोजक होते.यावेळी राष्ट्र सेविका समितीच्या प्रांत कार्यवाहिका शैलजा देशपांडे, डॉ. प्रज्ञा कुलकर्णी, जिजामाता स्मारक समितीच्या अध्यक्ष आशा साने, कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या युनिट हेड स्वाती रानडे, ज्ञान भारतीच्या प्रांत समन्वयक सुनिता पेंढारकर व्यासपीठावर उपस्थित होत्या.
लवळेकर पुढे म्हणाल्या, भारतीय संस्कृतीत स्वतःचा आविष्कार दुसऱ्यांच्या सेवेतून होतो. सेवा प्रेरणेतून आशावाद जोपासला जातो आणि त्यातूनच भेदांच्या भिंती कोसळू शकतात. त्यामुळे प्रेरणेचे पोषण करायला हवे. सेवा प्रेरणा वळवाच्या पावसासारखी न होता चिरंतन असावी. पंचपरिवर्तानातील सर्व क्षेत्रात सेवा आवश्यक आहे. आपण कृतीतून राष्ट्र घडणीसाठी योगदान देऊ या, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
‘नारी तू नारायणी’ या विषयावर डेक्कन कॉलेजच्या डॉ. प्रज्ञा कुलकर्णी यांचे बीजभाषण झाले. आजपासून सात हजार वर्षे मागे जाऊन पाहिले तर वेदकाळापासून आपण स्त्री -पुरुष एक सारखे नाहीत पण समान आहोत हाच धागा सापडतो. वेदकालीन सर्व पातळीवरील महिलांना समान स्थान होते. त्या यज्ञ करत, सारथ्य करत,निर्णय घेत आणि त्याकाळी महिलांचे पुनर्विवाह झालेले सुद्धा आढळतात,असे त्यांनी सांगितले. स्त्रीवाद यासारख्या शब्दाचा जन्मही त्याकाळी झाला नव्हता. बाह्य रूपाने आपण (महिला) वेगळ्या आहोत पण एक शक्ती निसर्गाने आपल्याला दिलेली आहे. मानवाला हे जाणवले की, आपल्यापेक्षा एक शक्ती ताकदवान आहे जी सर्व गोष्टी घडवते त्यातून सूर्य, चंद्र, पृथ्वी, पर्जन्य यांना देवत्व बहाल केले गेले. मौखिक परंपरेतून वैदिक साहित्य अष्टविकृतींच्या सहाय्याने जोपासले गेले. त्यातूनच ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद निर्माण झाले त्याची अत्यंत सोप्या शब्दात उकल त्यांनी केली. रूढी आणि परंपरा यात रूढींवर तोडगा काढायला हवा. परंपरा मात्र सणांचा गाभा पुढे नेण्यासाठी त्यांचे सुलभीकरण करणे आवश्यक आहे आणि ते आपणच ठरवायचे आहे.असेही त्या म्हणाल्या.
यावेळी ‘कृती ते कर्तृत्व’ या सत्रात दोन महिला संशोधकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यामध्ये ‘पोर्टेबल बायो-टॉयलेट’च्या संशोधक डॉ. आरती शास्त्री यांनी स्वच्छ भारत,पोर्टेबल बायो-टॉयलेटची गरज ओळखून समाजाच्या सेवेसाठी अर्पण केलेल्या उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. प्रत्येक घरात, सोसायटीत अशा उपकरणांची गरजही त्यांनी अधोरेखित केली. तर येणाऱ्या संकटांवर मात करत स्वतःचे आणि समाजाचे संरक्षण करण्यासाठी ‘फ्लड फोरकास्ट मॉडेल’वर काम करणाऱ्या डॉ. प्रज्ञा दीक्षित यांनी विविध उदाहरणे देत ए आय च्या मदतीने उभारलेल्या विविध मॉडेलची माहिती यावेळी दिली.
वैष्णवी सहस्रबुद्धे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, स्वाती जोशी यांनी आभार मानले. प्राची पाठक यांनी म्हणलेल्या संपूर्ण वंदेमातरम् ने परिषदेचा समारोप झाला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App