• Download App
    Congress काँग्रेसच्या माघारीचा त्रिफळा; पवार + ठाकरेंकडून राजकीय इज्जतीचा चोळामोळा!!

    काँग्रेसच्या माघारीचा त्रिफळा; पवार + ठाकरेंकडून राजकीय इज्जतीचा चोळामोळा!!

    नाशिक : काँग्रेसच्या माघारीचा त्रिफळा; पवार + ठाकरेंकडून राजकीय इज्जतीचा चोळामोळा!!, हेच राजकीय वास्तव आज विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने समोर आले‌. विधान परिषदेची १० जागांची निवडणूक आज बिनविरोध झाली. कारण सर्वच पक्षांनी आपापल्या राजकीय ताकदीनुसार उमेदवारांची संख्या दिली. पण या सगळ्या राजकारणात महाराष्ट्रातून तब्बल 14 खासदार निवडून दिलेली काँग्रेस मात्र राजकीयदृष्ट्या तोट्यात गेली.

    राज्यसभा निवडणुकीत माघार

    राज्यसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने शरद पवारांनी स्वतःच्याच नावाची हॅट रिंगणात टाकून सुरुवातीला काँग्रेसला माघार घ्यायला लावली. अर्थात त्यासाठी सुप्रिया सुळे यांना काँग्रेसच्या नेत्यांचे उंबरठे झिजवावे लागले. दिल्लीतल्या आणि महाराष्ट्रातल्या नेत्यांच्या घरी जाऊन त्यांना शरद पवारांना पाठिंबा देण्याची विनंती करावी लागली. काँग्रेसने सुद्धा सुरुवातीपासून बरेच आढेवेढे घेत अखेरच्या दिवशी शरद पवारांना पाठिंबा दिला. त्यामुळे शरद पवार अख्ख्या महाविकास आघाडीचे एकमेव उमेदवार म्हणून राज्यसभेत पोहोचू शकले. पण त्या निवडणुकीत काँग्रेसला माघार घ्यावी लागली.

    बारामतीत माघार

    त्या पाठोपाठ सुनेत्रा पवारांच्या बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवार जाहीर केला, त्यासाठी काँग्रेसला सुरुवातीला शरद पवारांनी फूस दिली, पण तिथली राजकीय परिस्थिती पाहून निवडणूक बिनविरोध करायच्या नादात शेवटी काँग्रेसलाच माघार घ्यावी लागली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुत्सद्देगिरी त्यासाठी कामी आली. पण तेव्हा सुद्धा राष्ट्रवादीच्या नेत्यांना आणि भाजपच्या नेत्यांना काँग्रेस नेत्यांच्या घरी जाऊन किंवा त्यांना फोन करून सुनेत्रा पवार यांसाठी पाठिंबा मिळवावा लागला.



    उद्धव ठाकरेंनी स्वस्तात निपटवले

    पण उद्धव ठाकरे यांनी मात्र त्या तुलनेत काँग्रेसला फारच स्वस्तात निपटवून टाकले. शरद पवारांनी जशी स्वतःहून राज्यसभेची निवडणूक लढविली, तशीच उद्धव ठाकरे स्वतःच विधान परिषदेची निवडणूक लढवतील, असा सुरुवातीला काँग्रेसचा आणि राष्ट्रवादीचा होरा होता. स्वतः सुप्रिया सुळे आणि हर्षवर्धन सपकाळ यांनी उद्धव ठाकरे यांना भेटून तशीच विनंती केली होती. पण उद्धव ठाकरे यांनी संसदीय राजकारणातून रस काढून घेऊन सुप्रिया सुळे आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या विनंतीला बाजूला सारले. त्यांनी स्वतःच्या ऐवजी अंबादास दानवे यांची उमेदवारी जाहीर केली.

    पुढच्या निवडणुकीतला शब्द खरंच दिलाय का??

    त्यामुळे काँग्रेस एकदम फ्रंट फूटवर खेळायला लागली. त्यांनी विधान परिषदेसाठी उमेदवार देण्याची तयारी सुरू केली. पण उद्धव ठाकरे यांनी अनिल देसाई आणि अनिल परब या दोन नेत्यांना गांधी भवन मध्ये पाठवून हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घ्यायला लावली आणि काँग्रेसच्या उमेदवाराला जाहीर करण्यापूर्वीच माघार घ्यायला लावली. त्यामुळे काँग्रेस सलग तिसऱ्यांदा राजकीय दृष्ट्या तोट्यात गेली. पण त्याआधी सपकाळ यांनी पुढच्या राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा शब्द त्यांनी ठाकरे यांच्याकडून मिळवल्याचे सांगण्यात येते. पण या पाठिंब्याच्या शब्दांचा उच्चार ठाकरेंच्या नेत्यांनी केला नाही. असा शब्द दिल्याच्या बातम्या फक्त मराठी माध्यमांनी त्यांच्या सूत्रांच्या हवाल्याने दिल्या.

    जोखडातून मुक्त व्हायचा प्रयत्न

    काँग्रेसने वर उल्लेख केलेल्या प्रत्येक निवडणुकीत शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांच्या जोखडातून स्वतःला मुक्त करायचा प्रयत्न केला. काँग्रेसच्या नेत्यांनी शरद पवारांच्या नेत्यांना आपल्यापुढे झुकायला सुद्धा काही प्रमाणात भाग पाडले. शरद पवारांच्या पक्षाचे नेते ज्यावेळी काँग्रेसच्या पक्षाच्या नेत्यांच्या घरी गेले किंवा त्यांना फोन केला, त्या नंतरच काँग्रेसच्या नेत्यांनी पवार कुटुंबीयांच्या निवडणुकीसाठी राजकीय माघार घेतली, पण उद्धव ठाकरे यांनी स्वतः कुणालाही फोन केला नाही. त्यांनी फक्त आपले दोन दूत गांधी भवनात पाठवून अंबादास दानवे यांना काँग्रेसचा पाठिंबा मिळवून घेतला. त्यामुळे काँग्रेसचा माघारीचा त्रिफळा उडाला आणि राजकीय इज्जतीचा चोळामोळा झाला.

    Congress third time Retreat in Maharashtra elections

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    BJP Navnath Ban : केदारनाथ नको, औरंगजेबाच्या कबरीवर जा!:संजय राऊतांवर भाजपची सडकून टीका

    Eknath Shinde : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदेंची पत्रकार परिषद; इंडिया आघाडी आणि उद्धव ठाकरेंवरही टीका

    Longest serving PM : नरेंद्र मोदी, सेवारत जन स्वधर्म तत्पर!!