– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम
विशेष प्रतिनिधी
पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दुर्गतीर्थ किल्ले शिवनेरी येथील ‘महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित मराठा सेवा संघ – अभिवादन सभा’ येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आई तुळजाभवानीचा आशीर्वाद घेतला. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक, युगपुरुष, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना अभिवादन केले. यासोबतच धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज आणि महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाही विनम्र अभिवादन केले. Devendra Fadnavis
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज नसते तर भारताचा इतिहास आणि भूगोल यांपैकी काहीही शिल्लक राहिले नसते. अत्यंत प्रतिकूल काळात अनेक राजे-महाराजे मुघलांचे मांडलिकत्व स्वीकारून कार्य करत असताना, राजमाता जिजाऊ माँसाहेब यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना, हिंदुस्थान आणि मराठी मुलखाला मुघलांच्या जोखडातून मुक्त करून ‘रयतेचे राज्य’ स्थापन करण्याची प्रेरणा व ध्येय दिले.
– सागरी सुरक्षेला महत्त्व
अठरापगड जातींना एकत्रित करत छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना केली. समता, सन्मान, न्याय आणि महिला सुरक्षा यांसह सर्वसमावेशक राज्यव्यवस्था उभी केली. करप्रणालीतील सुधारणा, जलव्यवस्थापन, वनसंवर्धन तसेच जलदुर्गांच्या उभारणीतून सागरी सुरक्षेला दिलेले महत्त्व हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दूरदृष्टीचे प्रतीक असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधोरेखित केले.
– जागतिक वारसा स्थळ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांना यूनेस्कोतर्फे ‘जागतिक वारसा स्थळ’ म्हणून मान्यता मिळाली असून, जगाने या वारसा स्थळांना एकमताने संमती दिली आहे. जागतिक वारसा निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेरणा घेऊन त्यांनी दाखविलेल्या मार्गानेच आपण वाटचाल करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिलेला स्वराज्याचा मार्ग हा प्रत्येकाच्या विकासाचा आणि उन्नतीचा मार्ग आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
शिवनेरीवर उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांचा फार जीव होता, असे नमूद करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पुणे जिल्ह्याताली छत्रपतींचे सर्व किल्ले अतिक्रमणमुक्त झाले आहेत. 2030 साली छत्रपती शिवाजी महाराज यांची 400 वी जयंती जगभरातील डोळे दिपवेल अशा भव्य स्वरूपात साजरी करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
– शिवनेरी भूषण पुरस्कार प्रदान
याप्रसंगी राज्य पोलीस दलाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना देण्यात आली. राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या लेकींनी प्रेमपूर्वक ‘पाळणा गीत’ सादर करून संपूर्ण वातावरण शिवमय केले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पालखीची विधिवत पूजा केली. तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘शिवनेरी भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आले.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार, आमदार शरद सोनवणे व इतर मान्यवर उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App