विशेष प्रतिनिधी
मुंबई: अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची येत्या एक-दोन दिवसांत प्रत्यक्ष भेट घेणार असून, त्यांच्या मागण्यांबाबत पुढील २४ तासांत योग्य निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.
जरांगे यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर सरकार मराठा समाजाच्या मागण्यांसोबत असून त्या पूर्ण करण्यासाठी आपण जरांगे यांच्या सातत्याने संपर्कात असल्याचे सामंत यांनी सांगितले.
“मनोज जरांगे माझे मित्र आहेत. आमचे संबंध राजकारण आणि आंदोलनाच्या पलीकडचे आहेत. कोणाच्या गैरसमजातून त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल चुकीचे बोलू नये. त्यांनी आपला गैरसमज दूर करावा,” असे सामंत म्हणाले.
जरांगे यांच्या उपोषणाला प्रत्युत्तर म्हणून एकनाथ शिंदे यांचा मेळावा आयोजित करण्यात आल्याचा समज चुकीचा असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले. “युवा संवाद आणि शेतकरी मेळाव्याचे नियोजन दोन महिन्यांपूर्वीच करण्यात आले होते. हा कार्यक्रम ७ जुलै रोजी होणार होता. मात्र, एकनाथ शिंदे आजारी असल्यामुळे त्या दिवशी तो होऊ शकला नाही. कोणालाही प्रत्युत्तर देण्यासाठी हा मेळावा घेण्यात आलेला नव्हता,” असे त्यांनी सांगितले.
मराठा आरक्षणाबाबत शंका निर्माण करणे किंवा मराठा समाजाला कमी लेखणे, हा मेळाव्याचा उद्देश नव्हता, असेही सामंत यांनी म्हटले.
“मनोज जरांगे यांनी खासदार संजय जाधव यांना दूरध्वनी केला, त्या वेळी मेळाव्यासाठी हजारो लोक आधीच जमले होते. त्यामुळे शिंदे यांना तो कार्यक्रम घ्यावा लागला,” असे त्यांनी स्पष्ट केले.
एकनाथ शिंदे यांनी स्वतः दूरध्वनी करून जरांगे यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केल्याचे सामंत यांनी सांगितले.“आंदोलने होत राहतील आणि मागण्याही मान्य होतील. मात्र, जरांगे यांनी आपल्या प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे, असे शिंदे यांनी मला सांगितले,” असे सामंत म्हणाले.
एकनाथ शिंदे यांची भूमिका मराठा समाजाला आरक्षण देण्याची राहिली असून, आरक्षणात अडथळा निर्माण करण्याची भूमिका ते कधीही घेणार नाहीत, असा दावा त्यांनी केला.
खासदार संजय जाधव यांनीही वेळोवेळी जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला असल्याचे सामंत म्हणाले. जरांगे यांनी शिंदे यांच्याबाबतचा गैरसमज दूर करावा आणि त्यांच्या भूमिकेवर विश्वास ठेवावा, असे आवाहनही त्यांनी केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App