नाशिक : पश्चिम बंगालमध्ये ममतांच्या पक्षात फूट; पण शिंदे पॅटर्नची मात्र खोटी हूल!!, हेच राजकीय वास्तव आज समोर आले. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूळ काँग्रेसच्या आमदारांनी बंडखोरी करून पक्षात फूट पाडली खरी, पण त्याचे शिंदे पॅटर्न मराठी आणि इतर माध्यमांनी खोटे रिपोर्टिंग केले. कारण ममता बॅनर्जींच्या पक्षात पडलेल्या फुटीची एकनाथ शिंदेंच्या बंडाशी तुलना करणे अर्धा-अर्थी संपूर्ण चूक आहे. तीच चूक मराठी आणि इतर माध्यमांनी केली.
– फुटीचे सिग्नल आधीपासूनच
कारण ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये पडलेली फूट एकनाथ शिंदे यांच्या बंडा पेक्षा पूर्ण वेगळी आहे. ममता बॅनर्जींचा पराभव झाल्यानंतर त्यांच्या पक्षातल्या राजकीय फटी आधीच रुंदावल्या होत्या. त्यांच्या पक्षाचा राष्ट्रीय मुख्य प्रवक्ता पक्षापासून दूर झाला. त्याचबरोबर तृणमूळ काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेल्या काही आमदारांनी सुद्धा जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर पक्षाच्या शंभर नगरसेवकांनी सुद्धा राजीनामे देऊन ममता बॅनर्जींना नाराजीचे व्यवस्थित सिग्नल दिले होते.
– तृणमूल काँग्रेसच्या 58 आमदारांची बंडखोरी
पण ममता बॅनर्जी यांनी त्या सगळ्या सिग्नल कडे दुर्लक्ष केले आणि त्यामुळेच त्यांच्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या 58 आमदारांनी आज बंडखोरी करून स्वतंत्र गट स्थापन करत असल्याचे पत्र विधानसभेच्या अध्यक्षांना दिले. त्यांनी आपल्या गटाच्या नेतेपदावर ऋणब्रत बॅनर्जी यांची निवड केली. याच ऋणब्रत बॅनर्जी यांना ममता बॅनर्जी यांनी दोनच दिवसांपूर्वी पक्षातून स्वतःहून काढून टाकले होते. ममता बॅनर्जींनी पक्षातल्या असंतोषाची दखल घेऊन वेळीच कुठली राजकीय उपाय करण्याच्या ऐवजी वजाबाकीचे राजकारण सुरू केले म्हणून त्यांच्या पक्षामध्ये खऱ्या अर्थाने फूट पडली.
– विरोध ममतांना नाही, तर अभिषेकला
तृणमूळ काँग्रेसच्या सगळ्या बंडखोर आमदारांचा ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाला विरोध नाही. त्यांनी तो मुद्दा विधानसभा अध्यक्षांना दिलेल्या पत्रात थेट नमूद केलाय. या सगळ्या बंडखोर आमदारांचा विरोध फक्त अभिषेक बॅनर्जींना आहे. अभिषेक बॅनर्जी यांची मनमानी आम्ही सहन करणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. बंडखोर आमदारांनी दिलेल्या पत्रात तृणमूळ काँग्रेसच्या अध्यक्षपदावर ममता बॅनर्जी याच असल्याचा उल्लेख आहे त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वा विरुद्ध तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी आणि आमदारांनी बंडखोरी केलेली नसून ती फक्त अभिषेक बॅनर्जी यांच्या विरोधात केलेली बंडखोरी आहे.
– शिंदे पॅटर्न म्हणणे चूक
त्यामुळेच ममता बॅनर्जी यांच्या विरोधात झालेल्या बंडाला एकनाथ शिंदे पॅटर्न म्हणणे चूक आहे. कारण एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्या विरुद्ध बंड करून भाजपशी हातमिळवणी केली नव्हती. त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांना आव्हान देऊन भाजपशी हातमिळवणे केली. त्यामुळे ममता बॅनर्जींच्या पक्षात पडलेली फूट आणि अखंड शिवसेनेत पडलेली फूट यात मूलभूत फरक आहे.
– शिंदेंच्या बंडाला भाजपच्या सत्तेचे लाभ
पण त्याही पलीकडे जाऊन एकनाथ शिंदेंचे बंड आणि ममता बॅनर्जी यांच्या पक्षात पडलेली फूट यात अत्यंत महत्त्वाचा फरक आहे तो म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या बंडाला भाजपच्या केंद्रीय नेतृत्वापासून ते राज्य स्तरावरच्या नेतृत्वापर्यंत सगळ्यांचा आशीर्वाद आणि पाठिंबा होता. एकनाथ शिंदे यांचे बंड यशस्वी झाले. ते यशस्वी करण्यात भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा सिंहाचा वाटा होता. शिवसेनेत बंड घडवून आणण्यासाठी एकनाथ शिंदेंना भरपूर राजकीय कष्ट करावे लागले होते. शिवसेनेत बंड करून ते यशस्वी करून दाखविण्याचे धैर्य एकनाथ शिंदे यांच्याकडे होते पण तेवढी ताकद नव्हती ती ताकद भाजपने पुरविली.
– तृणमूळ काँग्रेस फोडणाऱ्यांना भाजपच्या सत्तेचे लाभ नाहीत
ममता बॅनर्जींच्या पक्षात फूट पाडण्यासाठी भाजपच्या नेत्यांना बिलकुल कुठले राजकीय कष्ट करावे लागले नाहीत. ममता बॅनर्जींचे आणि अभिषेक बॅनर्जींचे राजकीय नष्टाचर्यच एवढे मोठे होते की त्यांच्या पक्षात आपोआप फूट पडली. पक्षातल्या आमदारांनी अभिषेक बॅनर्जींची दादागिरी मूळापासून नाकारली. महत्त्वाचे म्हणजे एकनाथ शिंदे यांना भाजपने बंडासाठी आधार दिला तसा कुठलाही आधार भाजपने ममता बॅनर्जींच्या पक्षात फूट पाडणाऱ्या आमदारांना दिला नाही. ममता बॅनर्जींच्या पक्षात फूट पाडून स्वतंत्र पक्ष काढणाऱ्या किंवा ममता बॅनर्जींच्या पक्षाचा संपूर्ण ताबा घेणाऱ्या आमदारांना भाजप आपल्या सत्तेमध्ये सामील करून घेणार नाही. भाजपच्या राज्याच्या नेतृत्वाने ही स्पष्ट भूमिका दोनच दिवसांपूर्वी जाहीर करून टाकली. त्यामुळे ममता बॅनर्जींच्या पक्षात फूट पाडणाऱ्या आमदारांना भाजप सत्तेचे लाभ देणार असल्याने त्यांना बळ मिळाले असे म्हणणे चूक आणि खोटे आहे. उलट तृणमूल काँग्रेसच्या एकाही आमदाराला भाजपमध्ये प्रवेश देणार नाही, आम्हाला भाजपचे तृणमूळ काँग्रेसीकरण करायचे नाही, असे स्पष्ट उद्गार भाजपचे प्रदेशाध्यक्ष समीक भट्टाचार्य यांनी कालच काढले. त्यामुळे ममता बॅनर्जींच्या पक्षात पडलेल्या फुटीची एकनाथ शिंदेंच्या बंडाशी तुलना करणे चूक आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App