विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली :काँग्रेस नेत्या आणि सुप्रीम कोर्टातील वकिल आरफा खानम यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या ईद-उल-अजहा (बकरी ईद) संदर्भातील एका पोस्टमुळे देशभरात वादंग माजले आहे. त्यांनी एक चित्र पोस्ट केले असून त्यामध्ये एका मुस्लिम मुलाबरोबर गाय दाखवण्यात आली असून, त्यावर “Eid-Ul-Adha Mubarak” असा संदेश होता, हे हिंदू समाजाच्या भावना दुखावणारे असल्याचा आरोप सोशल मीडियावर केला जात आहे.
ही पोस्ट आरफा खानम यांनी नंतर हटवली असली, तरी तिचे स्क्रीनशॉट्स मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले. परिणामी शनिवारीपासून #ArrestAarfaKhanam हा हॅशटॅग X (या प्लॅटफॉर्मवर अव्वल ट्रेंडमध्ये राहिला असून, २४ तासांत जवळपास ५ लाखांहून अधिक पोस्ट्स या विषयावर करण्यात आल्या.
नेटिझन्सनी या प्रकरणी एफआयआर नोंदवण्याची मागणी केली असून, काही नागरिकांनी विविध राज्यांमध्ये पोलीस तक्रारी दाखल केल्याचे वृत्त आहे. तथापि, अद्याप कोणतीही पोलीस कारवाई झाल्याचे स्पष्ट झालेले नाही.
वाद उफाळून आल्यानंतर आरफा खानम यांनी माफीची पोस्ट केली. त्या म्हणाल्या, “ईदच्या दिवशी मी एक पोस्ट शेअर केली, ज्यामागे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. तरी जर कोणाच्या विशेषतः हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी मनापासून दिलगिरी व्यक्त करते. सर्व धर्मांप्रती माझा पूर्ण आदर असून, हे लक्षात येताच मी ती पोस्ट त्वरित हटवली.”
त्यांनी या माफीबरोबरच एक व्हिडीओ मेसेज देखील पोस्ट केला, ज्यामध्ये त्यांनी सामाजिक सलोखा आणि परस्पर आदर टिकवण्याचे आवाहन केले. मात्र, याचबरोबर आरफा खानम यांनी काही पोस्ट्स रीट्विट करत मूळ पोस्ट आक्षेपार्ह नव्हती, असा पवित्रा घेतल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.
या घटनेनंतर राजकीय प्रतिक्रिया देखील उमटू लागल्या आहेत. काही भाजप नेत्यांनी काँग्रेसच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हिंदूविरोधी मानसिकतेचा आरोप केला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App