नाशिक : अरे बाप रे, हे काय झाले??; सावरकरांना माफीवीर म्हणता म्हणता राहुल गांधी स्वतःच माफीवीर होऊन बसले!!, असं म्हणायची वेळ राहुल गांधींच्या एका वक्तव्याने आली. Rahul Gandhi
राहुल गांधींनी आत्तापर्यंत अनेकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा माफीवीर म्हणून अपमान केला. त्याबद्दल त्यांना देशभरातल्या वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये खटल्यांना सामोरे जावे लागल्यानंतर त्यांनी आपले तोंड गप्प केले. त्यांनी सावरकरांना जाहीरपणे माफीवीर म्हणायचे थांबविले, पण सावरकरांना देशभक्तांच्या रांगेत स्थान द्यायला त्यांनी नकार कायम ठेवला. त्यामुळे राहुल गांधींनी सावरकरांना जाहीररित्या माफीवीर म्हणायचे थांबविले तरी त्यांच्या मनातून सावरकरांचे “माफीवीरत्व” गेलेले नाही, हे उघड आहे आणि ते त्यांनीच संदीप दीक्षित यांना दिलेल्या मुलाखतीतून समोर आले होते.
पण त्या पलीकडे जाऊन सावरकरांना माफीवीर म्हणणारे राहुल गांधी काल स्वतःच माफीवीर होऊन बसले. काँग्रेसने आयोजित केलेल्या OBC ओबीसी भागिदारी महासंमेलनात त्यांनी देशभरातल्या ओबीसींची माफी मागून घेतली. काँग्रेसने आपली राजवट असताना कधीच जातनिहाय जनगणना केली नाही, पण ही काँग्रेसची चूक नाही. ही माझी वैयक्तिक चूक आहे. ती मी मान्य करतो आणि सगळ्या ओबीसी समाजाची माफी मागतो, असे ते म्हणाले. पण या माफीतून त्यांनी स्वतः विषयी आणि काँग्रेस विषयी सहानुभूतीचे कार्ड खेळले.
– राहुल गांधींचा माफीनाम्यांचा सिलसिला
पण असली ढोंगी माफी मागण्याची राहुल गांधींची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी त्यांनी स्वतः न केलेल्या पण काँग्रेसने विशेषत: त्यांच्या आजीने केलेल्या चुकीची माफी मागितली होती. इंदिरा गांधींनी आणीबाणी लादली ही त्यांची चूक झाली. काँग्रेसने त्याबद्दल आधीच माफी मागितली होती, मी पुन्हा माफी मागतो, असे ते म्हणाले होते. त्याचवेळी देशातल्या जनतेने इंदिरा गांधींना माफ करून 1980 मध्ये पुन्हा निवडून दिले होते याची आठवणही करून दिली होती.
त्यानंतर राहुल गांधींनी 1984 च्या शीख विरोधी दंगली बद्दल शीख समाजाची माफी मागितली होती. पण त्यांचेच ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी मात्र हुवा तो हुवा असे म्हणून शीख विरोधी दंगलीची उर्मटपणे खिल्ली उडवली होती. त्याबद्दल राहुल गांधींनी त्यांना काहीच महिने काँग्रेस मधून दूर करून छोटीशीच शिक्षा दिली होती. पण नंतर पुन्हा एकदा त्यांना ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष केले.
– प्रादेशिकांच्या जातीच्या अजेंड्यात राहुल गांधींचा शिरकाव
त्यापाठोपाठ आता राहुल गांधींनी कालच काँग्रेसच्या सरकारने जातनिहाय जनगणना केली नसल्याबद्दल माफी मागितली. पण ही माफी मागताना त्यांनी सरळ मनाने मागितली किंबहुना खऱ्या मुद्द्यावर मागितली असे मानणे कठीण आहे. कारण मूळातच पंडित नेहरूंपासून इंदिरा गांधींपर्यंत काँग्रेसची भूमिका जरी जातीवादाचा विशिष्ट राजकीय लाभ उठवण्याची राहिली तरी जाहीरपणे जाती जातींमध्ये फूट पडावी आणि त्यामुळे काँग्रेसचे राजकीय नुकसान व्हावे, अशी अजिबात नव्हती. त्या उलट इतर सगळे प्रादेशिक पक्ष थेट जातीचाच आधार घेऊन उभे राहत असताना पंडित नेहरू आणि इंदिरा गांधींनी काँग्रेसला सर्वसमावेशक करायचा प्रयत्न करून शक्यतो जातनिहाय जनगणना टाळली होती. त्याउलट राहुल गांधींनी काँग्रेसची सर्वसमावेशकतेची झुल उतरवून त्यांनी प्रादेशिक पक्षांच्या जातीच्या अजेंड्यात काँग्रेसची घुसखोरी करून घेतली. आणि ही घुसखोरी यशस्वी करायचा एक भाग म्हणून ओबीसी समाजाची माफी मागून टाकली.
केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राहुल गांधींचे माफीची चलाखी बरोबर ओळखली. त्यांनी जाहीरपणे राहुल गांधींच्या माफीची खिल्ली उडवली. राहुल गांधी आणि काँग्रेस चुका करणार आणि दर 10 वर्षांनी माफी मागणार, असा टोला त्यांनी हाणला.
पण या सगळ्याचा परिणाम वेगळाच झाला. सावरकरांना माफीवीर म्हणता म्हणता राहुल गांधी स्वतःच माफीवीर होऊन बसले!! आता या माफीवीराला जनता माफ करणार की नेहमीप्रमाणे घरीच बसवणार हे आगामी बऱ्याच निवडणुकांमध्ये सिद्ध होईल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App