• Download App
    Naxalism सशस्त्र नक्षलवाद संपला, आता वैचारिक नक्षलवादाचे आव्हान परिसंवादातील सूर!!

    सशस्त्र नक्षलवाद संपला, आता वैचारिक नक्षलवादाचे आव्हान परिसंवादातील सूर!!

    – नक्षलवाद परास्त – अमन और विकास की सौगात पुस्तिकेचे प्रकाशन Naxalism

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : “देशातील अंतर्गत सुरक्षेला मोठा धोका ठरलेला जंगलातील सशस्त्र नक्षलवाद आता सुरक्षा दलांच्या कारवाईमुळे नेस्तनाभूत झाला आहे. मात्र, आता विमर्शाच्या (नॅरेटिव्ह) माध्यमातून देशात अराजकता निर्माण करणाऱ्या वैचारिक आणि शहरी माओवादाचे मोठे आव्हान देशासमोर उभे ठाकले आहे,” असा सूर रविवारी पुण्यात आयोजित नक्षलवाद : संविधानविरोधी आव्हानाचा शेवट या परिसंवादात उमटला.

    एरंडवणे येथील सेवा भवनमध्ये आयोजित या परिसंवादात बस्तरचे अभ्यासक व लेखक राजीव प्रसाद, महाराष्ट्राचे माजी पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सह – प्रचारप्रमुख प्रदीप जोशी यांनी आपले विचार मांडले. यावेळी विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष अभय कुलकर्णी व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या संसदेतील भाषणाचा संपादित अंश असलेल्या नक्षलवाद परास्त – अमन और विकास की सौगात या संस्कृती प्रतिष्ठानच्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.



    बस्तरचे रहिवासी असलेले लेखक राजीव प्रसाद म्हणाले, “देशात विखंडन आणि अराजकता निर्माण करणे हाच माओवादाचा मुख्य हेतू राहिला. नक्षलवाद हा कधीच सामाजिक-आर्थिक प्रश्न नव्हता, उलट त्यांच्यामुळे हे प्रश्न निर्माण झाले. नक्षलवाद्यांनी अल्पवयीन मुलांची सक्तीने भरती करून त्यांना बंदूक हातात धरण्यास भाग पाडले. माओवाद्यांनी आज जंगलातील बंदूक जरी खाली ठेवली असली, तरी खोट्या विमर्शाच्या माध्यमातून ते वैचारिक क्षेत्रात आजही सक्रिय आहेत. हा खोटा विमर्श खोडून काढण्यासाठी समाजाने अधिक सजग होण्याची गरज आहे.”

    – देशविघातक कारवाया रोखण्यासाठी केंद्रीय दलांना अधिकार द्या : प्रवीण दीक्षित

    माजी पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित म्हणाले, “एका काळात पशुपती ते तिरुपतीपर्यंत देशाची अंतर्गत सुरक्षा धोक्यात आली होती. गरिबीमुळे नक्षलवाद वाढला हे धादांत खोटे असून, नक्षलवाद्यांनीच आदिवासींना विकासापासून वंचित ठेवले. चीनचा पुरस्कार करणे आणि भारतीय संविधान नाकारणे हेच माओवाद्यांचे मुख्य काम होते. मानवाधिकाराच्या नावाखाली पोलिसांचे खच्चीकरण करण्याचेही अनेकांनी प्रयत्न केले. ते अयशस्वी ठरले. आता नक्षलग्रस्त भागात रस्ते, रेल्वे, इंटरनेट आणि रोजगार पोहोचत आहे. तेथे सुशासनाचा मार्ग मोकळा होत असून, योग्य जागरूकता ठेवल्यास शहरी नक्षलवादाचाही लवकरच बिमोड होईल. तसेच देशविघातक कारवाया कोणत्याही राज्यात चालू असतील, तर त्या रोखण्यासाठी केंद्रीय दलांना विशेष घटनात्मक अधिकार दिले पाहिजेत.”

    – राष्ट्रीय सुरक्षेसाठी सजग समाज निर्मितीची गरज: प्रदीप जोशी

    रा. स्व. संघाचे अखिल भारतीय सह – प्रचारप्रमुख प्रदीप जोशी यांनी भविष्यातील आव्हानांवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, “ब्रिटिशांनी आदिवासी आणि उर्वरित समाजात भेद निर्माण करण्यासाठी वेगळी ओळख तयार करण्याचा प्रयत्न केला. आज “डीप स्टेट” कडून भारतात नवनवीन प्रयोग चालू असून देशविरोधी शत्रूची “इकोसिस्टम” खूप खोलवर रुजली आहे. त्यामुळे केवळ सरकार सर्व काही करेल या भ्रमात न राहता सुरक्षेसाठी समाजानेही एक पाऊल पुढे टाकावे लागेल. नक्षलग्रस्त भागात विकास करताना आदिवासींच्या सहभागासह तिथली वांशिक, सांस्कृतिक आणि भौगोलिक विविधता समजून घ्यावी लागेल. राष्ट्रीय सुरक्षेसाठी समाजात सजगता, सक्रियता आणि सशक्तता आणणे गरजेचे आहे.”

    भरत आमदापुरे यांनी प्रस्तावना केली. त्यांनी भूतकाळात देशाच्या १४० जिल्ह्यांमध्ये प्रशासनाला आव्हान देणारा सशस्त्र नक्षलवाद कसा संपला आणि आता शहरी नक्षलवाद हे २०२६ मधील अंतर्गत सुरक्षेचे मुख्य आव्हान कसे बनले आहे, यावर प्रकाश टाकला. अजय महाजन यांनी आभार मानले. विश्व संवाद केंद्र, प्रबोधन मंच’ आणि विवेक विचार मंच यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

    Publication of booklet on defeating Naxalism – a gift of peace and development

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    उझबेकिस्तानातील वैद्यकीय विद्यार्थिनीच्या मृत्यूची राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली स्वतःहून दखल

    Delayed Monsoon : देशात शेती असलेल्या भागात दुष्काळाचे सावट; निम्म्या भारतात तुटीच्या पावसाने खरीप पेरण्या 21% पिछाडीवर, महाराष्ट्रावरही चिंतेचे ढग

    Anil Ambani : अनिल अंबानी ग्रुपची ₹1,021 कोटींची मालमत्ता जप्त; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात कारवाई, आतापर्यंत ₹20,367 कोटींची मालमत्ता जप्त