• Download App
    Homemakers गृहिणींना ‘राष्ट्रनिर्माती’ म्हणताना...; सर्वोच्च न्यायालयाच्या महत्त्वपूर्ण निकालावर सटीक भाष्य!!

    गृहिणींना ‘राष्ट्रनिर्माती’ म्हणताना…; सर्वोच्च न्यायालयाच्या महत्त्वपूर्ण निकालावर सटीक भाष्य!!

    स्वाती रानडे

    सर्वोच्च न्यायालयाने गृहिणींना “राष्ट्रनिर्माती” म्हणून दिलेली मान्यता निश्चितच स्वागतार्ह आहे. घर आणि कुटुंबाच्या जडणघडणीत महिलांचे योगदान किती महत्त्वाचे आहे, याची सार्वजनिक पातळीवर दखल घेणे आवश्यकच होते. अनेक वर्षे घरातील कामाला “कर्तव्य” म्हणून पाहिले गेले, परंतु त्यामागील श्रम, वेळ आणि समर्पण यांचे मूल्य पुरेसे मान्य केले गेले नाही. या पार्श्वभूमीवर न्यायालयाचा निर्णय महत्त्वाचा वाटतो.

    तथापि, या योगदानाचे मूल्यांकन करताना केवळ आर्थिक निकष पुरेसे ठरतील का??, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. गृहिणी घरासाठी जे करते ते फक्त श्रम नसतात. त्यामध्ये प्रेम, ममत्व, काळजी, जिव्हाळा, भावनिक आधार, नात्यांची जपणूक आणि पुढील पिढीच्या घडणीची जबाबदारीही असते. या गोष्टींचे आर्थिक मूल्य निश्चित करणे शक्य नाही.
    घरातील स्वयंपाक, साफसफाई किंवा मुलांची देखभाल यासाठी पर्यायी सेवा उपलब्ध होऊ शकतात. पण आईचे ममत्व, पत्नीची साथ किंवा कुटुंबाला एकत्र बांधून ठेवणारा भावनिक धागा पैसे देऊन निर्माण करता येत नाही. एखाद्या व्यक्तीने दिलेली सेवा आणि त्या व्यक्तीचे स्थान यांत मूलभूत फरक असतो.

    म्हणूनच गृहिणींच्या कार्याला आर्थिक मूल्य देण्याचा प्रयत्न महत्त्वाचा असला, तरी त्यांचे संपूर्ण योगदान त्या चौकटीत मावू शकत नाही. न्यायालय श्रमांचे मूल्य ठरवू शकते; परंतु प्रेम, त्याग, काळजी आणि नातेसंबंधांचे मूल्य मोजू शकत नाही.



    – महिलांच्या योगदानाला सामाजिक मान्यतेची गरज

    माझ्या मते, महिलांना सर्वाधिक गरज आहे, ती महिला देत असलेल्या योगदानाला सामाजिक मान्यता आणि सन्मान मिळण्याची. घरातील कामाकडे “काहीच काम नाही” किंवा “ती फक्त घरात असते” अशा दृष्टिकोनातून पाहिले जाणे थांबले पाहिजे. त्यांचे योगदान कुटुंबापुरते मर्यादित नसून समाज आणि राष्ट्राच्या उभारणीशी जोडलेले आहे, ही जाणीव समाजात निर्माण होणे अधिक महत्त्वाचे आहे.

    – कार्यामागील मागील मूल्याला आदर

    म्हणून या निर्णयाकडे केवळ भरपाईचे गणित म्हणून नाही, तर घर आणि कुटुंब उभारण्यासाठी केलेल्या कार्याला प्रतिष्ठा देणे ह्या दृष्टीकोनातून पहिले पाहिजे. आर्थिक मूल्यांकन काही विशिष्ट संदर्भात आवश्यक असू शकते; पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्या कार्यामागील मानवी मूल्यांची ओळख आणि त्याला मिळणारा आदर.

    गृहिणींना “राष्ट्रनिर्माती” म्हणणे योग्यच आहे, कारण त्यांनी पिढ्यान् पिढ्या माणसे घडविली, नाती जपली आणि समाजाचा पाया मजबूत केला आहे. मात्र बदलत्या सामाजिक संदर्भात हा मुद्दा केवळ स्त्रीपुरता मर्यादित राहात नाही.

    घरातील काम, मुलांचे संगोपन, ज्येष्ठांची काळजी, नातेसंबंधांची जपणूक आणि घराला घरपण देणाऱ्या जबाबदाऱ्या या स्वतःमध्येच महत्त्वाच्या आहेत. त्या स्त्रीने पार पाडाव्यात की पुरुषाने, हा दुय्यम प्रश्न आहे. महत्त्वाचे हे की ह्या कामाला समाजाने योग्य प्रतिष्ठा द्यावी. कारण समाजाची घडण केवळ उत्पन्न कमावणाऱ्यांमुळे होत नाही; ती घर, कुटुंब आणि माणसे घडवणाऱ्यांमुळेही होत असते.

    (लेखिका पुण्यातील बाया कर्वे स्त्री अभ्यास आणि संशोधन केंद्राच्या प्रमुख आहेत)

    Homemakers are ‘nation builders’, their work worth at least ₹30,000 a month: Supreme Court

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    मोदींची तुलना नेहरूंबरोबर नकोच; पण पवारांची तुलना कुणाबरोबर करता येईल??

    ashok kharat : अशोक खरात प्रकरणात सरकारचे मोठे पाऊल; उज्ज्वल निकम मैदानात, भोंदूबाबाच्या अडचणी वाढणार?

    काँग्रेसने हिंग लावून नाही विचारले, म्हणून विलीनीकरण बारगळले; कबुली देणे भाग पडले!!