नाशिक : सोनम वांगचुक खरंच दुसरा स्वातंत्र्य लढा लढतोय की गुलामीची मानसिकता कुरवाळायची ती सवय आहे??, असा सवाल विचारायची वेळ सोनम वांगचुकच्या आजच्या आवाहनामुळे आली.
सोनम वांगचुकने जंतर-मंतरवर सलग २० दिवस उपवास केल्यानंतर कालच पोलिसांनी त्याला सफदरजंग रुग्णालयात हलविले. तिथे त्याच्यावर डॉक्टरांनी उपचार सुरू केले. पण सोनम मांगचुकला आणि त्याच्या पत्नीला सफदरजंग रुग्णालयातील उपचार मान्य नसल्याने ते दोघे पुन्हा दिल्ली उच्च न्यायालयात गेले. तिथे त्यांनी खाजगी रुग्णालयात उपचार व्हावेत, यासाठी सरकारला आदेश देण्याची याचिका सादर केली.
– दुसऱ्या स्वातंत्र्यलढ्याचे सोनम वांगचूकचे आवाहन
पण त्याच दरम्यान सोनम वांगचूकने सफदरजंग रुग्णालयातूनच जनतेला एक संदेश प्रसारित केला. त्यामध्ये त्याने संपूर्ण भारतातल्या जनतेने दुसऱ्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन केले. आपण दुसरा स्वातंत्र्यलढा लढतो आहोत. सध्याच्या मोदी सरकारच्या गुलामीतून आपल्याला मुक्त व्हायचे आहे, असे सोनम वांगचूकने समस्त भारतीय जनतेला सांगितले.
– लढाई असलीच, तर ती वेगळीच
जणू काही मोदी सरकार हे इंग्रज सरकार आहे आणि मोदी सरकारच्या गुलामीतून मुक्त होणे म्हणजे इंग्रज सरकारच्या गुलामीतून मुक्त होण्यासारखेच आहे, असा आव सोनम वांगचुकने आणला. वास्तविक सोनम वांगचूकची लढाई स्वतःची नाही. कॉक्रोच जनता पार्टीने शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यासाठी केलेल्या आंदोलनात सोनम वांगचुक लडाख मधून दिल्लीत येऊन सामील झाला. त्यामुळे त्या आंदोलनाला थोडेफार glamour प्राप्त झाले किंबहुना ते माध्यमांनी glamour प्राप्त करून दिले.
त्यापलीकडे त्या आंदोलनाचा फारसा कुठला फायदा झाला नाही. उलट धर्मेंद्र प्रधान यांची खुर्ची घट्ट झाल्याचे निरीक्षण आशुतोष सारख्या आम आदमी पार्टीच्या माजी नेत्याने नोंदविले. याचा अर्थ सोनम वांगचुकच्या उपवासाचा त्या अर्थाने कुठल्या राजकीय फायदा झाल्याचे दिसले नाही, तरीसुद्धा सोनम वांगचूकने आपले आंदोलन फसल्याचे मान्य करण्याऐवजी आपण दुसरा स्वातंत्र्यलढा लढतो आहोत आणि त्यामध्ये जनतेने सहभागी व्हावे, असे आवाहन करून स्वतःचे आणि आंदोलनाचे glamour टिकवायचा “डाव” खेळला. त्यापलीकडे जाऊन सोनम वांगचुकच्या आवाहनाला दुसरा कुठलाही अर्थ नव्हता.
पण दुसरा स्वातंत्र्यलढा लढायची फक्त सोनम वांगचूकलाच हौस आहे असे नाही. इतिहासात त्यांचे दाखले अनेक मिळतात. अनेक नेत्यांना अशी दुसरा स्वातंत्र्य लढा लढायची खुमखुमी आलेली इतिहासाची साक्ष आहे.
– 1975 मधला दुसरा स्वातंत्र्यलढा
1975 मध्ये इंदिरा गांधींनी ज्यावेळी आणीबाणी लादली, त्यावेळी जयप्रकाश नारायण आणि अन्य विरोधी नेत्यांना अशीच दुसरा स्वातंत्र्यलढा लढायची खुमखुमी आली होती. वास्तविक इंदिरा गांधींनी लादलेली आणीबाणी जनतेच्या फार विरोधात नव्हती. उलट सुरुवातीला आणीबाणीमुळे सरकारी कर्मचारी “सरळ” झाल्याने ते सरळपणे वागत होते. शिस्तबद्ध वागत होते. सरकारी आणि खाजगी कार्यालयांमध्ये शिस्त आली होती. त्याचा जनतेला लाभच झाला होता. त्यामुळेच विनोबा भावे यांच्यासारख्या राजकीय संताने सुद्धा आणीबाणीला “अनुशासन पर्व” असे म्हटले होते.
पण आणीबाणीच्या दरम्यान इंदिरा गांधींच्या आणि संजय गांधींच्या सत्तेचा अतिरेक झाला. त्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना अकारण तुरुंगात डांबले. त्यानंतर त्यांनी नसबंदीचा अतिरेकी प्रयोग केला. त्यामुळे इंदिरा गांधी राजकीय दृष्ट्या फसल्या. त्यांना आणीबाणीची राजकीय किंमत मोजावी लागली आणि त्या 1977 च्या लोकसभा निवडणुका हरल्या. इंदिरा गांधींच्या पराभवाचा दुसऱ्या स्वातंत्र्यलढ्याशी अर्थाअर्थी काहीही संबंध नव्हता, पण इंदिरा गांधी पराभूत झाल्या म्हणून जयप्रकाश नारायण आणि त्यांचे अनुयायी जिंकले होते. वास्तविक त्यावेळी इंदिरा गांधी स्वतःच्या गैर कर्तृत्वाने हरल्या होत्या. विरोधकांच्या कर्तृत्वाने त्या पराभूत झाल्या नव्हत्या. हे नंतरच्या काळात सिद्धही झाले. त्यावेळी जयप्रकाश नारायण यांनी सुद्धा असाच दुसऱ्या स्वातंत्र्यलढ्याचा नारा दिला होता. तो नारा फक्त दोन वर्षे उपयोगी पडला. त्यानंतर त्या घोषणेतला राजकीय फोलपणा त्या वेळच्या जनता पक्षाच्या नेत्यांनी स्वतःच्या अकर्तृत्वाने सिद्ध केला. इंदिरा गांधींचा केलेला पराभव त्यावेळच्या सत्ताधाऱ्यांना म्हणजेच जनता पक्षाच्या नेत्यांना पचला नाही. त्यांना सत्ता नीट उपभोगता आली नाही. जनता पक्षाच्या नेत्यांनी स्वतःच्याच राजकीय करंटेपणामुळे स्वतःच्या हाताने सत्ता गमवली होती. त्यावेळचा दुसरा स्वातंत्र्यलढा अवघ्या दोन वर्षांत डब्यात गेला होता.
– 2014 नंतर स्वातंत्र्य मिळाल्याचा “साक्षात्कार”
2014 मध्ये केंद्रातल्या काँग्रेस प्रणित UPA सरकारचा पराभव करून नरेंद्र मोदींनी भाजपची पूर्ण बहुमताची सत्ता आणली. त्यावेळी अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचा भाजपने चपखल राजकीय वापर करून घेतला होता. त्यावेळी सुद्धा भाजप मधल्या अनेक सोशल मीडिया वीरांना भारताने दुसरा स्वातंत्र्यलढा जिंकल्याचा “साक्षात्कार” झाला होता. वास्तविक मोदींनी भ्रष्ट काँग्रेस सरकारचा पराभव केला होता. त्यामध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या भ्रष्ट नेतृत्वाचा समावेश होता. त्यावेळी संपूर्ण भारतातली जनता सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या मनमानी कारभाराला कंटाळली होती. त्यामुळेच जनतेने मोदींच्या नेतृत्वाखालच्या भाजपला पूर्ण बहुमत दिले होते, पण त्यावेळच्या अनेक सोशल मीडिया वीरांना मोदींचा विजय म्हणजे दुसरा स्वातंत्र्यलढा यशस्वी झाल्याचा साक्षात्कार झाला होता. त्यावेळी काँग्रेसची राजवट जरी भ्रष्ट होती, तरी जनता काही इंग्रजांच्या गुलामीत नव्हती. किंबहुना ती काँग्रेसच्या सुद्धा गुलामीत नव्हती. त्यामुळे खऱ्या अर्थाने दुसरा स्वातंत्र्यलढा लढायचा सुद्धा प्रश्न नव्हता. तसा कुणी लढलाही नव्हता. मोदींनी सुद्धा त्यावेळी कधी आपण दुसरा स्वातंत्र्यलढा लढतोय, असा आव आणला नव्हता. त्यांनी फक्त काँग्रेसच्या भ्रष्ट कारभारावर जबरदस्त प्रहार केला होता. त्याचा लाभ भाजपला झाला होता, त्या पलीकडे त्या विजयाला दुसरा कुठलाही अर्थ नव्हता. पण त्यावेळी सोशल मीडिया वीरांनी दुसरा स्वातंत्र्यलढा जिंकल्याचा आव आणून संपूर्ण देशभर गदारोळ केला होता.
– गुलामीची मानसिकता कुरवाळायची सवय
सोनम वांगचुकने आज केलेले आवाहन वर उल्लेख केलेल्या सर्व बाबींपेक्षा कुठेही वेगळे आवाहन नाही. स्वतःचे glamour टिकवण्यासाठी आणि आंदोलन यशस्वी झाल्याचे दाखविण्यासाठी दुसरा स्वातंत्र्यलढा लढण्याचा आव आणण्यापलीकडे सोनम वांगचुकच्या आवाहनाला दुसरा कुठलाही अर्थ नाही. आज संपूर्ण देश भाजपच्या किंवा मोदींच्या कुठल्याही प्रकारच्या गुलामीत नाही. संपूर्ण देशाला गुलामी टाकण्याची भाजपची किंवा मोदींची इच्छा किंवा क्षमता सुद्धा नाही. तशी ती काँग्रेसची किंवा गांधी परिवाराची सुद्धा नव्हती. आता कुणाच्या गुलामीत अडकण्या इतपत भारतातली जनता मूर्ख राहिलेली नाही. त्यामुळे दुसरा स्वातंत्र्यलढा लढायचा आव आणणारे नेते किंवा कार्यकर्ते किंवा सोशल मीडिया वीर त्या दुसऱ्या स्वातंत्र्यलढ्याच्या नावाखाली स्वतःच गुलामीची मानसिकता कुरवाळत आहेत, या पलीकडे त्यांच्या म्हणण्याला दुसऱ्या कुठलाही अर्थ नाही.
After Sonam Wangchuk fasted at Jantar Mantar for 20 consecutive days, the police moved him to Safdarjung Hospital just yesterday.
महत्वाच्या बातम्या
- पोलिसी बळावर टेल्कोचे आंदोलन मोडून काढणाऱ्या पवारांना सोनम वांगचुकचे आंदोलन मोडून काढल्याचे दुःख!!
- सुप्रिया सुळे यांना पुढचे काही दिवस गप्प राहण्याचा सल्ला; पण दिला कुणी आणि कशासाठी??
- आषाढी वारीत वारकऱ्यांच्या सेवेसाठी ‘फिनोलेक्स’चा पुढाकार; लाखो साहित्याचे वाटप; वारकऱ्यांकडूनही उपक्रमाचे कौतुक
- Japan : बुलेट-ट्रेन प्रकल्प उशिरा झाल्याने जपानचे माजी मंत्री नाराज; म्हटले- आम्ही खूप मेहनत केली, पण भारतीय मंत्र्यांचे वर्तन खराब होते