– विविधतेत एकता हेच भारताचे बलस्थान
विशेष प्रतिनिधी
मळसाणे (णमोकार) जि. नाशिक : “धर्माचा मार्ग सोडून भौतिकतेचा स्वीकार केलेल्या जगाला सुविधा मिळाल्या, मात्र सुख दुरावले आहे. यामुळेच आज मानवासमोर अनेक समस्या उभ्या ठाकल्या आहेत. आधुनिक तंत्रज्ञान आणि प्राचीन ज्ञान यांचा समन्वय साधून धर्माच्या आचरणातूनच मानवजातीचे खरे कल्याण होईल,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.Sarsanghchalak’s assertion at the Panchakalyanak Pratishtha ceremony at Namokar Tirtha Kshetra
मळसाणे (ता. चांदवड) येथील ‘णमोकार’ तीर्थक्षेत्री आयोजित दिगंबर जैन पंथाच्या आंतरराष्ट्रीय पंचकल्याणक प्रतिष्ठा सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर गणाचार्य श्री कुंथुसागरजी महाराज, आचार्य श्री देवनंदीजी महाराज, आमदार डॉ. राहुल आहेर आदि उपस्थित होते.
डॉ. भागवत पुढे म्हणाले की, “धर्मावलंबी समाजामुळेच भारतातील विविधतेत एकता निर्माण झाली आहे. अहिंसा, अनेकांतवाद आणि अपरिग्रह या मूल्यांमुळेच मानवजातीचा प्रगतीचा मार्ग प्रशस्त झाला आहे. ‘णमोकार मंत्र’ हा केवळ शब्दसमूह नसून तो मनुष्य आणि सृष्टीच्या कल्याणाचा मार्गदर्शक मंत्र आहे. संपूर्ण जगाला हा कल्याणकारी मंत्र देण्याची वेळ आली आहे.” तीर्थक्षेत्र ही तपस्येची साधने असून मानवकल्याणाच्या विचारांची ती प्रेरणास्थाने आहेत, असेही ते म्हणाले.
याप्रसंगी आचार्य देवनंदीजी महाराज म्हणाले की, स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानामुळेच आज आपण स्वातंत्र्याचा अनुभव घेत आहोत. साधू-संत ही देशाची खरी विरासत असून, त्यांच्या अध्यात्म आणि भक्तीमुळेच देशाची प्रगती होत आहे. गणाचार्य कुंथुसागरजी महाराजांनी आपल्या आशीर्वचनात सांगितले की, जगाचे कल्याण साधू – संतांच्या आशीर्वादानेच शक्य आहे. समाजातील हिंसक प्रवृत्तींचा नाश करून मानवतेच्या कल्याणासाठी कार्य करणे ही काळाची गरज आहे.
या सोहळ्यात विशेष ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले, तसेच पंचपरमेष्ठी मंडपाचे उद्घाटनही मान्यवरांच्या हस्ते झाले. या आंतरराष्ट्रीय महोत्सवासाठी देशभरातून हजारो जैन बांधव उपस्थित आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App