विशेष प्रतिनिधी
मुंबई : अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात आमदार रोहित पवारांनी आज पुढच्या टप्प्यात जाऊन तेलगू देशम पार्टी आणि भाजपला सुद्धा संशयाच्या जाळ्यात ओढले. यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी तिसऱ्यांदा प्रेझेंटेशन केले आणि आरोप आणि दाव्यांच्या फैरी झाडल्या.Rohit Pawar drags Telugu Desam Party and BJP into a web of suspicion; A flurry of allegations and claims from the press conference!!
शरद पवारांच्या गटाला अपेक्षित असलेले दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होत नाही, हे लक्षात येताच रोहित पवारांनी आपले लक्ष अजित पवारांच्या विमान अपघाताकडे वळविले. त्यांनी मुंबई आणि दिल्लीत पत्रकार परिषदा घेऊन प्रेझेंटेशन केले. त्यानंतर पुन्हा पत्रकार परिषदा जाहीर केल्या, पण त्या पत्रकार परिषदा घेणे त्यांनी लांबणीवर टाकले. लांबणीवर टाकलेली पत्रकार परिषद त्यांनी आज यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी आंध्रप्रदेश मधील तेलगू देशम पार्टी आणि भाजप यांना देखील संशयाच्या जाळ्यात ओढले.
– रोहित पवार म्हणाले :
– अजित पवारांच्या विमान अपघाताच्या दिवशी बारामतीत दृश्यमानता (व्हिजिबिलिटी) कमी असतानाही वैमानिक कॅप्टन सुमित कपूर याने विमान माघारी न फिरवता खाली उतरवले. त्याने विमानाचा स्फोट करण्यासाठी विमान मुद्दाम खाली आदळले. अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत अनेक नव्या शंका आहेत. विमानाचा पायलट सुमित कपूर आणि व्हीएसआर कंपनीविषयी देखील संशय आहे.
– मुंबईवरुन बारामतीला जाण्यासाठी फार इंधनाची गरज नव्हती, तरीही अजितदादांच्या विमानाच्या पंखातील इंधनाच्या टाक्या पूर्णपणे भरल्या होत्या. हे विमान बारामतीवरुन हैदराबादला जाणार होते. तिथे विमानात पुन्हा इंधन भरता आले असते. मात्र, हे विमान सुरतवरुन मुंबईला येत असतानाच त्याच्या इंधन टाक्या पूर्णपणे भरल्या होत्या. या विमानात अपघाताच्या वेळी 3000 ते 3500 लीटर इंधन होते. एवढेच नव्हे, तर विमानाच्या टॉयलेटजवळ इंधनाचे अतिरिक्त कॅनही ठेवले होते. या सगळ्यात पायलटचा वापर करुन अजित पवार यांच्या विमानाचा अपघात घडवण्यात आला, असे आम्हाला वाटते. विमानात जास्त इंधन असेल तर मोठा स्फोट होईल, हा आमचा संशय खरा ठरताना दिसत आहे. बारामतीच्या धावपट्टीवर उतरण्यासाठी दृश्यमानता कमी असूनही पायलट सुमित कपूर यांनी माघारी न फिरता एक गिरकी घेऊन विमान खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. किंबहुना त्यांनी विमान मुद्दाम खाली आदळले आणि स्फोट घडवून आणला.
– विमानाच्या लँडिगसाठी 5000 इतकी दृश्यमानता लागते. मात्र, बारामतीत त्यावेळी 3500 इतकीच दृश्यमानता होती. मूळात मुंबईतून उड्डाण करतानाच दृश्यमानता कमी होती. तरीही विमानाच्या उड्डाणासाठी परवानगी देण्यात आली. यानंतरही विमानाने उड्डाण केले तरी ते बारामतीत लँड करायला नव्हते पाहिजे. त्यामुळे या अपघाताबाबत घातपाताचा संशय अधिक बळावतो.
– VSR कंपनीकडून पुराव्यांशी छेडछाड,
– VSR कंपनीचा गोपी नावाच हँडलर मुंबईत बसतो. तो फ्लाईट प्लॅनमध्ये फेरफार करु शकतो. माझ्या माहितीनुसार, सध्या तपास सुरु असून व्हीएसआर कंपनीकडून कागदपत्रे मिळण्यात विलंब होत आहे. कारण, व्हीएसआर कंपनीकडून सध्या कागदपत्रांमध्ये फेरफार करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दिल्लीवरुन फ्लाईट प्लॅन आल्यानंतर हँडलर गोपीने त्यामध्ये बदल केले असावेत. त्यामुळे याप्रकरणाची चौकशी करताना त्यावेळी पाठवण्यात आलेले ई-मेल तपासावेत.
– तेलगू देशम पार्टीवर संशय
– VSR विमान कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांचा रोहित सिंग हा मुलगा आहे. रोहित सिंग हा विमान अपघातानंतर अमेरिकेला निघून गेला. रोहित सिंगच्या लग्नाला विमान वाहतूक मंत्री रामबाबू नायडू आणि तेलुगु देशांचे अनेक नेते तसेच महाराष्ट्रातले काही माजी मंत्री हजर होते. याचा अर्थ VSR कंपनीशी यांचा जवळचा संबंध असू शकतो. VSR कंपनीला वाचवण्यासाठी अनेक लोक प्रयत्न करत आहेत, पण आम्ही त्यांना सोडणार नाही.
– मी आणि रोहित शर्मा यांच्यासह अनेक क्रिकेटपटूंनी VSR कंपनीच्या विमानातून मुंबई ते बारामती असा प्रवास केला होता, याबद्दल मला भाजपचे काही ट्रोलर्स ट्रोल करत आहेत. त्यांना भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांचा पाठिंबा आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याची माहिती असेल असे नाही पण त्यांच्या आशीर्वादाने काही सुरू आहे का??, याचा तपास करावा लागेल.
– सुनेत्रा पवार पार्थ पवार आणि जय पवार यांच्याशी माझी कुठली बातचीत झालेली नाही. 13 दिवसांपूर्वी काही बोलणे झाले होते पण त्यानंतर कुठलेही बोलणे झालेले नाही. पण त्यांना सुद्धा विमाना अपघाताविषयी संशय वाटतो असे त्यांच्या हावभावावरून माझ्या लक्षात आले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App